हुमणी : कोलिऑप्टेरा गणातील मेलोलाँथिनी कुलातील भुंगेऱ्यांच्या अळ्यांना हुमणी संबोधण्यात येते. या अळ्या रंगाने पांढऱ्या किंवा धुरकट पांढऱ्या असून गुबगुबीत व मांसल असतात. त्यांचे अंग अर्धवर्तुळासारखे वळलेले असते. पाय जरी चांगले मजबूत असले, तरी त्यांचा चालण्यासाठी क्वचितच उपयोग केला जातो. डोके मोठे व कडक असून खालच्या बाजूला कललेले असते. डोक्याचा रंग पिवळा, तांबडा किंवा तपकिरी असून त्यावरील जंभ स्पष्ट दिसतात. तत्सम दिसणाऱ्या अळ्यांपासून ‘हुमणी’ ओळखण्याची खूण म्हणजे शेवटच्या खंडकाचे खालील बाजूस असलेल्या सूक्ष्म केसांच्या दोन ओळी. या अळ्या जमिनीत राहून ऊस, भुईमूग, ज्वारी, भात, कापूस, मका यांसारख्या बऱ्याच प्रकारच्या पिकांच्या मुळांवर उपजीविका करतात. परिणामतः अशी झाडे वाळून जातात. 

हुमणीची विकास-अवस्था : (१) अळी, (२) कोश, (३) भुंगेरा.

 

हुमणी या किडीच्या सर्व विकास-अवस्था जमिनीतच पूर्ण होतात. भुंगेरे साधारणपणे पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोशातून बाहेर पडतात. ते दिवसभर जमिनीत राहतात. पावसाळ्याची पहिली सर पडून गेली की ते सूर्यास्तानंतर जमिनीतून बाहेर पडून शेताजवळील झाडावर बसतात. कडुनिंब आणि बाभूळ ही त्यांची आवडती झाडे होत. नर व मादीचा समागम झाडावर होतो. झाडाची कोवळी पाने ते खातात. सकाळी सूर्योदयापूर्वी ते झाडावरून परत जमिनीत जातात. मादी जमिनीत साबुदाण्याच्या आकाराची अंडी घालते. एक मादी जमिनीत १० सेंमी. खोलपर्यंत ५०–६० अंडी घालते. भुंगेरे सु. ८० दिवस जगतात. सुमारे १५ दिवसात अंडी उबून अळ्या ( हुमणी) बाहेर पडतात. त्या सुरुवातीला जैवपदार्थांवर जगतात. सुमारे २५ दिवसांनी त्या कात टाकतात. थोडे दिवस जैवपदार्थ जास्त व झाडांचीमुळे कमी खातात. नंतर मात्र मुळे जास्त प्रमाणात खातात. त्यानंतरसु. ३२ दिवसांनी त्या पुन्हा कात टाकतात. ही अवस्था सु. १४० दिवसांची असते. त्यानंतर ते जमिनीतच कोशावस्थेत जातात व ही अवस्था २०–२४ दिवसांची असते. त्यातून भुंगेरे बाहेर पडतात. अशा रीतीने वर्षभरात एकच पिढी पूर्ण होते. भुंगेरे सु. ८० दिवस जगतात. 

 

हुमणी या किडीच्या सु. २०० जातींचा उल्लेख सापडतो. तिच्या नियंत्रणासाठी रात्री बाभूळ, लिंब इ. झाडांवर भुंगेरे बसले असताना ती हालवून खाली पडणारे भुंगेरे जमा करून मारणे किंवा सायंकाळी झाडांवर कीटकनाशके फवारणे यांसारखे उपाय करतात. हुमणीच्या नियंत्रणासाठी पावसाळा सुरू झाल्याबरोबर शेतामध्ये प्रतिहेक्टरी १२५ किग्रॅ. या प्रमाणात १०% बीएचसी भुकटी मिसळतात. तसेच खोल नांगरट करून पिकांची फेरपालट करणे हा हुमणी अळी नियंत्रणाचा प्रभावी उपाय आहे. 

पोखरकर, रा. ना.