पाने गुंडाळणारी अळी : या अळ्यांचा समावेश लेपिडॉप्टेरा गणात होतो. त्या बहुतेक पायरॅलिडी कुलातील आहेत. त्या हिरव्या किंवा पिवळसर तपकिरी रंगाच्या असतात. या अळ्या पानांच्या कडा एकत्र चिकटवून त्याच्या गुंडाळ्या तयार करून त्यांत राहतात व पाने खातात. परिणामतः अशी पाने वाळू लागतात आणि गळून पडतात. किडीचा उपद्रव जास्त असेल, तर संपूर्ण झाड पर्णरहित होते व त्यामुळे बरेच नुकसान होते.

या किडीचे मादी पतंग कोवळ्या पानावर बहुधा पाठीमागील बाजूस एक-एक अशी अंडी घालतात. ती एक आठवड्यात उबतात व त्यांतून बाहेर पडणाऱ्या अळ्या पानांच्या गुंडाळ्या तयार करून त्यांत राहतात व दोन-तीन आठवड्यांत त्यांची वाढ पूर्ण होते आणि त्याच गुंडाळ्यांत त्या कोशावस्थेत जातात. कोशावस्था एक आठवडा टिकते व तीतून पतंग बाहेर पडतात. अशा रीतीने एक महिन्यात एक पिढी पूर्ण होते.

निरनिराळ्या पिकांना उपद्रव देणाऱ्या या किडीच्या निरनिराळ्या जाती आहेत. त्यांत कापूस व भेंडीवरील सायलेप्टा डेरोगेटा,वांग्यावरील यूब्लेमा ऑलिव्हेसीया, संत्र्यामोसंबीवरील टोनिका झिझिफाय, भुईमूग, सोयाबीन इत्यादीवरील स्टोमोप्टेरिक्स  वंशातील जाती भातावरील नॅफॅलोक्रॉसिस मेडिनॅलिस  या महत्त्वाच्या आहेत.

 कपाशीवरील पाने गुंङाळणारी अळी : (अ) अळी व गुंडाळ्लेले पान(आ) पतंग

पाने गुंडाळणाऱ्या अळ्यांचा नियंत्रणासाठी अळ्यांसहित पानांच्या गुंडाळ्या जमा करून नष्ट करतात किंवा पिकावंर १०% बीएचसी किंवा कार्बारिल भुकटी उडवितात.       

पोखरकर, रा. ना.