(अ) ऊ, (आ) केसांना चिकटलेल्या लिखा.

ऊ : नियततापी (शरीराचे तापमान कमी अधिक स्थिर असणार्‍या) प्राण्यावर आढळणारा परजीवी (दुसर्‍या जीवावर जगणारा) कीटक. पक्ष्यांवरील उवा मॅलोफॅगा गणात व सस्तन प्राण्यांवरील उवा सायफन्क्युलेटा किंवा ॲनोप्ल्यूरा गणात मोडतात. यांतील उवा जातीनुसार प्रामुख्याने शेळ्या, घोडे, कुत्रे, डुकरे इ. पाळीव प्राण्यांवर व माणसांवर, तर काही उंदीर, खारी, हत्ती तसेच सील, वॉलरस इ. सागरी सस्तन प्राण्यांवरही आढळतात.

लांबी १·५ ते ३·५ मिमी., आकार, चपटा व रंग मळकट पांढरा असतो. पाय बळकट असून प्रत्येकास शेवटी आकड्यासारखा नखर (नख्या) असल्याने पकड घट्ट बसते. आपल्या सुईसारख्या मुखांगानी (तोंडासारख्या अवयवांनी) त्या पोषकाचे (परजीवी ज्यावर जगतो त्याचे) रक्त शोषतात. चावा दुःखकारक व तापदायक असतो. अंडी (लिखा) लांबट पांढरी असून जातीनुसार केसास चिकटून, कपड्याच्या धाग्यावर किंवा शिवणीवर घातली जातात. लहान उवा अंड्यातून ७-८ दिवसांनी बाहेर पडतात १५–१९ दिवसात वाढतात व त्यानंतर १-३ दिवसांत प्रजोत्पत्तीस योग्य होतात. पैदास फार झपाट्याने होते. पूर्ण वाढलेल्या उवांस पंख नसतात.

माणसाच्या शरीरावर दोन जातींच्या उवा आढळतात. (अ) पेडिक्यूलस ह्यूमॅनस – (पेडिक्यूलिडी कुल) : (भेद दोन) (१) कॅपिटिस – डोक्यातील, (२) कॉर्पोरिस – अंगावरील. (आ) थिरस प्यूबिस – (थिरिडी कुल) : क्रॅब लाऊस किंवा जांघेतील ऊ. माणसाच्या शरीरावरील उवांद्वारे टायफस ज्वराचा प्रसार होतो. कातडीस चिरडलेल्या उवा अगर त्यांची विष्ठा लागून ज्वराचा प्रसार होतो, चावून होत नाही.

गर्दी, अस्वच्छता, कपडे, पांघरुणे, कंगवे यांद्वारे उवांचा प्रसार झपाट्याने होतो. स्वच्छता, जंतुनाशक द्रव्यांचा वापर इ. प्रतिबंधक उपाय योजतात.

टोणपी, गो. त.