कीटकविज्ञान : कीटकांच्या सखोल आणि सुसंगत अभ्यासाला कीटकविज्ञान म्हणतात. कीटकविज्ञान ही प्राणिशास्राची एक शाखा असून तीत कीटकांची शरीररचना, निरनिराळ्या अंगांचे कार्य, त्यांच्या सवयी, त्यांचे परस्परसंबंध, परिस्थितीशी असणारे त्यांचे संबंध आणि तिचे त्यांच्यावर होणारे परिणाम, शरीराची वाढ, कीटकांचा प्रसार, क्रमविकास (उत्क्रांती), त्यांच्यापासून होणारे फायदेतोटे, त्यांचे नियंत्रण इ. अनेक गोष्टींचा विचार करण्यात येतो.

‍ॲरिस्टॉटल या ग्रीक तत्त्ववेत्त्यांना कीटकविज्ञानाचे जनक मानतात कारण त्यांनी इ. स. पू. ३८४–३२२ ह्या काळात लिहिलेल्या De Animalibus Historiae या ग्रंथात कीटकांविषयी माहिती लिहून कीटकविज्ञानाचा पाया घातला. तथापि, सतराव्या शतकापर्यंत कीटकविज्ञान अप्रगल्भावस्थेतच होते. इ. स. १६०२ मध्ये कीटकविज्ञानावर पहिले पुस्तक लिहिण्यात आले. ऊलीसे आल्ड्रोव्हांडी (१५२२–१६०५) यांना आधुनिक कीटकविज्ञानाचे जनक मानले जाते. तदनंतर टॉमस मोफेट, जॉन जॉन्स्टन, लिओनॉर्ड बाल्डनर इ. शास्त्रज्ञांनी या शास्त्रात मोलाची भर घातली. लेव्हेनहूक (१६३२–१७२३) या संशोधकांच्या सूक्ष्मदर्शकाच्या शोधाने तर या शास्त्राची झपाट्याने वाढ होत गेली. याच सुमारास मालपिगी व स्वामरडाम या शास्त्रज्ञांनी कीटकांच्या शरीराच्या आंतर-संरचनेचा अभ्यास केला. फ्रेंच शास्त्रज्ञ रोमर (१६८३–१७५७) यांनी कीटकविज्ञानावर अत्यंत उपयुक्त सहा ग्रंथ लिहून प्रसिध्द केले.

अठरावे शतक जीवशास्त्राच्या इतिहासात फार महत्त्वाचे समजले जाते कारण याच शतकामध्ये वनस्पती आणि प्राणी यांचे शास्त्रीय पध्दतीने वर्गीकरण करण्यास सुरुवात झाली. लिनीअस (१७०७–७८) या शास्त्रज्ञानी १७५८ मध्ये प्रत्येक जीवाला द्विनाम (पहिले वंशवाचक व दुसरे जातिवाचक नाव देऊन सजीवांचे नामकरण करण्याच्या) पध्दतीचे शास्त्रीय नाव देण्याची प्रथा सुरू केली व ती आजतागायत सुरू आहे. स्वत: लिनीअन यांनी कीटकांच्या सु. २,००० जातींना अशी नावे दिली. त्यांच्या या बहुमोल कामगिरीमुळे त्यांना कीटकवर्गीकरणशास्त्राचे जनक म्हणतात. त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य फाब्रीत्सीउस यांनी वर्गीकरणशास्त्रावर Systema Entomologiae हा ग्रंथ १७७५ मध्ये प्रसिध्द केला. कीटकांचा सांगोपांग अभ्यास करून त्यांनी कीटकांची एकूण १३ गणांमध्ये विभागणी केली. सतराव्या शतकापर्यंत संधिपाद (आथ्रोपोडा) संघातील सर्वच प्राण्यांना कीटक समजण्यात येई. परंतु लात्र्ये या फ्रेंच शास्त्रज्ञांनी कीटकाविषयींच्या कल्पनेत आमूलाग्र बदल घडवून आणला आणि संधिपाद संघातील प्राण्यांचे क्रस्टेशिया (कवचधारी), ॲरॅक्निडा (अष्टपाद वर्ग) आणि हेक्झापोडा (षट्पाद वर्ग) असे एकंदर तीन विभाग पाडले.

एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी लाकॉर्देर या फ्रेंच शास्त्रज्ञांनी कोलिऑप्टेरा या गणातील कीटकांच्या अभ्यासाला सुरुवात केली. याच सुमारास जर्मनीत बरसूस्टर (१७७७–१८९२) यांनी कीटक वर्गीकरणशास्त्रात भर घातली. तसेच इग्लंडमध्येही कीटकविज्ञानाची झपाट्याने प्रगती होण्यास ब्लीच (१७९०–१८३६), वेस्टवुड (१८०५–९३) आणि मॅक्ले ह्या शास्त्रज्ञांचे प्रयत्न कारणीभूत झाले.

कीटकविज्ञानाची भरभराट एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेत प्रामुख्याने झाली. टॉमस से या शास्त्रज्ञांनी १८१७–२८ ह्या काळात उत्तर अमेरिकेतील कीटकांचा अभ्यास करून वर्गीकरणविषयक ज्ञानात भर घातली. १८२३ मध्ये हॅरिस या शास्त्रज्ञांनी कीटकांचे जीवनवृत्त आणि आर्थिक महत्त्व यांविषयी महत्त्वाची माहिती प्रसिद्ध केली. यानंतरच्या काळात एसा फिच, रायली, हॉवर्ड इ. शास्त्रज्ञांमुळे कीटकविज्ञानात महत्त्वाची भर पडली.

विसाव्या शतकात कार्बनी (सेंद्रिय) कीटकनाशकांचा (कीटकांचा नाश करणाऱ्या द्रव्यांचा) शोध लागल्यामुळे कीटकविज्ञानात मोठी क्रांती घडून आली. पॉल म्यूलर या शास्त्रज्ञाने डीडीटीच्या कीटकनाशक गुणधर्मांचा १९३९ मध्ये शोध लावला आणि त्यानंतर अनेक कीटकनाशकेही याच शतकात तयार झाली. कीटक नियंत्रणातील काही मूलभूत बाबींचा अभ्यास करण्याकरिता अणुऊर्जेचाही उपयोग करण्यात येऊ लागला. कीटकविज्ञानाच्या निरनिराळ्या शाखांच्या तपशीलवार अभ्यासालाही ह्याच शतकात सुरुवात झाली, उदा., स्नॉडग्रास यांनी कीटकांच्या आकारिकीवर (आकारविज्ञानावर) एक पुस्तक लिहून १९३५ मध्ये प्रसिद्ध केले त्याचप्रमाणे विगल्सवर्थ, रोडर इ. शास्त्रज्ञांनी कीटकाच्या शरीरक्रियाविज्ञानात मोलाची भर घातली. वर्गीकरणाच्या बाबतीतही हँडलीर्श, इम्स, कामस्टॉक, वेबर, एसिग इ. अनेक शास्त्रज्ञांनी बहुमोल कार्य केले आहे. कीटकविषविज्ञानावरही बरेच भरीव कार्य झालेले असून त्याचे श्रेय कर्न्स, मेटकाफ इ. शास्त्रज्ञांना दिले पाहिजे. कीड नियंत्रणाच्या काही नवीन पद्धतींचाही शोध याच शतकात लागला. निपलिंग यांनी पाळीव जनावरांना उपद्रव देणाऱ्या स्क्रूवर्म नावाच्या कीडींचा क्लीबीकरण (निर्बीजीकरण) पद्धतीने बंदोबस्त करण्यात यश मिळविले. पिकांवर पडणाऱ्या किडींच्या बंदोबस्तासाठीही या पद्धतीचा उपयोग करण्यात आला.

भारतातील कीटकविज्ञानाची प्रगती : अतिप्राचीन भारतीय वाङ्‍मयात कीटकांचा उल्लेख आढळून येतो. मधमाश्यांपासून मिळणाऱ्या मधासंबंधीही माहिती दिलेली आढळते. अथर्ववेदात कीटकांच्या नियंत्रणाविषयी माहिती देण्यात आली आहे. रेशमाच्या किड्यांपासून रेशीम तयार करण्याची विद्या भारतीयांना अतिप्राचीन काळापासून अवगत होती. एका भारतीय राजाने इ.स. पू. ३८७० मध्ये एका पर्शियन अधिपतीस रेशमी वस्त्रांची भेट पाठविल्याचा उल्लेख आढळतो. कौरवांनी पांडवांच्या नाशासाठी बांधलेल्या लाक्षागृहाची महाभारतातील गोष्ट सुपरिचित आहे.

मांडव्य मुनींनी बाभळीच्या काट्यांना कीटक टोचून त्यांचा अभ्यास केल्याचा उल्लेख महाभारतात आहे. अशा तऱ्हेने जगातील पहिले कीटकशास्त्रज्ञ होण्याचा बहुमान त्यांच्याकडे जातो. उपयुक्त कीटकांची माहिती प्राचीन काळापासून उपलब्ध असली, तरी अपायकारक कीटकांसंबंधीचे ज्ञान अत्यल्प होते. पिकांवर कीड पडणे हा ईश्वरी कोप आहे असेही समजले जात असे.

भारतात आधुनिक कीटकविज्ञानाचा पाया अठराव्या शतकात लिनीअस यांचे शिष्य कनीग यांनी घातला. दक्षिण भारतातील आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेक कीटकांचा अभ्यास केला. १८७५ मध्ये कलकत्ता येथे इंडियन म्युझियम व १८८३ मध्ये मुंबईस बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटीची स्थापना करण्यात आल्यामुळे या विषयाच्या अभ्यासास चालना मिळाली. अनेक परदेशी शास्त्रज्ञांनी भारतातील कीटकांचा अभ्यास केला व फॉना ऑफ ब्रिटीश इंडिया  या ग्रंथमालेच्या खंडांतून ती माहिती प्रसिद्ध करण्यात आली. बिहारमधील पुसा येथील ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्टिट्यूटमध्ये १९०१ साली लायोनेल द नाइसव्हिल यांना पहिले कीटकशास्त्रज्ञ म्हणून नेमण्यात आले. त्यानंतर १९०३ साली लेफ्रॉय यांची त्या जागी नेमणूक करण्यात आली.  भारतीय कीटकशास्त्रज्ञांत लेफ्रॉय यांचे स्थान फार वरचे आहे. भारतात आढळून येणाऱ्या कीटकांविषयी इंडियन इन्सेक्ट लाइफ  हे पुस्तक त्यांनी १९०९ साली प्रसिद्ध केले. तदनंतर फ्लेचर यांची या पदावर नेमणूक झाली. त्यांनी कॅटलॉग ऑफ इंडियन इन्सेक्टस या मालिकेद्वारा भारतातील कीटकांविषयी सविस्तर माहिती प्रसिद्ध केली. समसाऊथ इंडियन इन्सेक्ट्स‌  हे त्यांचे पुस्तक १९१४ साली प्रसिद्ध झाले. यांशिवाय रामकृष्ण अय्यर, रामचंद्र राव, अफजल हुसेन इ. शास्त्रज्ञांनी भारतीय कीटकविज्ञानात मोलाची भर घातली आहे. १९३८ साली एंटॉमॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली आणि १९३९ साली या संस्थेने कीटकविज्ञानामध्ये होणाऱ्या संशोधनकार्याची माहिती प्रसिद्ध करण्यासाठी इंडियन जर्नल ऑफ एंटॉमॉलॉजी  हे नियतकालिक सुरू केले.

 


 

कीटकविज्ञानाच्या शाखा : कीटकांच्या सांगोपांग अभ्यासाने कीटकविज्ञानाच्या निरनिराळ्या शाखांची वृद्धी होऊन त्यांचा स्वतंत्रपणे अभ्यास करण्यात येत आहे. उदा., कीटक शारीर (शरीररचनाशास्त्र), कीटकवर्गीकरणशास्त्र, कीटक–शरीरक्रियाविज्ञान, आर्थिक कीटकविज्ञान इत्यादी. 

मधमाश्या, रेशमाचे किडे, लाखेचे कीटक, परागण (परागसिंचन) करणारे कीटक वगैरे उपयुक्त कीटक होत. पिकांचे, अन्नधान्याचे व इतर मालाचे नुकसान करणारेही कीटक आहेत  त्याचप्रमाणे जनावरे व इतर प्राण्यांना त्रास देणारे कीटकही आहेत. हे सगळे उपद्रवी कीटक होत. यासाठी त्यांचे नियंत्रण किंवा नाश करणे व उपयुक्त कीटकांपासून जास्तीत जास्त फायदा करून घेणे हे कृषि-अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. 

दोरगे, सं. कृ.

 

आर्थिक कीटकविज्ञान : ज्या कीटकांपासून उपयोगी वस्तू मिळतात किंवा ज्यांची आपल्याला मदत होते किंवा ज्यांच्यामुळे आपला फायदा होतो, अशा सर्व कीटकांना उपयुक्त कीटक म्हणतात. याच्या उलट ज्यांच्यामुळे पिके, धान्य, फळे किंवा इतर खाद्यपदार्थ यांचा नाश होतो किंवा ज्यांच्यामुळे रोगांचा प्रसार होतो अशा सर्व कीटकांना अपायकारक कीटक म्हणतात. उपयुक्त आणि अपायकारक कीटकांच्या अभ्यासाला आर्थिक कीटकविज्ञान असे नाव दिले आहे. फोबर्स या शास्त्रज्ञांचे असे मत आहे की, मानव आणि कीटक यांच्यात अनादि कालापासून एक प्रकारचे युद्ध चालू असून ते अंनत काळ टिकणारे आहे. या युद्धाचे मुख्य कारण म्हणजे एकाच प्रकारच्या अन्नासाठी मानव व कीटक यांच्यात चालू असणारी चढाओढ होय. या चढाओढीत कीटक सर्वश्रेष्ठ ठरले आहेत.

कीटक मानवापेक्षा फार चिवट असून प्रतिकूल परिस्थितीशी मोठ्या धैर्याने टक्कर देणारे आहेत. लाखो वर्षांपूर्वी कीटक या भूतलावर प्रथम निर्माण झाले. मानवाच्या निर्मितीला फक्त पाच लाख वर्षेच झाली आहेत. मानवाने कुत्रा, घोडा इ. प्राणी फार पूर्वी माणसाळविले परंतु रेशमाचे किडे फक्त ५,८०० वर्षांपूर्वीपासूनच पाळायला सुरुवात केली.

मानवाच्या सुदैवाने कीटकांच्या सु. सात लक्ष जातींपैकी फारच थोड्या अपायकारक आहेत व बऱ्याच उपयुक्त आहेत. जेव्हा एखाद्या जातीचे कीटक बहुसंख्येने आढळून शेतातले पीक,साठविलेले धान्य, पाळीव प्राणी इत्यादींची लक्षणीय नुकसानी करतात तेव्हा त्यांना उपद्रवी कीटक असे म्हणतात. कीटकांनी नष्ट केलेले पीक, धान्ये, पाळीव प्राणी, खाद्यपदार्थ इ. वस्तूंची किंमत प्रतिवर्षी कोट्यवधी रुपये होते.

निरनिराळे उपद्रवी कीटक झाडांचे विविध भाग खातात. वाळवी व भुंगेरे (मुद्गल) मुळे खातात खोडकिडे खोड पोखरतात  फळातील अळ्या फळे पोखरतात अळ्या, भुंगेरे आणि टोळ पाने खातात भुंगे फुलांचे भाग खातात काही भुंगेरे साल खातात. याखेरीच कित्येक कीटक धान्याचे नुकसान करतात तर इतर काही झाडांचे रोग पसरवितात. 

अनेक प्रकारच्या साथीच्या रोगांचे जंतू कीटकांमुळे पसरतात उदा., डासांमुळे हिवताप, पीतज्वर, हत्तीरोग (श्लीपद) इ. माश्यांमुळे पटकी, आमांश शरीरावरील उवांमुळे प्रलापक सन्निपात ज्वर (टायफस ज्वर), पिसवांमुळे प्लेग. याच कीटकांमुळे जनावरांचेही विविध रोग फैलावतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजाप्रमाणे जगातील माणसाचे ५०% मृत्यू कीटकांनी पसरविलेल्या साथीच्या रोगांमुळे होतात.

असे जरी असले तरी कित्येक कीटक मानवाच्या उपयोगीही पडतात. फुलपाखरे, मधमाश्या इ. कीटकांनी परागण केले नसते तर कित्येक फुलांमध्ये फलधारणा झाली नसती. विविध भुंगेरे कुजकेनासके पदार्थ खाऊन फस्त करतात. कोचिनिअल कीटकांमुळे निवडुंगाची रानेच्या राने नष्ट झालेली आहेत. औषधी मध व मेण हे उपयोगी पदार्थ मधमाश्यांमुळे मानवाला मिळतात. रेशमाच्या किड्यांनी बनविलेला रेशमी धागा वस्त्रे विणण्यासाठी उपयोगी पडतो. लाखेच्या किड्यांनी उत्पन्न केलेल्या लाखेपासून अनेक उपयुक्त वस्तू तयार करता येतात. यावरून असे दिसून येईल की, अनेक कीटक मानवाला हानिकारक असले, तरी विविध विषारी द्रव्ये वापरून किंवा इतर उपाय योजून त्यांचा नायनाट करता येणे शक्य आहे. उलट, मानवाला उपयुक्त असणाऱ्या कीटकांची योग्य जोपासना करून अनेक फायदेही मिळविता येणे शक्य आहे.

वैद्यकीय कीटकविज्ञान : कीटकांपासून मानवाला होणाऱ्या रोगांचे संशोधन वैद्यकशास्त्रात केले जाते. या संशोधनातूनच वैद्यकीय कीटकविज्ञान ही स्वतंत्र आणि महत्त्वाची शाखा निर्माण झाली आहे. सर पॅट्रिक मॅन्सन (१८४४–१९२२) या शास्त्रज्ञांनी डासांमुळे हत्तीरोगाचा प्रसार होतो असे प्रथम सिद्ध केले. हिवतापाचा प्रसारही डासच करतात असे त्यांचे मत होते. परंतु रॉनल्ड रॉस (१८५७–१९३२) यांनी ॲनॉफेलिस जातीचेच डास हिवतापाचा प्रसार करतात असे सिद्ध केले. लँबेरन यांनी १८८० साली हिवतापाचे जंतू रोग्याच्या रक्तातील तांबड्या कोशिकांत (पेशींत) असतात हे दाखवून दिले. मेजर रीड (१८५१–१९०२) यांनी एडीस जातीच्या डासांपासून पीतज्वराचा प्रसार होतो असे सिद्ध केले. रिकेटस (१८७१–१९१०) या शास्त्रज्ञांनी रॉकी पर्वतातील पृषत ज्वर (स्पॉटेड फीवर) गोचिडींमुळे फैलावतो असे निदर्शनास आणले. प्लेगाच्या जंतूंचा प्रसार पिसवांमुळे होतो हे लिस्टन यांनी १९०४ साली सिद्ध केले.

अठराव्या शतकाच्या आरंभी विविध रोगांचा प्रसार नक्की कोणकोणत्या कीटकांमुळे होतो याचे ज्ञान नव्हते. तसेच कीटकांच्या जीवन वृत्तातील निरनिराळ्या अवस्थांची व त्यांच्या अन्नभक्षणाच्या सवयींची काहीच माहिती नव्हती. पुढील काही काळात शास्त्रज्ञांनी या गोष्टींचा विशेष अभ्यास केला. विशेषतः सर्वत्र आढळणाऱ्या घरमाशीचा सांगोपांग अभ्यास केला गेला. याशिवाय डास, पिसवा, उवा इ. कीटकांविषयी निरनिराळ्या दृष्टिकोनातून संशोधन करण्यात आले. रोगांच्या प्रसाराला कारणीभूत असणाऱ्या कीटकांविषयी सर्व प्रकारची निश्चित माहिती संशोधनाने मिळाल्यावर त्या कीटकांचा नाश कसा करता य़ेईल, याविषयी संशोधन सुरू झाले आणि या कीटकांच्या प्रसाराला आळा घालण्याकरिता उपाय व निरनिराळी कीटकनाशके यांचा शोध लावण्यात आला. डास माणसाचे फक्त रक्तच शोषतात असे नव्हे तर त्याच्या शरीरात रोगाचे जंतूही सोडतात. त्यांचा नाश करणे हे जितके आवश्यक आहे तितकेच त्यांची उत्पत्ती होऊ न देणे हेही आहे. याकरिता त्यांची अंडी, डिंभ (अळी) व कोश यांचाही नाश करावा लागतो. माश्या, पिसवा, उवा इ. कीटकांचा नाश वेगवेगळी कीटकनाशके वापरून करता येतो.

वर उल्लेख केलेल्या कीटकांशिवाय झुरळ, ढेकूण, निरनिराळ्या प्रकारच्या माश्या इ. कीटक अनेक प्रकारे रोगप्रसार करतात उदा., झुरळे व माश्या यांच्या शरीरांवर असणाऱ्या असंख्य रोगजंतूंमुळे रोगप्रसार होण्याची भीती असते.

टोणपी, गो. त.

 

पहा: कीटकनाशके कीटक नियंत्रण कीटकांचे वर्गीकरण.

 

संदर्भ: 1. Essig, E.O. A History of Entomology, New York, 1931.

    2. Howard, L.O.  History Of Applied Entomology, London,1930.

    3. Ross, H.H. A Textbook of Entomology, New York, 1965.