श्री चंद्र : ( अकरावे शतक ). अपभ्रंश भाषेतील प्रसिद्ध कवी आणि कथालेखक. हा ⇨कुंदकुंदाचार्यां च्या परंपरेतील वीरचंद्राचा शिष्य होता. ह्याने ⇨समंतभद्रा च्या रत्नकरंड ह्या गंथावर रत्नकरंडशास्त्र हा गंथ लिहिला. ह्या गंथाचे स्वरूप विस्तृत व्याख्यानाचे आहे. हा आचार गंथ असून जैन दर्शनविषयक धार्मिक-नैतिक कथा त्यात अंतर्भूत आहेत. ह्या गंथाचे २१ संधी ( अध्याय ) असून त्यांच्या अखेरीस असलेल्या पुषिकेत, आपण धार्मिक भावनेतून हा गंथ लिहीत आहोत असे त्याने म्हटले आहे. स्वत:चा उल्लेख त्याने पंडित श्रीचंद्र असा केलेला आहे. तसेच हा गंथ श्रीपालपुरात, कर्ण राजाच्या कारकीर्दीत १०६६ मध्ये पूर्ण झाल्याचे तो नमूद करतो. त्याचा दुसरा गंथ ⇨कथाकोश असून वैराग्यनिर्मिती करणे हा त्यातील कथांचा उद्देश आहे.

तगारे, ग. वा.