रसूल मीर : (सु. १८२२–सु. १८७०). प्रख्यात काश्मीरी कवी. रसूल मीरच्या जन्ममृत्यूंच्या निश्चित तारखा तसेच इतर चरित्रपर माहिती उपलब्ध नाही. त्याच्या काव्यातील काही आनुषंगिक निर्देश आणि परंपरा यांच्या आधारे त्याचे कोंगी हिच्याशी प्रेमसंबंध होते, तसेच त्याने तरुण वयाज अभिजात फार्सी काव्याचा अभ्यास केला होता, अशी माहिती मिळते. त्याच्या प्रतिमासृष्टीत अनेक वेळा अभिजात फार्सी कवी ⇨ निजामी- ए–गंजवी याच्या प्रतिमासृष्टीचे स्वच्छ प्रतिबिंब पडलेले दिसते. असे असले तरी, फार्सीतील नावे व गुणविशेषणे तसेच वाक्प्रचार काश्मीरीत आणून ते रूढ करण्याचे श्रेय मीरलाच दिले जाते. ⇨हब्बा खातूनप्रमाणेच मीरचेही वेगळेपण म्हणजे त्याने गूढवादी परंपरेची व मस्नवी-प्रकारची रूढ चाकोरी आत्मविश्वासपूर्वक व मोठ्या धैर्याने सोडून देऊन आपली स्वतंत्र आणि वेगळी काव्यरचना केली. प्रा. कौल यांनी म्हटल्याप्रमाणे त्याने आपली लौकिक स्वरूपाची विशुद्ध प्रेमकविता ईश्वरविषयक प्रेमाच्या गर्भितार्थाने गुदमरू दिली नाही. त्याच्या गीतांत प्रमाथी भावनेचा, उस्फूर्ततेचा, माधुर्याचा व संपन्न लयीचा एक स्वर ओतप्रोत असून, जोवर काश्मीरी काव्य अस्तित्वात असेल तोवर तो निश्चितपणे आळवला जाईल. त्याची आकर्षक शैली, तिच्यातील ऐंद्रिय आवाहन आणि नादमधुर शब्दकळा यांमुळे तो एकोणिसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ काश्मीरी गीतकार म्हणून प्रख्यात झाला. त्याच्या रचनेतील एकच भाषाविषयक दोष–त्याला काश्मीरीत सहज वापर करता येणे शक्य होते अशा ठिकाणीही फार्सी अलंकारांचा व शैलीविशेषांचा मुक्तपणे केलेला वापर म्हणता येईल. मीरने तत्कालीन पद्धतीप्रमाणे फार्सी प्रभावाचा वरील संदर्भात अवलंब केला असला, तरी वस्तुतः त्यामुळे त्याच्या प्रतिभेस–त्याच्या गीतांत व गझलांतही–कुठल्याही प्रकारे कमीपणा आलेला नाही. मीरच्या अनुयायांवर त्याचा खूपच प्रभाव पडला. त्याच्या अनुयायांत श्रेष्ठ कलावंत ⇨महजूर याचाही अंतर्भाव होतो.

श्रीनगर येथील ‘गुलाम मोहंमद नूर मोहंमद’ प्रकाशनाने मीरच्या काही गीतांचा संग्रह बहार-ए-गुल्शन-ए-काश्मीर नावाने सु. पन्नास वर्षांपूर्वी प्रथमच प्रसिद्ध केला. एम्. युसूफ तेंग यांनी मीरच्या जीवनावर व कृतींवर १९६० मध्ये एक पुस्तिका संपादित केली असून ती काश्मीरच्या ‘कल्चरल अकादेमी’ने प्रसिद्ध केली आहे. मीरची रचना कालोदरात गडप न होता व्यावसायिक भाटांमुळे मौखिक परंपरेने बऱ्याच प्रमाणात सुरक्षित राहू शकली. मीरच्या नावावर जैब निगार नावाची एक मस्नवीही सांगितली जाते पण ती आजपर्यंत तरी उपलब्ध होऊ शकली नाही. दुरू शाहबाद येथे मीरचे दफन करण्यात आले असून तेथे त्याची कबर आहे. त्याच्या कबरीस आजही अनेक काश्मीरी कवी व लोक भेट देतात आणि नव्या आशयाने व नव्या लयीने काश्मीरी काव्य समृद्ध करणाऱ्या ह्या श्रेष्ठ कवीच्या स्मृतीस आपली आदरांजली वाहतात.

हाजिनौ, मोही हद्दीन (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)