नागेश : (सु. १६२३–१६८८). मराठी कवी. मूळचे नाव नागभट्ट जोशी. नागेशाचे आडनाव महाराष्ट्र सारस्वतकार ‘मुळे’ असेही देतात. नागेश, नागेंद्र, नागजोशी आणि नागकवी अशा नावांनीही तो ओळखला जातो. हा अहमदनगरजवळील भिंगार या गावचा रहिवासी. ह्याच्या वडिलांचे नाव मोर जोशी, आईचे जानकी. वडील काव्यरचना करीत असत. चंद्रावळीवर्णन, सीतास्वयंवर, रुक्मिणीस्वयंवर, रसमंजरी आणि शारदाविनोद ही पाच काव्ये त्याने लिहिली आहेत. ह्यांशिवाय आर्याटीका नावाचे एक प्रकरण त्याच्या नावावर देण्यात येते. ४१४श्लोकांचे सीतास्वयंवर सोडल्यास नागेशाचे कोणतेही काव्य पूर्णतः उपलब्ध नाही. वामनपंडित व सामराज ह्या कवींचा प्रभाव नागेशावर दिसून येतो. नागेशाच्या काव्यांतून त्याची बहुश्रुतता दिसून येते. रघुवंशादी संस्कृत महाकाव्यांचा उत्तम अभ्यास त्याने केला होता. चंद्रावळीवर्णन हे शृंगारप्रचुर काव्य त्याने अग्निपुराणाच्या आधारे रचिलेले आहे. शारदाविनोदात त्याने स्वतःचा ‘नानाकाव्यकलापचतुर’ असा उल्लेख केलेला आहे. नागेशाच्या काळाचे प्रतिबिंब त्याच्या साहित्यकृतींत पडले आहे. सीतास्वयंवरात तर सीतेच्या स्वयंवरासाठी निमंत्रिलेल्या राजांत ‘चव्हाण’, ‘मोरे’, ‘राणे’, ‘शिसोदे’ अशा नावांचेही उल्लेख आहेत. अभिरुचीचा हलकेपणाही त्याच्या काही वर्णनांतून प्रत्ययास येतो.

सुर्वे, भा. ग.