वह्‌हाब परे, अब्दुल : (१८४६-१९१४). काश्मिरी कवी. हाजिन येथील रहिवाशी. त्याच्या वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी त्याच्या पित्याचे निधन झाले. पुढे त्याचे पालनपोषण व शिक्षण त्याच्या आईने पूर्ण केले. त्याने फार्सी भाषेवर असामान्य प्रभुत्व संपादन केले. तो महसूल खात्यात पटवारी म्हणून सुरुवातीला नोकरीला होता. पुढे त्याने पुरवठा अधिकारी, झैलदार व नायब तहसीलदार ह्या पदांवर कामे केली. शिवाय तो प्रतिष्ठित जमीनदार व कंत्राटदारही होता. 

आपल्या त्रेपन्न वर्षांच्या प्रदीर्घ वाङ्‍मयीन कारकीर्दीत त्याने काश्मीरी साहित्यातील जवळजवळ सर्व वाङ्‍मयप्रकार हाताळले. फार्सीमधील विपुल रचना काश्मीरीमध्ये आणल्या. त्याच्या साहित्याची अनुवादित व स्वतंत्र अशा दोन गटांत विभागणी केली जाते. अनुवादित साहित्य : (१) हमीदुल्ला इस्लामाबादीच्या अकबरनामा ह्या मूळ फार्सी महाकाव्याचा अनुवाद त्याने एकूण २,२४० काश्मीरी पदांमध्ये केला. त्यात इंग्रज-अफगाण युद्धांचा विषय आला आहे. ब्रिटिश साम्राज्यवादाचे खरेखुरे स्वरूप उघड करणारे हे एकमेव काश्मीरी महाकाव्य म्हणता येईल. (२) फिर्‌दौसीच्या विश्वविख्यात शाहनामा महाकाव्याचा अनुवाद (पदसंख्या-काश्मीरी २३,४९१ पदे). इराणवरील मुस्लिम स्वारीचा विषय चौथ्या खंडात आला आहे. वह्‌हाबने ह्या विषयावर अनेक वर्षे व्यासंग व संशोधन करून ह्या भागाचे काव्यरूपांतर केले आहे. ते ‘खिलाफतनामा’ म्हणून ओळखले जाते. ह्या भागाच्या एकूण ६,६६६ काश्मीरी पदांपैकी केवळ सु. २,४०० पदे फिर्‌दौसीच्या मूळ काव्यावर आधारित आहेत. (३) सुलतानी-प्रसिद्ध काश्मीरी संत शेख हमझा मखदूम याच्या जीवन व धर्मकार्यासंबंधी त्याच्या शिष्यांनी रचलेल्या पाच चरित्रांचा ११,७५३ पदांमध्ये केलेला हा अनुवाद आहे. गूढवादी सुऱ्हावर्दी पंथावरील ही अद्वितीय काव्यकृती मानली जाते. पंधराव्या शतकातील काश्मीरच्या लोकजीवनाच्या विविध पैलूंवर त्यातून उद्‌बोधक प्रकाश पडतो. (४) याशिवाय हफ्त किस्सा-ए-मक्कार-ए-झन (स्त्रीच्या धूर्तपणावर आधारित सात कहाण्या), हफ्त किस्सा-ए-आमा (अंधाविषयी सात कहाण्या), किस्सा-ए-चार-दरवेश(चार दरवेशांची कहाणी) व बहराम-ए-गोरे हे साहित्य फार्सीमधून तर नौनिहाल-ए-गुलबदन ही अद्‍भुतरम्य कहाणी उर्दूमधून त्याने काश्मीरीमध्ये भाषांतरित केली. हे सर्व अनुवाद वह्‌हाबने वयाच्या चाळीशीपूर्वीच पूर्ण केले. स्वतंत्र साहित्यकृती : (१) शक्ल-उ-शमा एल आलन हझरत (पवित्र प्रेषिताची शारीर चिन्ह वर्णने) – अनेक अरबी मूळ ग्रंथांचा आधार घेऊन ३३३ पदांमध्ये ही रचना केली आहे. (२) सेहलाबनामा-१८९५ च्या महापुराने घातलेल्या थैमानाचे वर्णन करणारी ही मस्‍नवी आहे. (३) दरवेश-समकालीन संत व विद्वज्जन यांच्यावरील ७०० पदांची ही मस्‍नवी असून, तीत अनेक तत्कालीन सामाजिक-राजकीय समस्यांना स्पर्श केला आहे. (४) दीवान-ए-ह्‌हाह्या काव्यसंग्रहात वह्‌हाबच्या एकूण ७८१ कविता संगृहीत आहेत. त्यात भिन्नभिन्न प्रकारची ३० अंत्ययमके (रदीफ) साधलेली असून त्यांत काश्मीरी वर्णमालेतील सर्व वर्णांचा समावेश आहे. प्रत्येक वर्णाचे एकेक सूक्त आहे. प्रेषितावर स्तुतीपर काव्य आहे. सनातनी खलिफांवर व शेख हमझा मखदूमवर प्रशंसापर कवने आहेत. तसेच विविध वृत्तांमध्ये गझला व गीते आहेत. यातली अखेरची रचना १९०७ मध्ये लिहिली गेली.

वह्‌हाबच्या काश्मीरी साहित्यातील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीवर प्रा. हाजिनी यांनी गुलरेझ या नियतकालिकातून लेखमाला लिहिली (१९५१-५३), तसेच एक पुस्तिकाही लिहिली (१९५९). ही पुस्तिका ‘कल्चरल अकॅडमी’ने प्रकाशित केली (१९६०). एक महाकवी, तसेच बव्हंशी पारंपरिक काव्यप्रकारांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण प्रयोगशील निर्मिती करणारा कवी म्हणून वह्‌हाबचे काश्मीरी साहित्यात अनन्यसाधारण स्थान आहे.  

हाजिनी, मोही-इद्‌दीन (इं.) इनामदार, श्री. दे. (म.)