लाबीश, अजॅन : (६ मे १८१५-२३ जानेवारी १८८८). फ्रेंच नाटककार. जन्म पॅरिस शहरी. पॅरिस विद्यापीठातून त्याने कायद्याची पदवी संपादन केली होती तथापि वकिलीचा व्यवसाय मात्र कधीच केला नाही पूर्णतः साहित्यालाच वाहून घेतले.

 लाबीशने विपुल नाट्यलेखन केले. त्याने १७२ हलकीफुलकी प्रहसने आणि विनोदी नाटके लिहिली. काही नाटके त्याने अन्य लेखकांच्या सहकार्यानेही लिहिली आहेत. अँ शापो द् पाय्य दिताली (१८५१, इं. शी. ॲन इटालियन स्ट्रॉ हॅट), ल होय्याज द् मस्य पॅरिशाँ (१८६०, इं. शी. मिस्टर पॅरिशाँज व्हॉयिज), ला पूद्र ओझ्य (१८६१, इं. शी. डस्ट इन युअर आइज), सेलीमार ल बियँनेमे (१८६३, इं. शी. सेलीमार द बिलव्हेड), ला ग्रामॅर (१८६७, इं. शी. ग्रामर) ह्या त्याच्या काही उल्लेखनीय नाट्यकृती ह्यांपैकी ल व्होय्याज…… या नाटकाचा मराठी अनुवाद शकुंतला परांजपे ह्यांनी चढाओढ (१९३६) ह्या नावाने केलेला आहे. त्याचप्रमाणे ला पूद्र ….. चा मराठी अनुवाद त्यांनी सोयरीक (१९३८) ह्या नावाने, तर कोंकणी अनुवाद डॉ. मनोहरराय सरदेसाय ह्यांनी भांगराचोधुल्ल अशा शीर्षकाने केलेला आहे.

विनोदनिर्मितीसाठी लाबीश गैरसमज, चमत्कारिक प्रसंग, खुसखुशीत संवाद ह्यांचा कौशल्याने उपयोग करतो. त्याच्या नाटकांची कथानके जलद गतीने पुढे जाणारी असतात. त्याच्या नाटकांत पुरुष व्यक्तीरेखांना अधिक वाव आणि महत्त्व त्याने दिलेले आहे. स्त्रियांच्या व्यक्तिरेखा त्या मानाने गौण आहेत. त्याच्या नाटकांतले पुरुष हे सामान्यतः मध्यमवर्गीय, मध्यमवयीन, आढ्यताखोर आणि धनप्राप्ती हे आयुष्यातले महत्त्वाचे ध्येय मानणारे आहेत. त्यांचा आत्मकेंद्रितपणा लाबिश प्रभावीपणे दाखवून देतो. त्याची समग्र नाटके दहा खंडांत संकलित करण्यात आलेली आहेत (१८७८-७९).

त्याला १९८० साली फ्रेंच अकादमीचे सदस्यत्व देण्यात आले. पॅरिस येथे तो निधन पावला.     

सरदेसाय, मनोहरराय