काष्ठकीटक : सामान्यतः लाकडी सामान, इमारती लाकूड व इतर लाकडी वस्तूंचा संहार करणाऱ्या विविध भुंग्यांच्या अळ्यांना काष्ठकीटक म्हणतात. त्या ॲनोबायडी आणि लिक्टिडी (गण-कोलिऑप्टेरा) कुलांत मोडतात. लाकडी सामानावरील भुंगा (ॲनोबियस पंक्टॅटम) हा सर्वत्र आढळतो. त्याची लांबी तीन-पाच मिमी. व रंग तांबूस किंवा गर्द भुरा असतो. ते लाकडाच्या भेगा व फटींमध्ये अंडी घालतात. अळ्या भोके पाडून लाकडाचा भुगा करतात. भुंगे लाकडाच्या पृष्ठभागापर्यंत भोक पाडून त्यातून बाहेर पडतात. भोकाचा व्यास ३ मिमी. असून त्याला कीटकछिद्र म्हणतात. झोस्टोबियम खावेव्हिलोझम (डेथ वॉच बिटल) हा भुंगा बराच मोठा असून त्याची लांबी सहा–नऊ मिमी. असते. तो यूरोपात सर्वत्र आढळतो. तो रापविलेले कठीण लाकूड, लाकडी सामान आणि प्राचीन इमारतींच्या लाकडाचे अतोनात नुकसान करतो. इंग्लंडमधील यॉर्क कॅथेड्रल व वेस्ट मिनिस्टर हॉल यांसारख्या प्रसिद्ध व जुन्या इमारतींच्या छपराच्या लाकडाचा नाश यांच्यामुळेच झाला आहे. लाकडाला भोक पाडण्यासाठी हा भुंगा आपले डोके एकसारखे त्यावर आपटीत असतो त्यामुळे होणाऱ्या आवाजाने तो भिन्न लिंगाच्या भुंग्याला आकर्षित करीत असावा असे कीटकशास्त्रज्ञांचे मत आहे. लिक्टिडी कुलाच्या लिक्टस  वंशातील पुष्कळ जाती संहारक आहेत. त्या `पावडरपोस्ट भुंगा’ या सामान्य नावाने ओळखल्या जातात. त्या प्रामुख्याने ओक लाकडाच्या भेगांत व चिरांत अंडी घालतात. अळ्या रसकाष्ठालाच (काष्ठमय वनस्पतींमध्ये प्रकाष्ठाच्या सर्व पृष्ठभागावर नव्यानेच तयार झालेल्या द्वितीयक काष्ठाच्या थराला) भोके पाडतात. त्या वखारीतील लाकडाचा व त्यापासून केलेल्या वस्तूंचा नाश करतात. भारतातील काळा भुंगा कळक, आंबा, बाभूळ यांच्या लाकडाला भोके पाडतो. उंबर व करंजाच्या लाकडाला फारच लवकर कीड लागते. या कीटकांच्या बंदोबस्तासाठी लाकडाच्या भेगांना, चिरांना व जोडांना ब्रशाने व्हार्निश अथवा रंगलेप लावणे, लाकडी सामानास कीटकनाशकांची (उदा.,मिथिल ब्रोमाइडाची) धूरी देणे अथवा डीडीटी व लिंडेन ह्या कीटकनाशकांच्या तेलातील द्रावणांचा लाकडी सामानावर फवारा मारणे इ.उपाय प्रचलित आहेत.

जमदाडे, ज.वि.