पिकांवरील ढेकूण : वनस्पतीतील कोशिकारस (पेशिरस) शोषून घेणार्‍या कीटकांना सर्वसाधारणपणे पिकांवरील ढेकून असे संबोधण्याचा प्रघात आहे. ह्या सर्वप्रकारच्या ढेकणांचा समावेश हेमिप्टेरा गणातील निरनिराळ्या कुलांत होतो. पेंटाटॉमिडी, मिरीडी, कोरिडी, पायरोकोरेडी, टिंजीडी, कॅप्सिडी या कुलांतील बर्‍याच जाती पिकांना उपद्रव देणार्‍या आहेत व ह्यांना पिकांवरील ढेकूण संबोधण्यात येते. यांशिवाय नॅसिडी व फुल्गोरिडी या कुलांमधील तुडतुड्यांचाही काही लोक पिकांवरील ढेकणांत समावेश करतात. या ढेकणांच्या बर्‍याच जाती  पिकांना हानिकारक आहेत परंतू काही जाती मावा व इतर कीटक खाणार्‍या आहेत.

पिकावरील मलकट ढेकूण (प्रौढ लायगस लिनीओलॅरिस)पिकावरील ढेकणांच्या तोंडाची रचना वनस्पतीतील कोशिकारस शोषून घेण्यासाठी रूपांतरीत झालेली असते. खोशिकांमध्ये तोंड खुपसणे व त्यांतील रस शोषून घेणे, अशा दोन क्रिया यामध्ये होतात. या कीटकांचा अधरोष्ठ (खालचा ओठ) सोंडेसारखा असतो व तो चार खंडांचा (भागांचा) बनलेला असतो. तो अर्धगोलाकार असून वरच्या बाजूला मोकळा असतो. याचा उपयोग कोशिकेत खुपसण्यासाठी होत नसून सुईच्या आकारासारख्या असलेल्या जंभ (जबडा) व जंभिकांच्या (जंभाच्या मागे असलेल्या अवयवाच्या) जोडीला आधार देण्यासाठी होतो. जंभ व जंभिकांची जोडी सुईच्या आकाराची असते. प्रथम जंभ कोशिकेत खुपसला जातो. जंभिकेला दोन खाचा असतात. दोन्ही जंभिका एकमेकिंवर बसल्याने या दोन खाचांच्या दोन नलिका तयार होतात. एका नलिकेद्वारे कोशिकेत लाळ टाकली जाते. त्यमुळे कोशिकावरण मऊ होते व काही प्रमाणात अन्न पचण्यास सुरूवात होते. दुसर्‍या नलिकेद्वारे तोंडाच्या स्नायुंच्या साहाय्याने कोशिकेतील रस शोषून घेतला जातो. रस शोषून घेतल्यामुळे वनस्पतीची वाढ खुंटते. ज्या वेळी हे कीटक रस शोषून घेत नाहीत त्या वेळी सोंडेसारखा तोंडाचा भाग डोक्याच्या खाली मागील बाजूस वळलेला असतो आणि काही जातींत त्याचे टोक पुढील पायांच्या प्रथम खंडांच्या मधोमध धरलेले असते.

मादी मृत ओषधीय [⟶ ओषधि] वनस्पतींच्या देठांत अंडी घालते. बहुसंख्य जातींची वर्षात एकच पिढी पुरी होते. ते हिवाळा अंड्याच्या अवस्थेत घालवतात. पिकावरील मळकट (टार्निशड) ढेकण्यासहित काही जाती प्रौढावस्थेत शीतनिष्कियतेत (हिवाळ्यातील गुंगीच्या अवस्थेत) जातात व पुढील हंगामातील वसंत ऋतूत अंडी घालतात. 

या कीटकांच्या नियंत्रणासाठी स्पर्शविष प्रकारच्या कीटकनाशकांचा उपयोग करतात. दैहिक कीटकनाशकांचा उपयोग केल्यास त्यांचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होते. [⟶ कीटकनाशके]. 

पोखरकर, रा. न.