डास : डास हे आर्थ्रोपोडा (संधिपाद) संघाच्या इन्सेक्टा (कीटक वर्ग) वर्गातील डिप्टेरा गणातल्या क्युलिसिडी या कुलातले कीटक आहेत. हे लहान, सडपातळ व लांबट असून करड्या काळ्या रंगाचे असतात. त्यांच्या सर्व शरीरावर खवले असतात. सामान्यतः दमट व पाणथळ जागी ते असतात. उष्ण कटिबंधात ते मुबलक असतात. सबंध जगात डासाचे सु. ११० वंश व उपवंश असून जवळजवळ २,५०० जाती आहेत. डास जगात सगळीकडे आढळतात पण ध्रुवांच्या भोवतालचा बर्फाळ प्रदेश, अतिशय शुष्क वाळवंटी प्रदेश व ३,६५५–४,२६५ मीटरांपेक्षा जास्त उंचीवरील प्रदेशात ते आढळत नाहीत. ज्या काही प्रदेशांत डास मुळीच नव्हते तेथे माणसांच्यामुळे त्यांचा प्रवेश होऊन ते आता त्या ठिकाणी स्थायिक झाले आहेत.

डास हे चावणारे असल्यामुळे अत्यंत उपद्रवी कीटक आहेत. शिवाय त्यांच्यापैकी पुष्कळ कित्येक रोगांच्या जंतूंचे वाहक असल्यामुळे अनिष्टही आहेत. यांच्या अनेक वंशांपैकी ॲनॉफेलीस, क्युलेक्सईडिस  हे तीन वंश मानवी वैद्यकाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्यामुळे सामान्यतः बहुतेकांना माहीत आहेत. क्युलेक्स हा ⇨ हत्ती रोगाचा डास आहे ॲनॉफेलीस मलेरिया वा ⇨हिवतापाचा डास होय व ईडिसडेंग्यू ज्वर आणि ⇨ पीतज्वर उत्पन्न करणारा डास आहे. या तीन वंशांच्या भारतात आढळणाऱ्या काही जाती पुढील होत : ॲनॉफेलीस : ॲ. स्टीफन्सीस, ॲ. फ्लूव्हिॲटिलिस, ॲ. मिनिमस अ‌ॅ. ऐलगान्स  इत्यादी क्युलेक्स : क्यु. फॅटिगान्स, ईंडिस : ई. ईजिप्टाय (स्टेगोमाया फॅसिएटा).

 

सगळे डास रात्रिंचर असतात अशी समजूत आहे, पण सगळेच डास रात्रिंचर नसतात. ॲनॉफेलीस व क्युलेक्स हे तिन्हीसांजा व रात्री क्रियाशील असतात, पण ईडिस डास व त्याचे काही नातेवाईक दिवसा क्रियाशील असतात. अन्न मिळविण्याकरिता ते रात्री बाहेर पडतात. अन्नाच्या शोधार्थ ते फार दूरवर उडत जाऊ शकतात. डासांच्या माद्या माणसे, पाळीव जनावरे व वन्य प्राणी यांना चावून त्यांचे रक्त शोषून घेऊन त्यावर उपजीविका करतात नर फुलातील मकरंद आणि फळांतील रस चोखून घेऊन त्यावर जगतात म्हणून माणासाच्या दृष्टीने डासांचे नर निरुपद्रवी होत.

शरीररचना : डासाच्या शरीराचे शीर्ष, वक्ष आणि उदर असे तीन भाग पडतात.

शीर्ष अथवा डोके लहान व गोलसर असून आखूड मानेने वक्षाला जोडलेले असते. डोक्यावर पुढील संरचना असतात : (१) दोन पुष्कळ मोठे संयुक्त नेत्र [→ डोळा] असतात. (२) डोळ्यांच्या पुढे पुष्कळ पेरी

आ. १. डासाच्या शरीराची रचना पार्श्व दृश्य : (१) उत्तरोष्ठ, (२) शृंगिका, (३) श्वास रंध्र, (४) अन्नपुट, (५) पंख, (६) संतोलक, (७) उत्सर्जन नलिका, (८) अधर-तंत्रिका रज्जू, (९) लाला ग्रंथी, (१०) अधरोष्ठ, (११) जंभिका-स्पर्शक, (१२) जंभिका, (१३) जिव्हा, (१४) जंभ.

असलेल्या दोन शृंगिका (स्पर्शंद्रिये) असतात दोन पेऱ्यांमधील सांध्याभोवती केसांचे वलय असते. नरामध्ये वलयांचे केस लांब व पुष्कळ असतात त्यामुळे नर सहज ओळखता येतो. (३) उत्तरोष्ठ (वरचा ओठ), जंभ (अन्नाचे तुकडे करणारा अवयव), जंभिका (अन्न ग्रहणात मदत करणारा जंभामागील अवयव), अधरोष्ठ (खालचा ओठ) आणि जिव्हा ही नेहमीची मुखांगे (तोंडाचे अवयव) असतात परंतु अन्न ग्रहण करण्याकरिता त्यांचे परिवर्तन (बदल) होऊन वेधन (भोसकणे) व शोषण यांकरिता त्यांचा शुंड (तोंडाचा शोषक अवयव, सोंड) बनलेला असतो.

उत्तररोष्ठ लांब व टोकदार असून त्याच्या अधर पृष्ठाच्या लांबीभर एक खोबण असते. जिव्हा लांब व चपटी असून ती उत्तरोष्ठाच्या खोबणीवर बरोबर बसते व त्यामुळे एक लांब नळी तयार होऊन तिच्यातून द्रव-अन्न शोषून घेता येते. लाला-वाहिनी (लाळवाहक नलिका)

आ. २. डासाची (मादी) मुखांगे : (१) शीर्ष, (२) मुखपाली, (३) शृंगिका, (४) उत्तरोष्ठ, (५) जंभ, (६) जिव्हा, (७) जंभिका, (८) अधरोष्ठ, (९) जंभिका-स्पर्शक.

सबंध जिव्हेतून जाऊन तिच्या टोकावर उघडते. अधरोष्ठ शुंडाच्या आवरणाचे कार्य करतो. त्याच्या उत्तर पृष्ठाच्या सगळ्या लांबीभर एक मोठी खोबण असते. त्याच्या टोकावर पानांसारखे दोन लहान आखूड

आ. ३. डासाच्या मादीच्या मुखांगांचा आडवा छेद : (१) उत्तरोष्ठ, (२) अधरोष्ठ, (३) जिव्हा, (४) जंभिका, (५) जंभ.

पल्लव असतात त्यांना लॅबेले म्हणतात. जंभ सुईसारखे असून त्यांची टोके तीक्ष्ण आणि दंतुरित (कवरती दातासारखी) असतात, नरामध्ये ते नसतात. जंभिका जंभांसारख्याच पण जाड असतात. अधरोष्ठाच्या उत्तर पृष्ठावर असलेल्या खोल आणि रुंद पन्हाळीत वर उल्लेखिलेली वेधी आणि चूषी (शोषण करणारे) अंगे बसविता येतात. जंभिका-स्पर्शकांचा शुंडामध्ये समावेश होत नाही.

वक्षाचे अग्रवक्ष, मध्यवक्ष आणि पश्चवक्ष असे तीन खंड (भाग) असतात. अग्रवक्ष पुष्कळच लहान असतो. मध्यवक्ष सगळ्यात मोठा असून त्यावर दोन अतिशय पातळ, नाजूक व पारदर्शक पंख असतात. पंखांवर खवले असतात. पश्चवक्षदेखील लहान असून काहीसा नाळाच्या आकाराचा असतो. त्याच्यावर संतोलकांची (तोल सांभाळण्यास उपयोगी पडणाऱ्या अवयवांची) एक जोडी असते. वक्षाच्या तिन्ही खंडांवर खालच्या बाजूला प्रत्येकी लांब पायांची एक जोडी असते. वक्षप्रदेशाच्या पार्श्वकांमध्ये (शरीर खंडांच्या बाजूच्या भिंतींमध्ये) श्वास रंध्रांच्या (श्वसन छिद्रांच्या) दोन जोड्या असतात. 


 उदर आठ खंडांचे बनलेले असून वक्षापेक्षा जास्त सडपातळ असते. नराच्या शेवटच्या उदर-खंडावर दोन अंकुशयुक्त (आकडा असलेले) आलिंगक (आलिंगन देण्यास उपयोगी पडणारे अवयव) असतात आणि मादीच्या त्याच भागावर चपटे अंडनिक्षेपक (अंडी घालण्याची साधने) असतात. गुदद्वार आणि जनन-रंध्र (जननेंद्रिये शरीराबाहेर उघडणारे छिद्र) शेवटच्या खंडावरच असतात पण जनन-रंध्र गुदद्वाराच्या खाली असते. उदर-पार्श्वकांमध्ये श्वास रंध्राच्या सहा जोड्या असतात.

 

डासाची मादी प्राण्यांचे रक्त आणि नर फुलातला मध व फळांतला रस यांवर उपजीविका करतात. प्राण्याची त्वचा वेधून रक्त शोषून घेण्याकरिता मादी आपल्या शुंडाचे टोक प्राण्याच्या त्वचेवर टेकते आणि अधरोष्ठाच्या टोकावर असलेले लॅबेले दोन्ही बाजूंना पसरून त्वचेवर घट्ट दाबून धरते. जंभ आणि जंभिका त्वचेला भोक पाडून आत खोलवर शिरतात व तेथे असलेल्या रुधिर-केशिकांना (सूक्ष्म रक्तवाहिन्यांना) टोचून छिद्रे पाडतात. मादी जिव्हेतून जखमेत लाळ सोडते. ती रक्तात मिसळते आणि त्यामुळे रक्त साखळत नाही. उत्तरोष्ठाच्या पन्हळीवर जिव्हा घट्ट बसते व त्यामुळे तयार झालेल्या नळीतून रक्त शोषले जाते. डासांच्या बहुतेक जातींच्या माद्यांना आपली अंडी पक्व होण्याकरिता मनुष्यादी प्राण्यांच्या रक्तातील प्रथिनांची आवश्यकता असते पण संशोधनावरून असेही दिसून आले आहे की, काही जातींच्या माद्यांना याकरिता रक्ताची आवश्यकता नसते. त्या शरीरात साठविलेली चरबी आणि प्रथिने यांच्यापासून अंडी उत्पन्न करण्याकरिता लागणारे द्रव्य तयार करतात. नरांचे सगळे मुखांग-घटक मादीच्यासारखेच असतात, परंतु त्यांचे आकार वेगळे असतात.

फार दूर अंतरावरून मादीला पोषकाचा शोध लागतो किंवा नाही आणि लागत असला, तर कसा लागतो याविषयी नक्की काहीच माहिती नाही पण जवळपास असणाऱ्या पोषकांचे स्थान तिला नक्की कळू शकते. पोषकाच्या चयापचय क्रियेमुळे (शरीरात होणाऱ्या भौतिक-रासायनिक घडामोडींमुळे) नैसर्गिक रीत्या उत्पन्न होणारी उष्णता, आर्द्रता व कार्बन डाय-ऑक्साइड वायू आणि शरीराचा गंध या गोष्टींमुळे डासाची मादी पोषकाकडे आकर्षिली जाते व तिला त्याच्या जागेचे नक्की ज्ञान होते.

जीवनवृत्त : डास भिन्नलिंगी आहेत. हवेत उडत असतानाच नर आणि मादी यांचे मैथुन होते. रात्रिंचर डासांचे मैथुन रात्री व दिनचर डासांचे दिवसा होते. तसेच रात्रिंचरांच्या माद्या रात्री व दिनचरांच्या माद्या दिवसा अंडी घालतात. मादी पाण्यात अंडी घालते. क्युलेक्स मादी एका वेळी २००–३०० अंडी घालते. ती एके ठिकाणी चिकटवलेली असून पाण्यावर तरंगत असतात. अंडे खालच्या टोकाकडे गोलसर व रुंद आणि

आ. ४. डासांची अंडी : (अ) पाण्याच्या पृष्ठावर तरंगणारा क्युलेक्साच्या अंड्यांचा समूह (आ) क्युलेक्साचे एक अंडे (इ) ॲनॉफेलिसाचे एक अंडे, उत्तर दृश्य (ई) ॲनॉफेलिसाचे अंडे, पार्श्व दृश्य (उ) ईडिसाचे अंडे.

वरच्या टोकाकडे निमुळते असते. ॲनॉफेलीस आणि ईडिस यांची अंडी सुटी (एकएक अलग) घातलेली असतात. ॲनॉफेलिसाचे अंडे होडीच्या आकाराचे असते. त्याच्या दोन्ही बाजूंना हवेने भरलेला एकएक प्लव असतो व त्यामुळे अंडे पाण्यावर तरंगते. दोन-तीन दिवसांनी अंडी फुटून त्यांतून डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्था) बाहेर पडतात.

डिंभ : डिंभ प्रौढासारखा मुळीच नसतो. तो अळीसारखा लांबट असून जलचर असतो व शरीराला हिसके देत पोहतो. शीर्ष, वक्ष आणि उदर असे शरीराचे तीन स्पष्ट भाग असतात. शीर्ष मोठे असून त्यावर दोन संयुक्त नेत्र, दोन अक्षिका (नेत्राकार रंगीत ठिपके), पेरी असलेल्या दोन शृंगिका आणि मुखांगे असतात. सूक्ष्म वनस्पती आणि प्राणी हे यांचे भक्ष्य होय. मुखाच्या दोन्ही बाजूंना केसाचे कुंचले अथवा अशन-कूर्च असतात. हे कुंचले भक्ष्य मुखात ढकलतात. जंभ, जंभिका आणि अधरोष्ठ यांचा उपयोग भक्ष्याचे तुकडे करून ते चावून खाण्याकरिता होतो. वक्ष गोलसर असून शीर्षापेक्षा रुंद असते. त्याचे खंड पडलेले नसून त्यावर अवयव नसतात, पण लांब केसांच्या झुबक्यांच्या तीन जोड्या असतात.


उदराचे नऊ खंड असून प्रत्येकाच्या पार्श्व बाजूंवर रोमांच्या झुबक्यांची एक जोडी असते. क्युलेक्साच्या 

आ. ५. डासांचे डिंभ : (अ) क्युलेक्साचा डिंभ : (१) श्वास रंध्रे, (२) श्वसन-निनाल, (३) अक्षिका, (४) संयुक्त नेत्र, (५) शृंगिका, (६) अशन—कूर्च, (७) शीर्ष, (८) वक्ष, (९) श्वासनाल-क्लोम (आ) ॲनॉफेलिसाचा डिंभ : (१) संयुक्त नेत्र, (२) शृंगिका, (३) अशन—कूर्च, (४) शीर्ष, (५) वक्ष, (६) करतलाकृती केस, (७) श्वासनाल-क्लोम, (८) नववा उदर-खंड, (९) दोन श्वास रंध्रे, (१०) आठवा उदर-खंड, (११) पहिला उदर-खंड.

डिंभात आठव्या उदर-खंडाच्या उत्तर पृष्ठावरून पुढे आलेली एक नळी किंवा निनाल असतो. त्याच्या टोकावर दोन श्वास रंध्रे उघडतात. ही झडपांनी बंद करता येतात. या रंध्रांच्या द्वारे शरीरातील श्वासनाल (श्वास-नलिका) बाहेर उघडतात. श्वसनक्रियेत निनाल पाण्याच्या पृष्ठाशी काटकोन करून थोडासा पृष्ठाच्या बाहेर काढलेला असतो. त्यामुळे डिंभ डोके खाली करून पाण्यात तिरकस लोंबकळत असतो. ॲनॉफेलिसाच्या डिंभात निनाल नसतो, श्वासनाल आठव्या उदर-खंडाच्या उत्तर पृष्ठावर दोन छिद्रांनी उघडतात. ही छिद्रे शरीराच्या सपाटीवरच असतात, म्हणून श्वसनाच्या वेळी ही छिद्रे पाण्याच्या पृष्ठावर ठेवण्याकरिता या डिंभाला आपले शरीर पाण्याच्या पृष्ठाला चिकटून समांतर ठेवावे लागते. ॲनॉफेलिस डिंभाच्या काही उदर-खंडांच्या उत्तर पृष्ठावर करतलाकृती (हस्ताकृती) केसांच्या जोड्या असतात. क्युलेक्स आणि ॲनॉफेलिस डिंभांच्या पश्च टोकांवर (नववा खंड) रोमांचे दोन जुडगे (पोहोण्याकरिता) आणि चार पर्णाकृती श्वासनाल-क्लोम (साहाय्यक श्वसनांगे) असतात. डिंभ तीन-चार वेळा कात टाकतो आणि सु. ८–१० दिवसांनी ह्याचे कोशात (प्यूपात) रूपांतर होते.

कोश : पुष्कळ कीटकांचा कोश निष्क्रिय असतो, परंतु डासांचा कोश पोहू शकतो. शरीर स्वल्पविराम चिन्हासारखे (,) असते व त्याचे दोन भाग असतात. पहिला पुष्कळ मोठा व काहीसा वाटोळा शिरोवक्ष आणि

आ. ६. डासांचे कोश : (अ) क्युलेक्साचा कोश (आ) ॲनॉफेलिसाचा कोश : (१) श्वसन-तूर्य, (२) शिरोवक्ष, (३) शृंगिका, (४) अक्षिका, (५) संयुक्त नेत्र, (६) उपांगांचे अल्पविकस, (७) नववा उदर-खंड, (८) वल्ही.

दुसरा सडपातळ व वाकलेला उदर. शिरोवक्ष हा शीर्ष आणि वक्ष यांच्या एकीकरणाने बनलेला असतो. त्याचे खंड पडलेले नसतात. उदर नऊ खंडांचे बनलेले असते. ॲनॉफेलिसाच्या कोशाच्या उदरखंडांवर करतलाकृती केस असतात. उदराच्या आठव्या खंडावर दोन पर्णाकृती संरचना असतात त्यांचा पोहोण्याच्या कामी वल्ह्यासारखा उपयोग होतो. वक्षाच्या उत्तरपृष्ठावर तुतारीसारख्या दोन आखूड नळ्या (श्वसन-तूर्य) असतात, त्यांमधून तो श्वसनाकरिता हवा घेतो. कोशाला मुख व गुदद्वार नसल्यामुळे त्याला काही खाता येत नाही. कोशाच्या शरीरात असामान्य फेरबदल होत असतात. डिंभाच्या अंगाचे विघटन होऊन त्यापासून दुधासारखा पांढरा लगदा बनतो व या लगद्यापासून प्रौढाची अंगे तयार होतात. कोशाच्या आत तयार होत असलेली किंवा तयार झालेली शृंगिका, डोळे, घडी पडलेले पंख आणि पाय यांच्यासारखी काही अंगे शरीरावरील पातळ उपत्वचीय आवरणातून दिसतात. दोन किंवा तीन दिवसांनी शरीरावरील उपत्वचेच्या आवरणाला पाठीवर चीर पडून ते फाटते आणि पूर्ण तयार झालेला प्रौढ डास बाहेर पडतो. प्रौढ डासांच्या बसण्याच्या पद्धतीवरून ते क्युलेक्स अथवा ॲनॉफेलिस वंशाचे आहेत, हे कळू शकते. क्युलेक्स जेथे बसतो त्या पृष्ठापासून त्याचे डोके आणि शरीराचे मागचे टोक ही समांतर असतात आणि शरीराला पोक असल्यासारखे दिसते. ॲनॉफेलिसाचे शरीर तो ज्या पृष्ठावर बसतो त्या पृष्ठाशी लघुकोन करते.

नियंत्रण : डासांपासून रोग होऊ नयेत म्हणून त्यांचे नियंत्रण करणे किंवा नाश करणे हे महत्त्वाचे आहे. आधुनिक कीटकनाशके उपयोगात येण्यपूर्वी डासांचे नियंत्रण पुष्कळ वेगवेगळ्या रीतीने केले जात असे.

आ. ७. प्रौढ डास : (अ) क्युलेक्स, (आ) ॲनॉफेलिस.

गटारे स्वच्छ राखणे, डासांना अंडी घालता येऊ नयेत म्हणून अशा जागा नाहीशा करून त्या जागी भाजीपाला लावणे, डासांचे डिंभ खाणारे मासे पाण्यात सोडणे, घराच्या खिडक्यांना जाळ्या बसविणे, मच्छरदाण्या वापरणे वगैरे गोष्टींचा उपयोग केला जात असे. आजही वरील सर्व रीती उपयोगात आणल्या जातात. नवीन कीटकनाशकांमुळे डासांच्या नियंत्रणात क्रांती घडून आली आहे. डी डी टी, क्लोरडान, हेप्टाक्लोर इ. कीटकनाशके घराच्या भिंती, छत व इतर भाग यांवर फवारल्याने डासांचा नाश होतो [⟶ कीटकनाशके कीटक नियंत्रण].

पहा : हिवताप.

संदर्भ :1. Bedi, Y. P. Hand-Book of Hygiene and Public Health, Amritsar, 1962.

           2. Karve, J. N. Lower Biology, Vol. I,  Poona, 1959.

 कर्वे, ज. नी. टोणपी, गो. त.