टोका : (सोंडा). कोलिऑप्टेरा गणाच्या कुर्कुलिऑनिडी कुलातील हे कीटक असून त्यांच्या तांदळातील टोका (सायटोफायलस ओरिझा) व धान्यातील सोंडा (सायटोफायलस ग्रेनेरियस) या दोन जाती साठविलेल्या धान्यांचे नुकसान करतात. ते मूळचे भारतातील असावेत व त्यांचा प्रसार जगभर सर्वत्र झालेला आहे. ते धान्याची गोदामे, कणग्या, जहाजे अशा ठिकाणी व धान्य बराच काळ हलविले जात नाही अशा ठिकाणी आढळतात. प्रौढ टोका ४-५ मिमी. लांब असून तांबूस तपकिरी, गर्द तपकिरी किंवा जवळजवळ काळ्या रंगाचा असतो. त्याच्या डोक्याच्या भागाचे सोंडेमध्ये रूपांतर झालेले असते. पंखांवर चार फिकट तांबूस किंवा पिवळसर ठिपके असतात. तो उडू शकतो. त्याच्या अळ्या लहान, पांढऱ्या आणि पंखहीन असतात व त्यांचे डोके पिवळे तपकिरी असते.

टोका : (अ) तांदळातील टोका, (आ) धान्यातील सोंडा.

मादी आपल्या सोंडेने धान्याला लहान, गोल भोक पाडते आणि त्यात एक गोल, पांढरे, सु. ०·७ X ०·३ मिमी. आकारमानाचे अंडे घालते व बुळबुळीत पदार्थाने भोक बंद करते. मादी आयुष्यात २५०–४०० अंडी घालते. उन्हाळ्यात सु. चार दिवसांनी व हिवाळ्यात ६–९  दिवसांनी अंडी फुटून त्यांतून अळ्या बाहेर पडतात. अळ्या धान्याला भोके पाडून आतच राहतात व त्यातील पिष्टमय भाग खाऊन दाणे पोकळ करतात. अळी अवस्था १९–३४ दिवस टिकते. कोषावस्था साधारणतः सहा दिवसांची असते पण कधीकधी वीस दिवसांचीही असते. प्रौढ कीटक सरासरीने २–५ महिने जगतो. हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात त्याचे जीवनचक्र अल्प मुदतीचे असते. प्रौढ कीटक अन्नाशिवाय दोन किंवा तीन आठवडे, कधीकधी सात किंवा आठ महिने व क्वचित दोन वर्षांपेक्षा जास्त काळ जगू शकतात.

 

धान्यातील सोंड्याचे जीवनचक्र व सामान्य सवयी तांदळातील टोक्यासारख्या असतात, परंतु तो तांदळातील टोक्यापेक्षा मोठा आणि एकसारख्या तपकिरी रंगाचा असतो. त्याला उडता येत नाही कारण त्याचे पंख एकजीव झालेले असतात.

टोके व त्यांच्या अळ्या गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, बार्ली, ओट यांसारख्या धान्यावर तसेच शेवया, पापड, कुरड्या यांसारख्या पदार्थांवर आपली उपजीविका करतात. त्यामुळे धान्य खाण्यास अयोग्य होते, तसेच ते बी म्हणून वापरण्यास योग्य ठरत नाही. प्रौढांपेक्षा अळ्या जास्त नुकसान करतात. यांच्या नियंत्रणासाठी इडीसीटी, मिथिल ब्रोमाइड, ॲल्युमिनियम फॉस्फाइड यांसारख्या धूम्रकारी रसायनांचा वापर करतात.

जमदाडे, ज. वि.