परमानंद: (१७९१–सु. १८७९). प्रख्यात काश्मीरी कवी. मूळ नाव नंदराम. जन्म अनंतनाग तालुक्यातील सीर नावाच्या एका खेड्यात. काश्मीरवर तेव्हा अफगाण राजवट होती. मकताब येथे त्याने फार्सीचे अध्ययन केले. एखाद्या व्युत्पन्न संस्कृत पंडिताजवळ त्याचे संस्कृतचे अध्ययन झाले असावे कारण हिंदू तत्त्वज्ञानाची व गूढवादाची अत्यंत सखोल जाण त्याच्या काव्यातून दिसून येते. वयाच्या पंचविसाव्या वर्षी त्याची पटवारी म्हणून नेमणूक झाली. या पदावर त्याने मोठ्या आवडीने प्रदीर्घ काळ काम केले. आयुष्याच्या अखेरी–अखेरीस त्याला आध्यात्मिक गुरुपद लाभले. त्याच्या भोवती बराच मोठा अनुयायी वर्ग होता. ह्या अनुयायांत लछमन कौल ‘बुलबुल’ ह्या प्रसिद्ध शिष्याचाही समावेश होता.

काश्मीरी शैव संप्रदायातील त्रिक परंपरेचा तो प्रमुख प्रतिनिधी होता, याबद्दल अभ्यासकांत एकमत आढळते. त्रिक परंपरेत सर्व सृष्टी ईश्वराचाच एक ओसंडून वाहणारा तरंग, शिवनृत्यलीला आहे असे मानले आहे. परमानंदाच्या सर्वच रूपकात्मक काव्यांत मानवी आत्मा व परमेश्वर हे एकमेकांचा एका नृत्यनाट्याद्वारे कायमचा पाठपुरावा करतात, असा आशय आढळतो. गूढवादी आचारविधी, विशिष्ट पंथीय श्रद्धा, हिंदू गूढवादातील प्रतीके व उल्लेख यांतून हीच दृढ श्रद्धा केंद्रस्थानी असल्याचे दिसते. परमानंदाच्या स्फुट रचनेत स्तोत्रे वा गीते यांचा अंतर्भाव होतो. ही स्तोत्रे मुख्यत्वे आध्यात्मिक मार्गावरील मुमुक्षूंना मार्गदर्शन करण्यासाठी रचलेली आहेत तथापि परमानंदाची महत्त्वाची रचना म्हणजे त्याची रादा स्वयंवर (राधा स्वयंवर), ‘दामचर्यथ (सुदामचरित्र) व शे’षलगन (शिवलग्न) ही तीन काव्ये. रादा स्वयंवर हे एक भावगीतात्मक आख्यानकाव्य असून त्यात एकूण तीस गीते आहेत. सो‘दामचर्यथ हे सुदामा व कृष्ण यांच्या भेटीवरील आख्यानकाव्य आहे. शे’षलगनमध्ये सतीने केलेल्या बलिदानाची व हिमालयाच्या उदरी परत जन्म घेऊन शिवाशी केलेल्या विवाहाची कथा आलेली आहे.

परमानंदाची भाषा संस्कृतप्रचुर नसून त्याच्या शब्दकळेत विशेष प्रमाणात दैनंदिन व्यवहारातील काश्मीरीचाच आढळ होतो, असे मत प्रा. जे. एल्. कौल यांनी व्यक्त केले आहे परंतु त्यांचे हे मत चुकीचे आहे. कारण कवीने निवडलेले काव्यविषय हे असे आहेत, की तेथे कवीस प्राचुर्याने संस्कृत शब्दभांडाराचा उपयोग केल्याशिवाय गत्यंतरच नव्हते. विशेषतः शे‘वलगनमध्ये आणि भक्तिपर गीतांत वापरलेली भाषा केवळ दुर्बोधच नाही, तर गूढही आहे. म्हणूनच जॉर्ज ग्रीअर्सनने जिचा उल्लेख ‘हिंदू काश्मीरी’ म्हणून केला ती भाषा परमानंदाने वापरली, असे जे मास्टर झिंदा कौल यांनी म्हटले, ते योग्यच होय.

रादा स्वयंवर या काव्याची रचना संगीतानुकूल असून सो’दामचर्यथ हे तत्कालीन काश्मीरी काव्यांत भाषेचा काटेकोरपणा व समर्पकता, कथानकाचा ओघ, साधी शब्दकळा, आशयातील भव्योदात्तता व आध्यात्मिक रूपकात्मकता या दृष्टीने अजोड मानले जाते. परमानंदाचा पूर्वसूरी प्रकाश कौल व अनुयायी लछमन कौल ‘बुलबुल’ यांनीही शिवपरिणय या विषयावर प्रदीर्घ अशी आख्यानकाव्ये रचली आहेत तथापि परमानंदाची रचना त्या दोघांच्या रचनेपेक्षा सरस आहे. त्याच्या शे‘षलगनमध्ये तत्कालीन स्थानिक रीतिरिवाज, आचारविधी व विवाहविधी यांची वर्णने आढळतात. ती अर्थातच काव्याच्या प्रकृतीशी विसंगत वाटतात. श्लेषयोजना, यमकांचे प्राचुर्य, सखोल आध्यात्मिक अनुभूती, धार्मिक श्रद्धा इ. गुणविशेष परमानंदाच्या काव्यात विशेषत्वाने आढळतात. काश्मीरी त्रिक तत्त्वज्ञानाच्या गूढवादी परंपरेतील एक श्रेष्ठ कवी म्हणून त्याला महत्त्वाचे स्थान आहे.

हाजीनी, मोही-इद्दीन (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)