पिली : डिप्टेरा गणातील सीसिडोमायडी कुलातील या माशीचे शास्त्रीय नाव पॅचिडीप्लॉसिस ओरायझी असे असून हिला गाद, पोंगा, कणे असेही म्हणतात. भारतात भाताच्या सर्व प्रदेशांत ती आढळते.

पिवळसर तपकिरी रंगाच्या या डासाच्या आकाराच्या माश्या रात्रीच्या वेळी कार्यक्षम असतात. त्या दिव्याकडे आकर्षिल्या जातात. मादी पानाच्या मागील बाजूवर सु. १०० ते २०० फिकट गुलाबी, लांबट, नलिकाकृती, एकएक किंवा पुंजक्याने अंडी घालते. ३ ते ४ दिवसांनी ती उबून अळ्या बाहेर पडतात. त्या पानावरून सरपटत जाऊन वाढणाऱ्या कळीच्या टोकाशी जमतात. ऊतकांना (पेशी समूहांना) घरे पाडून त्या कळ्यांचा नाश करतात. नवीन येणाऱ्या भाताची काडी पोकळ राहते व ती उजेडामुळे चकाकते. अळी स्वत:भोवती कोशावरण निर्माण करते. कोशावस्था ३ ते ५ दिवस टिकते. सु. तीन आठवड्यांत एक पिढी पूर्ण होते. जूलै ते नोव्हेंबर या काळात तिचा भाताला जास्त उपद्रव होतो. पूर्ण वाढ झालेल्या पिली माशीचे पाय लांब व पातळ असतात. मादी तांबूस रंगाची असते. नराचा रंग साधारणत: राखी करडा असतो. डोके खाली वाकलेले असते. शृंगिका (सांधेयुक्त लांब स्पर्शेंद्रिंये) सूत्ररूप असतात. त्या २१-२२ खंडांनी बनलेल्या असतात. मुखाचे भाग स्पंजासारखे असतात. पंखांची एकच जोडी असून साधी असते. संतोलक (तोल सांभाळणारे अवयव) पंखापेक्षा लहान असून त्यांची टोके गोल असतात.

713 - 1

दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील भातावर ही कीड विशेषत्वाने आढळते. भाताशिवाय इतर काही गवतांवरही ही कीड आढळते. या किडीच्या नियंत्रणासाठी किडीला पोषक गवते व बिगर हंगामात येणारी भाताची रोपे यांचा नाश करतात. किडीचा उपद्रव झालेली झाडे काढून नष्ट करतात. लावणीनंतर १० दिवसांनी व ३० दिवसांनी १०% दाणेदार फोरेट प्रती हेक्टर १० किग्रॅ. या प्रमाणात टाकतात. नियंत्रणाच्या रासायनिक पध्दती अद्याप रूढ नाहीत. तथापि ०·१% पॅराथिऑन पायसाचा (एकमेकांत न मिसळणाऱ्या दोन द्रवांच्या दुधासारख्या कलिलीय मिश्रणाचा) फवारा मारल्यास थोडाफार उपयोग होऊ शकतो, असे आढळले आहे.

पोखरकर, रा. ना.