कीटकदंश : लक्षावधी कीटकांच्या चावण्यामुळे व दंशामुळे मानवाला उपद्रव होत असला, तरी सुदैवाने त्यांच्यापैकी अगदी थोड्याच कीटकांच्या दंशामुळे गंभीर स्वरूपाचे रोग होतात. हिवताप, पीतज्वर, टायफस (प्रलापकज्वर), मस्तिष्कशोथ (मेंदूची दाहयुक्तसूज), खारींचा व सशांचा ट्युलॅरिमीया रोग, प्लेग, आंत्रज्वर (विषमज्वर, टायफॉइड), काळपुळी व इतर बऱ्याच रोगांचे कीटकांकडून वहन व प्रसार होत असतो. या लेखात मुख्यत: कीटकाच्या विशिष्ट विषामुळे पोषकावर (ज्यावर कीटक जगतो अशा जीवावर) होणारा परिणाम, कीटक प्रतिवारणाचे (दूर घालवण्याचे) उपाय व त्यांच्या दंशाने उद्भवणाऱ्या रोगांवरील उपचार या गोष्टींचे विवरण केलेले आहे.

माशी, डास, पिसू, चिलट यांसारख्या बहुसंख्य कीटकांच्या दंशाची आपल्या शरीरावर ताबडतोब प्रतिक्रिया दिसून येते. त्यामुळे दंश झालेली जागा लाल होऊन सुजते आणि तेथे खाज सुटते. सामान्यात: २–२४ तासांत ती कमी होते. व त्या जागी कायम अशी खूण राहत नाही. वरील परिणाम हा कीटकांच्या लाळेतील घटकांवर अवलंबून असणारी अधिहर्षताजनक (ॲलर्जीजनक) प्रतिक्रिया असते व पुर्वानुभवाने लाळेतील घटकांविषयी पोषकाच्या ठिकाणी संवेदनाक्षमता उत्पन्न झालेली असते असा समज आहे. तान्ह्या मुलांना पहिल्यांदाच डास चावला तर त्यांच्या ठिकाणी वरीलप्रमाणे प्रतिक्रिया (संवेदनाक्षमता) दिसून येत नाही आणि ज्यांना एकसारखे बराच काळपर्यंत कीटक चावतात त्यांच्या अंगी प्रतिरक्षा (रोगप्रतिकारक्षमता) उत्पन्न होण्याची शक्यता असल्यामुळे कीटकाच्या चावण्याची कोणतीही प्रतिक्रिया अशा व्यक्तीत दिसून येत नाही. म्हणून एखाद्या प्रदेशातील मूळ रहिवाशांची अशी चुकीची समजूत असते की, स्थानिक परजीवी (दुसऱ्या जीवावर जगणारे जीव) त्यांना चावत नाहीत.

मधमाशी व गांधीलमाशी यांसारख्या कीटकांच्या दंशामुळे अंगावर गांधी येतात व अतिशय वेदना होतात. पण त्या फार थोड्या काळ टिकतात. या वेदना माश्यांच्या विषामध्ये असलेल्या फॉर्मिक अम्लाच्या तापजनक क्रियेमुळे व तंत्रिकांना (मज्जातंतूंना) विषारी असणाऱ्या एका क्षारिय (अल्कलाईन) पदार्थामुळे होतात अशी समजूत आहे. एकाच वेळी पुष्कळ दंश झाले म्हणजे मूर्च्छा, परिवहन (रक्ताभिसरण) बंद पडणे, कष्टश्वसन असे गंभीर सार्वदेहिक विकार होण्याची शक्यता असते. क्वचित मृत्यूदेखील येतो. मधमाशीची नांगी कातडीत तशीच राहते. मात्र गांधीलमाशीची तशी राहत नाही. मधुपालांच्या ठिकाणी मधमाशीच्या दंशाच्या बाबतीत प्रतिरक्षा निर्माण होते आणि जरी त्यांना पुष्कळ वेळा दंश झाला, तरी अंतर्गत किंवा बाह्य अनुक्रिया (प्रतिसाद)  अनुभवास येत नाही. अशा प्रकारची प्रतिरक्षा मधमाश्यांच्या विषाचे पुन:पुन्हा अंत:क्षेपण करून (टोचून दिल्याने) प्रायोगिकरीत्या आणता येते.

ज्या व्यक्तींमध्ये अधिहर्षता असते त्यांना मधमाश्या व गांधीलमाश्या यांचा दंश अत्यंत धोकादायक असून त्यामुळे क्वचित मृत्यूही संभवतो. अशा व्यक्तींमध्ये दिसून येणाऱ्या प्रतिक्रिया पुढील चार प्रकारच्या असतात: (१) यामध्ये प्रामुख्याने ऊतकांची (समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांची) सूज आढळते. त्वचेची तीव्र कंड व स्वरयंत्राची सूज तसेच तीव्र वातस्फीती यांमुळे कष्टश्वसन होऊन मृत्यू येण्याचा धोका असतो. (२) शरीरातील गुहा (पोकळी) किंवा विविध अवयव व ऊतक यांमध्ये रक्तस्राव होण्याचा गंभीर धोका असतो. दंशानंतर काही कालावधी गेल्यावर हा धोका निर्माण होण्याचा संभव असतो. (३) तंत्रिका तंत्रात (मज्जासंस्थेत) बिघाड झाल्याची लक्षणे आढळतात. क्वचित प्रसंगी मेंदूला इजा झाल्याने मृत्यूही ओढवतो. (४) वाहिनीजन्य अवसाद (शॉक) होऊन भयंकर शक्तिपात होतो, रक्तदाब कमी होतो. मूर्च्छा येते, अंग गार पडून घाम फुटतो.

रक्त शोषणाऱ्या उवा (ॲनोप्ल्यूरा) कातडीवर किंवा कातडीच्या जवळ राहतात. डोक्यातील उवा, काखेतील उवा व जांघेतील उवा  असे त्यांचे तीन प्रकार आहेत. त्या आपली अंडी केसांना किंवा कपड्यांना चिकटवतात व ठराविक कालाच्या अंतराने आपल्या पोषकावर उदरभऱण करतात. त्यांच्या दंशाने त्वचेवर क्षते पडतात  व ती खूप खाजतात. ती खाजवल्यावर पुष्कळदा संसर्गदूषित होतात आणि अशा तऱ्हेने ती जास्तच चिघळून खूपच अवघड होऊन बसतात. गाद्या, उशा, भिंती, लाकडी सामान इत्यादींमध्ये ढेकूण राहतात. ते सामान्यतः अंधारात आपल्या पोषकाला उपद्रव देतात व त्याचे रक्त शोषून घेतात. काही सुरवंटांच्या स्पर्शाने कातडीची भयकंर आग होते. ब्राऊन-टेल पतंगाच्या अळीच्या अंगावर सर्वत्र पोकळ केस असतात. त्यांतील द्रवामुळे अंगावर इसबासारखा पुरळ उठतो. कधी कधी हे केस वाऱ्याने उडून कपड्यावर जातात व असे कपडे घातल्यावर खूपच अस्वस्थ वाटू लागले.

उपचार : चावलेल्या अगर दंश झालेल्या भागावर औषध लावण्याने फारसा उपयोग होत नाही. मात्र कीटकाने दंश केल्यावर जखमेत राहिलेली त्याची नांगी काढून टाकणे चांगले. संसर्गदूषण होऊ नये म्हणून त्या जागेवर पूतिरोधक (पू होण्यास रोध करणारे द्रव्य) लावतात. ती जागा चोळू नये म्हणजे विष रक्तात भिनत नाही. खाजू नये म्हणून मेंथॉल किंवा फिनॉल संयुगांसारखी औषधे लावतात. कातडीवर राहणाऱ्या उवांसारखा कीटकांचा नाश करण्यासाठी क्युप्रेक्स, डीडीटी भुकटी किंवा लिंडेन लावतात. तथापि डीडीटीसारख्या कीटकनाशकांनी अशा कीटकांच्या अंड्यांचा नाश होत नाही म्हणून दोन आठवड्यांपर्यंत त्यांचा पुन:पुन्हा उपयोग करून कीटकांच्या वसाहतीचे निर्मूलन करणे आवश्यक असते. ढेकूण, पिसवा व इतर बहुसंख्य स्थायिक किटकांचा नायनाट करण्यासाठी डीडीटी, क्लोरडान किंवा लिंडेन यांची फवारणी केल्यास चांगलाच परिणाम होतो.

अधिहर्षता असलेल्या व्यक्तींनी कीटकदंशानंतर ताबडतोब वैद्यकीय मदत घेणे हिताचे असते. जेथे तातडीने वैद्यकीय मदत मिळणे दुरापास्त असते तेथे बाजारात उपलब्ध असलेली कीटकदंशावरील खास प्राथमिक उपचारपेटिका जवळ बाळगतात. त्यामध्ये एपिनेफ्रिन हे उपयुक्त औषध भरून ठेवलेली अंतःक्षेपण नलिका (सिरिंज) ठेवलेली असते. त्याशिवाय एक रक्तस्राव बंधही (बँडेज) असतो.

प्रतिवारके : काही संयुगे पोटात घेतल्यावर कीटकांचे प्रतिवारण होते अशी समजूत आहे. पण अशा कीटक प्रतिवारकांचा मानवावर योग्य परिणाम झाल्याचे दिसून आलेले नाही. सर्वसाधारण उपयोगासाठी डायमिथील प्थॅलेट, डायमिथील कार्बेट इंडॅलोन व रटजर्स -६१२ (२-एथिल- I, ३-हेक्झॉनिडिओल) यांपैकी प्रत्येक स्वतंत्रपणे किंवा या सगळ्यांचे मिश्रण त्वचेला लावणे फारच परिणामकारक असल्याचे आढळून आले आहे. डास, पिसवा, गोचिडी यांच्या प्रतिवारणासाठी व कपड्यांना लावण्याकरिता एक प्रतिवारक मिश्रण उपलब्ध आहे. त्यात ३०टक्के n-ब्युटिल

ॲसिटानिलाइड, ३० टक्के बेंझिल बेंझोएट, ३० टक्के २-ब्युटिल -२-एथिल-I, ३ –प्रोपॅनिडिओल व १० टक्के  ट्‍वीन -८० हे घटक असतात. हे मिश्रण एक किंवा दोन भाग पाण्यात विरळ करतात.

जमदाडे, ज.वि.