प्रक्षेपण, मानसशास्त्रीय : (प्रोजेक्शन, सायकॉलॉजिकल). मनोविश्लेषणातील एक संकल्पना. आपणास हवे असलेले यश प्राप्त होत नसले, उद्दिष्टप्राप्तीसाठी केलेली धडपड वाया गेली किंवा आपल्या सुखाच्या आड दुर्लंध्य अडथळे आले, की माणसाला ⇨ वैफल्यभावना अनुभवास येते त्याचा आत्मविश्वास डळमळू लागतो. अशा वेळी आपल्या अहम्‌चे जतन करण्यासाठी मनुष्य पुष्कळदा दोषारोपांची प्रतिक्रिया व्यक्त करतो. आपल्या अपयशाचे खापर तो कुणावर अथवा इतर कशावर तरी फोडतो. प्रक्षेपण ही अशीच एक दोषारोपाची प्रतिक्रिया आहे. दोषारोपाची प्रतिक्रिया आहे. दोषारोपाची प्रतिक्रिया ही अहम्‌च्या रक्षणार्थ केलेली क्रिया असून ती ‘संरक्षणयंत्रणे’चाच एक आविष्कार होय [⟶ अहं].

आपल्या ठिकाणच्या बलवत्तर प्रेरणा कबूल न करता, त्या प्रेरणांचा इतरांवर आरोप करणेदेखील ‘प्रक्षेपणा’चीच प्रतिक्रिया होय. उदा., रस्त्याने जाणारे-येणारे पुरुष आपणाकडे वाईट नजरेने पाहतात, अशी तक्रार दीर्घकाल विवाह न झालेली स्त्री करते. खरे म्हणजे, तिचे स्वतःचेच मन अबोधपणे कामविषयक कल्पनांत गुरफटलेले असते परंतु स्वतःच्या अहम्‌ला अप्रशस्त वाटणारा हा प्रकार असल्यामुळे, आपण अगदी निष्पाप असून इतरांच्याच नजरेत आपल्याविषयीची वाईट भावना आहे, असा प्रक्षेपणात्मक दोषारोप तिच्याकडून होतो.

प्रक्षेपणप्रक्रियेमुळे इतरांच्या वर्तनात माणसाला आपल्या विचार-कल्पनांचे प्रतिबिंब दिसते. माणूस अंतस्थ खळबळजनक विचारांनी व प्रबळ प्रेरणांनी अस्वस्थ झालेला असला, की त्याला दुसऱ्या लोकांनी अगदी अभावितपणे केलेल्या साध्या, सरळ, क्षुल्लक हावभावांतही विशिष्ट अर्थ दिसू लागतो.

व्यक्तिमत्वाच्या अभ्यासात मानसशास्त्रवेत्ते कधीकधी प्रक्षेपणात्मक तंत्रे वापरतात. या तंत्रपद्धतीमध्ये व्यक्तीला संदिग्ध आशयाची चित्रे अथवा शाईचे डाग दाखविण्यात येतात आणि त्यांत तिला कोणत्या आकृती दिसतात अथवा त्या चित्रांवरून तिला कोणती कथा सुचते ते विचारतात. उत्तरादाखल ती व्यक्ती जे काही सांगते, त्यात तिच्या अबोध मनातील अतृप्त राहिलेल्या इच्छा, प्रेरणा, विचार, प्रवृत्ती इ. प्रकट होतात.

आर्‌. आर्‌. सिअर्स यांनी प्रक्षेपणासंबंधी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची एक चाचणी घेतली. त्या चाचणीत प्रत्येकाने स्वतःचे तसेच इतरांचे गुणदोष मोकळ्या मनाने सांगावयाचे होते. तेव्हा असे आढळून आले, की वर्तनाबद्दल म्हणजे कंजुषपणा, अव्यवस्थितपणा, निर्लज्जपणा, कामचुकारपणा इ. अवगुणांबद्दल ज्यांची प्रसिद्ध होती अशा विद्यार्थ्यांनी आपले वर्तन तितकेसे वाईट नसून, इतर काही विद्यार्थ्यांचे वर्तन अधिक वाईट आहे, असे सातत्याने व आग्रहपूर्वक सांगितले.

प्रक्षेपणाने माणसाला अप्रत्यक्ष रीत्या समाधान लाभते. ज्याप्रमाणे स्वप्नात माणसाच्या दडपलेल्या इच्छांना अभिव्यक्ती लाभते आणि त्यायोगे त्या इच्छांची अप्रत्यक्षपणे तृप्ती होते, त्याचप्रमाणे प्रक्षेपणातही माणसाच्या अव्यक्त आणि अतृप्त विचारांना व इच्छांना अभिव्यक्ती आणि तृप्ती लाभते. प्रक्षेपणाद्वारा व्यक्तीच्या प्रेरणा व तिचा अहम्‌ यांच्यातील संघर्षाचा तिच्यावरील ताण कमी होण्यासही मदत होते.

प्रक्षेपण ही एक संरक्षण-प्रतिक्रिया असते आणि ती अहम्‌रक्षणार्थ घडत असते हे जरी खरे असले, तरी तिचा अतिरेक व्यक्तिमत्त्वाला घातक ठरतो. स्वतःच्या अनिष्ट प्रवृत्ती व हेतू इतरांमध्ये पाहण्याचा अतिरेक झाला, तर अशा व्यक्तीच्या मनात स्वतःविषयी आणि जगाविषयी अनेक संभ्रम (डिलूझन) निर्माण होतात आणि परिणामी तिच्या वर्तनात शोचनीय विकृती निर्माण होते.

पहा : मनोविश्लेषण.

संदर्भ : 1. Anderson, H. H. Anderson, G. L. Ed. An Introduction to Projective Techniques and Other Devices for Understanding the Dynamics of Human Behavior, Englewood Cliffs, N. J., 1956.

2. Maier, N. R. F. Frustration, New York. 1949.

केळशीकर, शं. हि.