सायला : ही संत्री, मोसंबी, नासपती इ. फळझाडांवर आढळणारी कीड आहे. कीटकांच्या होमोप्टेरा गणातील कुलांच्या स्टर्नोऱ्हिंका मालिकेत सायलिडी कुलाचा अंतर्भाव करतात. सायला हे या कुलातील कीटक असून त्याला ‘वृक्षावर उड्या मारणारी ऊ’ असेही म्हणतात. हे कीटक ⇨ सिकाडासारखे परंतु आकारमानाने पुष्कळच लहान असून त्यांच्या सु.१,००० जाती माहीत आहेत. या प्रौढ कीटकाचे डोके आडवे असून डोळे बाहेर आलेले असतात. याचा चेहरा दोन स्पष्ट शंकूंसारखा असून हे शंकूवरील दिशेत रोखलेले असतात. याला तीन नेत्रिका असून शृंगिका सामान्यपणे दहा खंडांच्या व कधीकधी त्या ६ ते ९ खंडांच्याही असतात. पंखयुक्त सायलाला चार पंख असून ते बहुधा पटलयुक्त असतात पुढील पंख मागील पंखांपेक्षा अधिक जाड असतात. मिटलेल्या विश्राम स्थितीत पंख छपरासारखे आच्छादलेले दिसतात. पादोत्तर भाग दोन खंडांचे असून त्यांना दोन अग्रस्थ नखर असतात. प्रौढ कीटकाचे मागील पाय उडी मारण्याच्या दृष्टीने अनुकूल झालेले असून कक्षांगे जास्त विस्तारलेली असतात.

सायलाचे अर्भक व प्रौढ जीव एकाच वृक्षावर आढळू शकतात. या दोन्ही अवस्थांमध्ये शीतनिष्क्रियता आढळू शकते. अर्भकाचे शरीर चपटे असून त्याला उडी घेण्यास मदत करणारे मागील पाय नसतात. पुष्कळदा सायलाचे शरीर स्रावाने आच्छादलेले असून हा स्राव लोकरीसारखा, मेणासारखा किंवा दाट असतो.

सायलिडी कुलातील काही कीटकांमुळे त्यांना अन्न देणाऱ्या आश्रयी झाडांचे गंभीर स्वरूपाचे नुकसान होते. असंख्य कीटक वृक्षातून अन्न शोषून घेत असतात. परिणामी आश्रयी वृक्षाची पाने पिवळी होतात, गुंडाळली जातात किंवा पानांवर गाठी तयार होतात. या कीटकांमुळे वृक्षांचे अप्रत्यक्ष नुकसान पुढील प्रकारे होऊ शकते. पानांवर कवकांची वाढ होते तसेच पानांवर या कीटकांच्या साखरेसारख्या विष्ठेचा लेप तयार होऊन त्याकडे मुंग्या आकर्षित होतात. सायला पायरिकोला (नासपती सायला) या जातीमुळे असे नुकसान होते. यामुळे वृक्षाची अकाली पानगळ होते, अपक्व फळे गळून पडतात, फळाची गुणवत्ता कमी होते आणि कवकांमुळे पाने काळी होतात. म्हणून उत्तर अमेरिकेत ही जाती आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची ठरली आहे. नासपतीची पाने खाणाऱ्या सायलाच्या मायकोप्लाझ्मा प्रजातीतील रोगकारक जीवांचे संक्रामण होऊन वृक्षाला विशिष्ट रोग होतो.

लिंबू गटातील बहुतेक सर्व वृक्षांवर विशेषतः संत्रे व मोसंबी या झाडांवर डायफेरिना सिट्री ही सायलाची जाती आढळते. भारतात सर्वत्र या किडीचा उपद्रव आढळतो. विशेषेकरून महाराष्ट्रातील विदर्भ व पंजाब येथे संत्र्याच्या व पुष्कळदा मोसंब्याच्या झाडावर हिचा बराच प्रादुर्भाव होतो. या कीटकांचा रंग गडद तपकिरी असून त्यांचे पंख शरीरावर छपरासारखे धरलेले दिसतात. अर्भके फिकट तपकिरी व २ मिमी. लांब असतात. त्यांना पंख नसतात परंतु त्यांच्या छातीवर पंखांचे लहान भाग दिसतात. ते पानांवर उड्या मारतात वा उडतात. मादी गर्द पिवळी, लांबट व दोन्ही टोकांना निमुळती होत गेलेली अंडी झाडाच्या कोवळ्या भागावरील पानांच्या देठांवर घुसविते. सर्वसाधारणपणे ४ ते ६ दिवसांत (हिवाळ्यात सु. २० दिवसांत) अंडी उबून पिले अंड्यांतून बाहेर पडतात. दोन आठवड्यांत चार वेळा कात टाकून अर्भकाची वाढ पूर्ण होते. पूर्ण वाढ झालेला सायला कीटक सु. ६ महिने जगतो. सायला कीटक व त्याची अर्भके झाडाचे कोवळे शेंडे, कळ्या, पाने व फळे यांतून रस शोषून घेतात. यासाठी त्यांच्या मुखांगांची रचना वैशिष्ट्यपूर्ण अशी झालेली असते. मुखांग कोशिकेत (पेशीत) खुपसून त्याद्वारे वनस्पतीतील रस शोषून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त अशी ही रचना असते. रस शोषला गेल्याने पाने गुंडाळली जातात व सुकतात लहान शेंडे व कळ्या यांची वाढ खुंटते व ती खुरटतात. ती सुकू लागतात आणि शेवटी झाडावरून गळून पडतात. तसेच झाडाच्या फांद्याही सुकून वाळतात. शिवाय या कीटकाच्या शरीरातून स्रवलेला गोड पदार्थ पानांवर पसरतो. परिणामी कोंबांवर काळी बुरशी (काजळी) वाढते. सायलाच्या विशेष तीव्र प्रादुर्भावामुळे झाड फळे धरत नाही फांद्या सुकू लागतात आणि कधीकधी झाड मरते.

अशा रीतीने सायलामुळे फळझाडांचे बरेच नुकसान होते. या किडीच्या नियंत्रणासाठी पॅरॉथिऑन, मॅलॅथिऑन, निकोटीन सल्फेट, एंड्रीन, थायमटोन डिमेक्रॉन किंवा मेटसिस्टॉक्स यांसारखी विविध प्रकारची कीटकनाशके पाण्यात मिसळून फुले येण्याच्या वेळी दर आठवड्याने एकदा अशी तीन वेळा त्यांची फवारणी करतात.

पहा : मोसंबे संत्रे.

ठाकूर, अ. ना.