स्तबक : विविध साहित्यिकांच्या निवडक गद्यपद्य कृतींचा संग्रह वा संकलन. स्तबक म्हणजे गुच्छ. असा संग्रह पूर्णतः गद्य वा पूर्णतः पद्य कृतींचाही असू शकतो. स्तबक हा शब्द ‘ अँथॉलॉजिया ’ ह्या ग्रीक शद्बा-पासून आलेल्या ‘ अँथॉलॉजी ’ ह्या इंग्रजी शब्दाचा मराठी प्रतिशब्द म्हणून वापरला आहे. ग्रीक अँथॉलॉजिया ह्या नावाने निघालेल्या स्तबकातग्रीक सुभाषिते, गीते, समाधिलेख ( एपिटाफ्स ) अंतर्भूत आहेत. त्यात सु. ३,७०० लघुकाव्ये अंतर्भूत आहेत. यातील काही लघुकाव्ये ही इ. स. पू. सातव्या शतकातील असून, काही लघुकाव्ये इ. स. दहाव्या शतकातील आहेत. अँथॉलॉजियात संग्रहित केलेल्या रचना मेलिएजर ( इ. स. पू. पहिले शतक ) ह्या ग्रीक सुभाषितकाराने संकलित केलेल्या, ज्ञात असलेल्या सर्व प्राचीन स्तबकांच्या भोवती गुंफल्या गेल्या आहेत. त्याने या स्तबकाला Stephanos ( मराठी अर्थ ‘ मुकुट ’ वा ‘ फुलांचा गुच्छ ’ ) असे नाव दिले होते. ह्या स्तबकाचा परिचय करून देण्यासाठी त्याने एक कविता रचली होती. तीत ह्या स्तबकात अंतर्भूत केलेल्या रचनांच्या एकेका कर्त्याची तुलना एकेका फुलाशी केली होती. इ. स. नवव्या शतकाच्या उत्तरार्धात कॉन्स्टंटिनस सेफालस याने मेलिएजरच्या या स्तबकात थेसालोनायकीचा फिलीपस ( पहिले शतक ), ग्रीक व्याकरणकार डायजीनीएनस् ( दुसरे शतक ) आणि बायझंटिन ग्रीक इतिहासकार आगेथिअस यांच्या कृतींचा समावेश केला. दहाव्या शतकाच्या उत्तरार्धात सेफालसच्या या स्तबकाला सुधारित आणि विस्तारित रूप दिले गेले. Anthologia Palentina या सुधारित स्तबकात ग्रीक अँथॉलॉजिया तल्या पहिल्या १५ पुस्तकांचा समावेश आहे.

मराठी साहित्यातही उल्लेखनीय स्तबके आहेत. उदा., नवनीत ( जुन्या कवितांच्या वेच्यांचा संग्रह ), संपा., परशुरामपंत तात्या गोडबोले, १८५४ महाराष्ट्र वाङ्मय ( प्राचीन मराठी वाङ्मयातील विविध कवींच्या उत्कृष्ट वेच्यांचा संग्रह ), संपा., विनायक कोंडदेव ओक, १९०६ काव्यकौमुदी ( अर्वाचीन काव्यातील १३८ कवींच्या २५३ कवितांचा संग्रह ). मराठी-तील कवी आणि समीक्षक ⇨ दिलीप पुरुषोत्तम चित्रे ह्यांनी १९४५—६५ ह्या कालखंडातील वेचक मराठी कवितांचा इंग्रजी अनुवाद ॲन अँथॉलॉजी ऑफ मराठी पोएट्री (१९६७) ह्या नावाने प्रसिद्ध केला आहे.

स्तबके ही विविध विषयांची असू शकतात. उदा., राष्ट्रीय स्तरावरील प्रातिनिधिक स्वरूपाचे निवडक लेखन विशिष्ट कालखंडातील वा विशिष्ट साहित्यप्रकारातील संकलने विशिष्ट लेखकाचे लेखन एका विषयाशी संबंधित लेखन विशिष्ट नियतकालिकातील संकलित साहित्य इत्यादी.

गुडेकर, विजया