इक्‌न्युमन माशी

इक्‌न्युमन माशी : कीटक वर्गातील हायमेनोप्टेरा गणाच्या इक्‌न्युमोनीडी कुलातील परजीवी (दुसऱ्याच्या जीवावर जगणारी) माशी. काही पराप्तरजीवी (परजीवीवर जगणारा परजीवी) असतात. या काळ्या, पिवळ्या अगर करड्या रंगाच्या असून त्यावर तांबडे, पिवळसर असे पट्टे किंवा ठिपके असतात. पंखावर ठिपके असतात. पोटाचा भाग बुडाशी निमूळता असून त्यास काहीसा धनुष्यासारखा बाक असतो. ह्यामुळे त्या चटकन ओळखता येतात. पोटाच्या शेवटी असलेला अंडनिक्षेपक (अंडी घालण्याचा अवयव) काही माशांत खूपच लांब असतो. उड्डाण त्रोटक व अस्थिर असते व शृंगिका (मिशांसारखी स्पर्शेंद्रिये) सतत कंप पावत असतात.

हेमिप्टेरा, कोलिओप्टेरा, लेपिडोप्टेरा व डिप्टेरा या गणांतील डिंभांवर (अळ्यांवर) अगर डिंभांत या माशा अंडी घालतात. इक्‌न्युमन डिंभ अशा रीतीने परजीवी जीवन जगत असता तेथेच त्याचे कोषात रूपांतर होते. यातूनच कालांतराने माशी बाहेर पडते. पोषक डिंभ मात्र शेवटी नाश पावतो. या माशा फुलातील मध खातात व परपरागणास एका फुलाचे पराग दुसऱ्या फुलावर टाकण्यास) मदत करतात. वरील गणांचे डिंभ पिकांना हानिकारक असल्याने या माशा पिकांस व पर्यायाने माणसास उपयोगी ठरतात.

खैरे, शां. ना.