सोसा : (हिंगा). ज्वारी, बाजरी, द्विदल जातीची काही पिके तसेच भोपळा, काकडी यांसारख्या पिकांवर आढळून येणारे मध्यम आकाराचे कीटक. अमेरिका, दक्षिण यूरोपातील देश, भारत, पाकिस्तान, श्रीलंका व इतर पौर्वात्य देशांत हे कीटक आढळून येतात. भारतात या कीटकापासून बाजरी, भोपळा व काकडी यांसारख्या पिकांचीच मुख्यत्वेकरून हानी होते. बाजरीवर दिसून येणारे लिट्टा प्रजातीतील कीटक साधारणतः १·९ सेंमी. लांबीचे असून ते फिकट बदामी अथवा हिरवट निळ्या रंगाचे असतात. ते फुलोरा व पराग खातात, त्यामुळे कणसात दाणे भरत नाहीत. भोपळे व काकडी यांसारख्या पिकांवरील झोनॅब्रिस पर्च्युलॅटा हे कीटक साधारणतः २·५ सेंमी. लांब असून ते रंगाने काळे व त्यांच्या अंगावर पिवळसर बदामी रंगाचे पट्टे असतात. कोलिऑप्टेरा गणातील मेलॉयडी कुलात यांच्या सु. २,००० जाती आहेत. त्या फुलांच्या पाकळ्या व पराग खाऊन पिकांची हानी करतात. विशेषतः एपिकॉटा प्रजातीतील . फ्यूनेब्रिस, ए. व्हिट्टाटा या जाती आल्फा-आल्फा, बीट, बटाटा, टोमॅटो यांसारख्या पिकांचे विपर्णना-द्वारे (शरीरातील रसायने वापरून झाडांची पाने नष्ट करणे) खूप नुकसान करतात. सोसाच्या काही महत्त्वाच्या जाती आढळतात.

सोसा कीटकाची मादी जमिनीत पुंजक्या-पुंजक्यांनी पांढऱ्या रंगाची असंख्य अंडी घालते. साधारणतः दोन आठवड्यांनी अंड्यांतून अळ्या बाहेर पडतात. ह्या अळ्या ऑर्थोप्टेरा गणातील नाकतोड्यांच्या अंड्यांवर उपजीविका करतात त्यामुळे त्यांना उपयुक्त कीटक असेही म्हणता येते[ ⟶ नाकतोडा]. सुरुवातीस ह्या अळ्यांपैकी बऱ्याचशा मरतात व उरलेल्या अळ्या निरनिराळ्या अवस्थांमधून जाऊन शेवटी त्यांचे कोशांत रूपांतर होते. या कोशांतून पूर्ण वाढ झालेले कीटक बाहेर पडतात. ही कीड पिकांवर साधारणतः ऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत आढळून येते.

लिट्टा प्रजातीतील स्पॅनिश फ्लाय (लि. व्हेसिकॅटोरिया) तसेच मायलॅब्रिसएपिकॉटा या यूरोपियन प्रजाती औषधोपयोगी असून त्यांच्या बाह्य कवचातील ग्रंथीच्या स्रावापासून कँथॅरिडीन हे रासायनिक द्रव्य तयार होते. ते फक्त इडीमेरिडी कुलातील सोसांच्या जातींपासून मिळते. त्याचा वापर पूर्वी मानवी वैद्यक व पशुवैद्यकात प्रामुख्याने उदस्फोटक व प्रक्षोभक म्हणून औषधांत केला जात होता. कँथॅरिडीन सस्तन प्राण्यांत पोटातून दिल्यास वा त्वचेवाटे शोषले गेल्यास ते मोठ्या प्रमाणावर विषारी ठरू शकते. औषधांत ते मूत्रल (लघवी साफ करणारे) आहे.

बोरले, मु. नि.