परंपरागत

भा ट : वांशिक दृष्टीने भाट ही राजस्थानातील एक जात. उंच दांडयाचा भाला वा तलवार, कमरेला कटयार, लांब दाढी-कल्ले, लांब अंगरखा, फेटा असा राजस्थानी भाटांचा पोशाख असतो. समाजशास्त्रज्ञांची मते भिन्न आहेत पण हे भाट स्वतःला ब्राह्यण समाजतात,यज्ञोपवीत धारण करतात. लोककथेप्रमाणे शिवाच्या निढळाच्या घमातून किंवा कविनामक ऋषीपासून ते आपली उत्पत्ती मानतात. त्यांच्यात ब्रह्यभाट, राणीमंगा, वाटी, चंद्रसा, बूना, शासनी, बोखा, तूरी, केदारी असे पोटभेद आहेत. गौरीपती, बडे वीर, शारदा या त्यांच्या उपास्यदेवता. सध्या भाटांमध्ये शाक्त, कबीर, रामानुज अशा पंथाचेही लोक आहेत.

भाट शब्द मूळ संस्कृत ‘भट्ट’ वरून आला. अपभ्रंश रूप ‘बारहट’. संशोधकीय दृष्टीने वैदिक काळातले. गाथागायक, महाभारत-पुराणकालीन सूत, त्या पुढील काळातील मागथ, बंदी यांचे वंशज भाट होत. भाट आणि चारण जातीने व वृत्तीने एक नाहीत. धन्याच्या वंशावळी ठेवणे, त्यांची स्तुती करणे हा भाटांचा प्रधान, पिढीजात व्यवसाय होय. त्यांच्या स्पष्टवक्तेपणाच्या गुणामुळे राजेरजवाडेदेखील त्यांना वचकून असत आणि त्यांचा योग्य मान राखीत. राजपुतांचा शेकडो वर्षाचा इतिहास भाटांच्या बाडांतूनसुरक्षित आहे. प्राणत्याग करून किंवा प्राणत्यागाचा धाक दाखवून लोकांना कुकर्मापासून वाचविणे हा भाटांचा स्वभाव आहे. हल्ली बरेचसे भाट गोष्टी सांगून, गाणी म्हणून आपला निर्वाह चालिवतात काही भीकही मागतात.

स्तुतिपाठक’ या सामान्य अर्थाने भाट हा शब्द मराठीत रूढ झाला आहे. इंग्रजीतील ‘बार्ड’ हा शब्द कवी किंवा स्तुतिपाठक या अर्थाचा समान शब्द आहे. स्तुतिपर किंवा उपरोधपर पद्यपरचना करणाऱ्या केल्टिक कवींना अभिजात ग्रंथकार बार्ड ही संज्ञा योतील. ‘डूइड’ (प्राचीन गॉल व ब्रिटनमधील भविष्य वर्तविणाऱ्या किंवा मांत्रिकांचा वर्ग) च्या एका गटाला हा शब्द सीझरने योजिला आहे. लॅटिन ग्रंथकारांच्या मते ‘बार्डी’ ही राष्ट्रकवीची पदवी होय. वेल्समध्ये ‘बार्ड’ हा कवीचा समानार्थक शब्द म्हणून रूढ होता. बार्डिक काव्यरचनेचे वैशिष्टय म्हणजे अनुप्रास आणि अंतर्यमक यांनी नटलेली शब्दरचना. हे तंत्र एकंदर काव्यरचेतूनही अनुसरलेले दिसतेच. आधुनिक काळात राजदरबारातील नियुक्त कवी हे तंत्र योजतात तर ज्यांना राजकवी किंवा राष्ट्रकवी म्हणून गुणावत्तेने सन्मान मिळतो, ते राजाचा वाढदिवस वगैरे प्रसंगोपात्त रचना सोडल्यास वृत्तरचनेचे स्वातंत्र्य निखालस घेतात. इंग्रजीत ‘कवी’ या अर्थाने ‘बार्ड’ हा शब्द प्रचलित आहेच.

भाट, गो. के.