लष्करी अळी : या किडीचा समावेश लेपिडॉप्टेरा गणाच्या नॉक्ट्युइडी कुलात होतो. या कुलातील सिर्फिसयुनिपंक्टा, सि. अल्बीस्टिग्मा (आर्मी वर्म ) व स्पोडॉप्टेरा मॉरिशिया (स्वार्मिग कॅटरपिलर) इ. जाती ज्वारी, बाजरी, भात, मका, नाचणी , गहू वगैरे अन्नदान्याच्या पिकांचे आणि इतर पिकांचे व वनस्पतींचे लष्करी अळी : (१)अळी (२) पतंग. अतोनात नुकसान करतात. सि. युनिपंक्टा जातीची पूर्ण वाढलेली अळी २.५-३.७ सेंमी. लांब, कोशहिन, सुदृढ, मळकट हिरवट रंगाची असून तिच्या पाठीवर दोन्ही बाजूंस रुंद फिकट रंगाचे पट्टे लांबीभर असतात. ती झाडाच्या पानांच्या पोंग्यात लपून बसते किंवा काडी कचरा आणि जमिनीतील भेगांत व ढेकळांखाली आढळते. या अळीचे पतंग दोन प्रकारचे असतात. एका प्रकारचा पतंग तपकिरी तांबड्या रंगाचा असून पंखांच्या पुढच्या कडेवर सुस्पष्ट ठिपके असतात. हिचे मागचे पंख मध्यभागी फिकट असतात व कडा गर्द रंगाचा असतात. दुसऱ्या प्रकारचा पतंग धुसर तपकिरी रंगाचा असतो. त्याच्या पंखांच्या टोकांच्या कडांवर मध्यभागी गर्द रंगाची रेषा व कमी सुस्पष्ट ठिपके असतात.

मादी गोल, हिरवट पांढरी, २००-५०० अंडी पानांच्या पोग्यांत पुंजक्याने दोन समांतर ओळींत घालते. ती एका आठवड्यात उबून त्यांतून अळ्या बाहेर पडतात. त्या पानांच्या कडांकडून मध्यशिरेकडे पाने खातात व मधल्या पोंग्यात लपून बसतात. त्यांची संख्या फारच मोठी असल्यामुळे संपूर्ण पिकाचा त्या फडशा पाडू शकतात. त्यावरूनच त्यांना ‘ लष्करी अळ्या ’ हे नाव पडले आहे. त्या एका शेतातून दुसऱ्या शेतात घुसतात. अळी अवस्था २१-२८ दिवस टिकते व त्यानंतर अळ्या जमिनीत कोषावस्थेत जातात. कोषावस्था ८-१० दिवस टिकते. जीवनचक्र पुरे होण्यास ५-६ आठवड्यांचा काळ लागतो. या किडीचा उपद्रव जून ते नोव्हेंबरमध्ये होतो. त्यामुळे रबी पिकांपेक्षा खरीप पिकांना या किडीचा उपद्रव जास्त होतो. एका हंगामात तिच्या एकापेक्षा जास्त पिढ्या तयार होतात. दरवर्षी या किडीचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव होतोच असे नाही पण पावसाळ्याची सुरुवात जोरात होऊन जास्त काळ उघडीप मिळाल्यास मात्र ती उग्र साथीचे स्वरूप धारण करते. पावसाच्या जोराच्या सरी पडल्यास ही कीड नाहीशी होते.

या किडीच्या नियंत्रणासाठी प्रतिबमधात्मक उपाय म्हणून त्यांच्या अंड्यांचे पुंजके गोळा करून नष्ट करणे, अळ्यांचा उपद्रव स्थानिक स्वरूपाचा असल्यास त्या गोळा करून नष्ट करणे व हंगामानंतर जमीन नांगरल्यास त्यांचे कोष उघडे पडतात १०% बीएचसीची किंवा कार्बारिलची धुरळणी हेक्टरी २०-२५ किग्रॅ. केल्यास किडीचा निश्चित बंदोबस्त होतो. ही कीड रात्रीच्या वेळी क्रियाशील असल्यामुळे धुरळणी शक्यतो संध्याकाळच्या वेळेस करतात. पाणी उपलब्ध असल्यास पाण्यात विरघळणारी वरील किटकनाशके वा एंडोसल्फान, मॅलॅथिऑन, मोनोक्रोटोफॉस, फेनिट्रॅथिऑन इत्यादींची फवारणी करतात. या किडीचे इतर असंख्य परजीवी कीटक शत्रू आहेत. काही परजीवी माश्या (उदा., विंथेमिया क्वाड्रिपुस्टुलेटा) आपली अंडी लष्करी अळ्यांच्या पाठीवर (विशेषतः डोक्याकडे ) घालतात. या अंड्यांतून बाहेर पडणाऱ्या अळ्या लष्करी अळ्यांच्या पाठीला भोके पाडून आत शिरतात व त्यामुळे त्या मरतात. बरेच भुई भुंगेरे व परजीवी गांधील माश्या लष्करी अळ्या खातात. अतिसूक्ष्म, काळा गांधील माशी सारख्या कीटक टेलीनोमस मिनिमस लष्करी अळ्यांच्या अंड्यांमध्ये आपली अंडी घालतो.

बोरले, मु. नि. जमदाडे, ज. वि.