काळी माशी : ही कीड कोबी, फुलकोबी, मुळा, मोहरी आणि तत्सम पिकांवर आढळते. ती भारतात सर्वत्र आढळते. तिच्यामुळे मुळ्याच्या पिकाचे खूप नुकसान होते. तिचे शास्त्रीय नाव अथॅलिया प्रॉक्झिमा  (कुलटेन्थ्रेडिनिडी गण-हायमेनॉप्टेरा) आहे. ती ६ मिमी. लांब व जाड असून शरीरावर काळ्या व नारिंगी खुणा असतात. तिचे पंख धुरकट असून त्यांवर काळ्या शिरा स्पष्ट दिसतात. तिला पंखांच्या चार जोड्या असतात. हिची पूर्ण वाढलेली अळी काळी, गुळगुळीत व १८ मिमी. लांब असते आणि तिच्या शरीरावर पाच लांब पट्टे असतात. त्यांना धक्का लागताच त्या अंगाचे वेटोळे करून जमिनीवर मृतवत्‌ पडून राहतात. त्यावरील पिकांची पाने खाऊन नुकसान करतात. आक्रमणाची तीव्रता जास्त असल्यास पानांच्या फक्त शिराच तेवढ्या शिल्लक राहतात.

काळी माशी व तिची अळी

माद्या पानांच्या ऊतकांत (समान रचना आणि कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहांत) अंडी घालतात. साधारणत: एक आठवड्याने उबून अळ्या बाहेर पडतात. त्यांची वाढ सु. दोन आठवड्यांत पूर्ण होते व नंतर त्या जमिनीत शिरून कोषावस्थेत जातात. कोषावस्था १०–१२ दिवस टिकते. ऑक्टोबर–मार्चच्या दरम्यान ह्या किडीचा पिकांना उपद्रव होतो. एक भाग पायरेथ्रम एक हजार भाग पाण्या‌त मिसळून फवारल्यास ह्या किडीचे नियंत्रण होते.

बोरले, मु. नि.