मधुरस : मावा, तुडतुडे, खवले किडे इ. हेमिप्टेरा गणातील विशिष्ट कीटक वनस्पतींतील रस शोषतात. हा रस जेव्हा जरूरीपेक्षा जास्त प्रमाणात शोषण केला जातो, तेव्हा या जादा रसाचे कीटकाच्या गुदद्वारामार्गे उत्सर्जन केले जाते. या उत्सर्जित, चिकट, गोड (शर्करायुक्त) पदार्थांस मधुरस म्हणतात (फुलांतील गोड पदार्थांसही ’मधुरस’ ही संज्ञा वापरण्यात येते). या मधुरसातील घटक द्रव्ये आश्रयी वनस्पतीच्या रसातील द्रव्ये तसेच त्यांवर कीटकाच्या पचनक्रियेत होणारा परिणाम यांवर अवलंबून असतात. मधुररसात पाणी भरपूर प्रमाणात असते, तसेच ग्‍लुटामीन व अस्परजिन या अमिनो अम्‍लांचा आणि सुक्रोज, फ्रुक्टोज, ग्‍लुकोज व मेलिझायटोज या शर्करांचाही त्यात अंतर्भाव असतो. या मधुरसामुळे झाडावर चिकटा येतो व या चिकट्याभोवती काजळीसारखी बुरशी वाढून पिकांचे (उदा., ज्वारीच्या पिकाचे) नुकसान होते.

हायमेनॉप्टेरा व डिप्टेरा गणांतील कीटक आणि त्यातल्या त्यात मुंग्या हा मधुरस अन्न म्हणून वापरतात. काही मुंग्या गवताच्या मुळांवर राहणाऱ्या माव्याचा मधुरस गोळा करतात तर काही मावा कीटकास पकडून आपल्या वारूळात आणतात व दुभत्या जनावराप्रमाणे त्याचे संगोपन करतात. पर्यायाने त्यांना माव्यापासून मधुरस मिळतो. माव्याच्या अंड्यांची देखभाल व त्यांतून बाहेर पडलेल्या माव्याच्या पिलांची देखभाल हीसुध्दा मुंग्यांकडून होते. सिनाई पर्वतावरील व इराकच्या काही भागातील अरब लोक मधुरसाचा साखरेऐवजी वापर करतात.

खैरे, शां. ना.