भोपळ्यावरील भुंगेरा: याचा समावेश कोलिऑप्टेरा गणाच्या क्रिसोमेलिडी (किंवा गॅलेरुसिडी) कुलात करतात. या कुलातील भुंगेऱ्यांच्या बऱ्याच जाती असून त्यांपैकी महाराष्ट्रात फक्त सहाच उपद्रवी आहेत. यांपैकी ऑलॅकोफोरा फोव्हीकॉलिस जातीचा भुंगेरा लाल (तांबड्या) रंगाचा असून भारतात सर्वत्र आढळतो आणि ऑ. इंटरमेडियासेरेशिया सिंक्टा या जातींचे भुंगेरे काळ्या रंगाचे व . ॲट्रिपेनिस या जातीचा भुंगेरा निळ्या रंगाचा असतो. तसेच लेमा सब्‌विविडीगायनँड्रोप्थॅल्मा लाँगिकॉर्निस हे भुंगेरेही काही वेळा आढळतात. ऑ. स्टिव्हनसी ही करड्या रंगाची जाती कमी प्रमाणात आढळते.

भोपळ्यावरीलप्रौढ भुंगेरा ५-७ मिमी. लांब असतो. लाल भुंगेऱ्याचे पुढील पंख नारिंगी पिवळे किंवा फिकट तपकिरी असतात, तर काळ्या भुंगेऱ्याचे पंख चकचकीत काळे किंवा पिवळे असतात.

मादी ३-४ आठवड्यांच्या काळात झाडांजवळील ओलसर जमिनीत एक एकटी किंवा पुंजक्याने लांबट, पिवळसर तपकिरी अंडी रात्रीच्या वेळी घालते. एक मादी ३०० पर्यंत अंडी घालते. १-३ आठवड्यांत अंडी उबून त्यांतून लहान पिवळसर पांढऱ्या व तपकिरी डोक्याची डिंभके (अळ्या) बाहेर पडतात. तीन वेळा कात टाकून अळ्या पूर्ण वाढतात तेव्हा त्यांची लांबी सु. १.२५ सेंमी. असते. अळ्या जमिनीत कोषावस्थेत जातात व १५-३५ दिवसांनंतर कोषांतून प्रौढ भुंगेरे बाहेर पडतात. हवामानानुसार भुंगेरे २०-२०० दिवस जगतात.

भुंगेरे वेलीची पाने, फुले व कोवळी फळे कुरतडून खातात. त्यामुळे पानांना व फुलांना अनियमित आकारांची भोके पडतात आणि वेली मरतात किंवा त्यांची वाढ खुंटते. रोपांचे अतोनात नुकसान होते. अळ्या जमिनीत राहून मुळांमध्ये व खोडांमध्ये शिरून आतील भाग खातात. त्या रोपांचेही बरेच नुकसान करतात. तसेच जी पाने, फळे जमिनीला खेटलेली असतात त्यांनाही अळ्यांचा उपद्रव होतो. या किडीचा प्रादुर्भाव मार्च-ऑक्टोबर या काळात जास्त दिसून येतो.

प्रौढ भुंगेरे नोव्हेंबरमध्ये भोपळ्याचे वेल, गवत, तण यांच्या खाली व जमिनीत शीतनिष्क्रियतेत (हिवाळ्यातील गुंगीत) जातात आणि पुन्हा एप्रिलच्या अखेरीस दिसू लागतात आणि त्यानंतर एकामागून एक पिलावळ दिसते. शीतनिष्क्रियतेत जाणाऱ्या भुंगेऱ्याच्या मृत्यूचे प्रमाण खूपच असते व ते सर्वांत जास्त नुकसानकारक असतात. त्यामुळे तात्काळ त्यांचे नियंत्रण करणे आवश्यक असते.

असेही आढळून आले आहे की, ऑ. फोव्हीकॉलिस ही जाती लाल भोपळा पसंत करते व ऑ. ॲट्रिपेनिस ही घोसाळे पसंत करते आणि ह्या दोन्ही जाती कारल्यावर आढळत नाहीत. सामान्यतः दोन्ही जाती लाल भोपळा, काशीफळ, काकडी, कलिंगड, दोडका, घोसाळे, पडवळ इ. वेलींचे नुकसान करतात. यांखेरीज ऑ. फोव्हीकॉलिस ही जाती दुधी भोपळा व कोहळ्यावर आढळते.

क्रिसोमेलिडी कुलातील लेमा प्रीएस्टा, ले. सेमिरेग्युलॅरिसले. सिग्नॅटिपेनिस ह्या जाती ओरिसा राज्यात आणि गॅलेरुसिडा बायकलर ही जाती हिमाचल प्रदेशात कुकर्बिटेसी कुलातील पिकांवर आढळतात.

या भुंगेऱ्याच्या नियंत्रणामध्ये शेताची स्वच्छता, भुंगेरे पकडून नष्ट करणे व बीएचसी, पॅराथिऑन, फॉस्फोमिडॉन किंवा डीडीव्हीपी यांसारख्या कीटकनाशकांची फवारणी करणे इ. उपायांचा समावेश होतो.

पोखरकर, रा. ना.