फळरसशोषकपतंग : लेपिडॉप्टेरा गणातील नॉक्ट्युइडी कुलामध्ये या कीटकांचा समावेश होतो. भारतात या पतंगाच्या २० जाती विविध राज्यांत आढळता त. पैकी ऑफिडेरस फुलोनिका, ऑ. जॅनेटा व ऑ. मॅटर्ना या महाराष्ट्रातील प्रमुख जाती असून त्या विशेषतः मोसंबी , द्राक्षे व लिंबू वर्गीय फळे यांना उपद्रवी ठरल्या आहेत. प्रौढ पतंग मोठे ( लांबी २ · ५ ते ३ सेंमी .) व बळकट असतात. साधारणपणे त्यांचे पुढील पंख करडे वा तांबूस तपकिरी असून त्यांवर हिरवे पट्टे असतात मागील पंख नारिंगी वा पिवळे असून त्यांच्यावर काळे ठिपके व कडांशी गर्द पट्टे असतात. पंखांचा विस्तार सु. ७ · ५ सेंमी असतो. यांना सोंडेसारखा अवयव असून फळाच्या सालीमध्ये घुसविण्यातइतपत तो बळकट असतो.
मादी एका वेळेस सु. २०० ते ३०० अंडी घालते. सामान्यपणे मेनिस्पर्मेशी कुलातील गुळवेल, वसनवेल यांसारख्या जंगली वनस्पतींवर ती अंडी घालते. अंडे ३- ४ दिवसांत उबून नलिकाकार, जाडी, गडद मखमली तपकिरी रंगाची व उंट अळीसारखी अळी बाहेर पडते. वरील वनस्पतींच्या पानांवर अळ्या जगतात. १३ ते १७ दिवसांनी अळी मातीमध्ये कोशावस्थेत जाते. १२ ते १८ दिवसांनी कोशातून पतंग बाहेर पडतो. अशा तऱ्हेने २७ ते ३९ दिवसांत या पतंगाचे जीवनचक्र पूर्ण होते व हंगामात त्याच्या २- ३ पिढ्या निर्माण होतात.
सामान्यतः पिकू लागलेल्या फळांवर संध्याकाळनंतर हे पतंग हल्ला करतात व त्यांच्या सालीतून सोंड आत घुसवून फळांचा रस शोषून घेतात. परिणामी फळे सुरकततात व गळूनही पडतात. यांनी पाडलेल्या छिद्रांमधून सूक्ष्मजंतू व कवकांचा( बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित सूक्ष्म वनस्पतींचा) फळात प्रवेश होणे सुलभ होते. अशा प्रकारे दूषित झालेली फळे सडतात वा खाण्यास निरुपयोगी होतात. अशा तऱ्हेने या पतंगांमुळे फळांचे बरेच नुकसात हाते. उदा., २० ते ४०% संत्री गळतात व निरुपयोगी होतात.
या पतंगांचे नियंत्रण करणे फार अवघड असते. फळांवर असतांना हे पतंग अतिशय सुस्त असतात. तेव्हा ते हाताने वेचून वा जाळ्यात पकडून नष्ट करतात. तसेच ० · २ टक्के बीएचसी यासारख्या कीटकनाशकाची धुरळणी वरचेवर केल्यासही फायदा होतो. हे पतंग प्रकाशाकडे आकर्षित होत असल्याने रात्री फळबागेत दिवे लावून त्यांना आकर्षित करतात व नंतर नष्ट करतात. विषयुक्त आमिष असलेला विद्राव फळबागेत मडक्यात ठेवतात. कधीकधी अशा विद्रावात फळाचा रस वा व्हिनेगर ठेवतात त्यामुळे आमिषाचे आकर्षण अधिक वाढते. यांशिवाय फळांभोवती कागदी पिशव्या बांधणे, ज्यांवर या पतंगाच्या अळ्या जगतात त्या वनस्पती नष्ट करणे, खाली पडलेली फळे लगेच नष्ट करणे इ. उपायही त्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी वापरतात.
पोखरकर, रा. ना.
“