बटाट्याचे देठ कूरतडणारी अळी : (१) अळी, (२) पतंग.

देठ कुरतडणाऱ्‍या अळ्या : (कट वर्म्‌स). या अळ्यांना ‘देठ कुरतडणाऱ्‍या अळ्याʼ असे रूढ नाव असले,तरी त्या देठांबरोबरच जमिनीलगतचा खोडाचा भाग,पाने इ. वनस्पतीचे भागही कुरतडतात. या अळ्यांच्या अनेक जाती असून त्यात ॲग्रोटिस इप्सिलॉन,ॲ. सी–नायग्रम,ॲ. आर्थोगोनिया, फेलशिया सब्‌गॉथिकाप्रोडेनिया एरिडॅनिया  इ. जातींचा समावेश होतो. ह्या सर्व जातींचा लेपिजॅप्टेरा गणातील नॉक्टुइडी कुलात समावेश होतो. जगातील निरनिराळ्या भागांमध्ये ह्या किडीपैकी काही थोड्याफार प्रमाणात आढळून येतात व त्यांच्यापासून अनेक पिकांना हानी पोहोचते. भारतात मात्र ॲग्रोटिस इप्सिलॉन  ही देठ कुरतडणारी अशी प्रमुख कीड असून तिच्यापासून बटाटा, टोमॅटो, तंबाखू, मिरची, वांगे, हरभरा, वाटाणाआदी पिकांची बरीच हानी होते. विशेषतः बटाट्याच्या पिकांचे तुलनात्मक दृष्ट्या अधिक नुकसान होते. ह्या किडीच्या अळ्या रात्रीच्या वेळेस पिकांची रोपटी जमिनीपासून कुरतडतात आणि त्यांचे कोवळे शेंडे व पाने खातात. त्यांना खाण्यास जेवढी रोपटी लागतात त्यापेक्षा कितीतरी जास्त रोपटी ह्या अळ्या कुरतडून टाकतात. त्यामुळे पिकांच्या नुकसानीत आणखीच भर पडते. दिवसा मात्र ह्या अळ्या जमिनीच्या भेगांमध्ये अथवा मातीच्या ढेकळांखाली लपून बसतात.

ह्या किडीचे मादी–पतंग पानाच्या मागील बाजूवर वा रोपट्यांच्या बुंध्यावर अलग अलग परंतु एक दुसऱ्‍याजवळ अंडी घालतात. अंडी आकाराने गोल असून ती पांढुरक्या रंगाची असतात. अंड्यांमधून सु. ४ ते ७ दिवसांनी फिकट करड्या रंगाच्या सूक्ष्म अळ्या बाहेर पडतात. ह्या अळ्या रोपट्यांची कोवळी पाने खाऊन वाढू लागतात व साधारणतः ३ ते ५ आठवड्यांत त्यांची पूर्ण वाढ होते. पूर्ण वाढ झालेल्या अळ्या काळसर रंगाच्या असून त्यांची लांबी सु. २–५ सेंमी. असते. ह्या अळ्यांना थोडासाही धक्का लागताच त्या अंगाची गुंडाळी करून मेल्याचे ढोंग करतात. पूर्ण वाढ झाल्यावर अळ्या जमिनीत शिरतात व स्वतःभोवती मातीच्या कणांचे आवरण तयार करून त्यात कोषावस्थेत जातात. कोषावस्था सु. ११ ते १८ दिवसांची असते. त्यानंतर कोषातून मध्यम आकाराचे पतंग बाहेर पडतात. पतंगाची लांबी साधारणतः २–५ सेंमी. असून त्याच्या पुढील पंखाच्या जोडीवर गडद किंवा काळसर करड्या रंगाचे ठिपके असतात. हे पतंग रात्रीच्या वेळेस प्रकाशाकडे आकर्षित होतात. त्यामुळे प्रकाशाची उपाययोजना करून ह्या किडीचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता ओळखण्यास मदत होते. अनुकूल हवामानात या किडीचा जीवनक्रम पूर्ण होण्यास साधारणतः पाच आठवडे लागतातपरंतु तापमानात घट होऊ लागली म्हणजे त्यांचा जीवनक्रम पूर्ण होण्याचा अवधीही वाढू लागतो. म्हणूनच हिवाळ्यात या किडीचा जीवनक्रम पूर्ण होण्यास साधारणतः नऊ आठवड्यांचा अवधी लागतो. तथापि अतितीव्र थंडी या किडीच्या जीवनास प्रतिकूल असल्यामुळे तिचे कोष अनुकूल हवामान येईपर्यंत जमिनीत सुप्तावस्थेत राहतात व नंतर कोषातून पतंग बाहेर पडतात. ह्या किडीच्या वर्षातून तीन किंवा चार पिढ्या पूर्ण होतात.

५% पॅरिस ग्रीन (कॉपर ॲसिटो आर्सेनाइट) अथवा बीएचसीचे विषारी अमिष सायंकाळी रोपांजवळ पिस्कारल्याने या किडीचे नियंत्रण करता येते. तसेच जमिनीत १०% बीएचसी अथवा ५% आल्ड्रीन भुकटी हेक्टरी ५० किग्रॅ. मिसळल्यानेही या किडीचे नियंत्रण होते.

  

संदर्भ : 1. Government of Maharashtra, Crop Pests and How to Fight Them, Bombay, 1960.

          2. Metcalf, C. L. Flight, W. P. Destructive and Useful Insects : Their Habits and Control, New York, 1962.

बोरले, मु. नि.