ऑनिकॉफोरा : आर्थ्रोपोडा (संधिपाद) संघातील काही प्राण्यांचा हा लहान पण कुतूहलजनक समुदाय आहे. या संघातील इतर प्राण्यांपेक्षा हे प्राणी पुष्कळ महत्त्वाच्या बाबतीत इतके भिन्न आहेत की, त्यांचा एक निराळा वर्ग केलेला आहे. पुष्कळ प्राणिशास्त्रज्ञांना ही वर्गवारी मान्य नसून

ऑनिकॉफोरा : पेरिपॅटस

 त्यांनी या समुदायाला स्वतंत्र संघाचे स्थान दिले आहे. ऑनिकॉफोरात सात वंश आणि त्यांच्या सु. ११० जाती यांचा समावेश होतो. थोडेच वंश असलेल्या एखाद्या लहान समुदायाला स्वतंत्र वर्गाचे अथवा संघाचे स्थान देणे याचाच अर्थ असा की, प्राणिसृष्टीतील इतर काही समूहांचे परस्परांशी असलेले महत्त्वाचे वैकासिक (विकासाविषयीचे) संबंध तो सूचित करतो आणि या दृष्टीनेच त्याचे असामान्यत्व असते. ॲनेलिडा (वलयी संघ) व आर्थ्रोपोडा यांना जोडणारा ऑनिकॉफोरा हा दुवा आहे असे पुष्कळ प्राणिशास्त्रज्ञांचे मत आहे.

ऑनिकॉफोरांची बरीच लक्षणे आर्थ्रोपोडांच्या प्रारूपिक (नमुनेदार) लक्षणांसारखी आहेत [उदा., जंभ (भक्ष्य पकडण्याकरिता किंवा त्याचे तुकडे करण्याकरिता अन्नमार्गाच्या पुढच्या असणाऱ्या संरचना) उपांगांपासून उत्पन्न झालेले असतात देहगुहा ही रुधिर-गुहिका (खऱ्या देहगुहेची जागा घेणारा रुधिर तंत्राचा म्हणजे रक्ताभिसरणाचाच फैलावलेला भाग) असते रंध्रे असलेले पृष्ठस्थ हृदय देहगुहेचा ऱ्हास होऊन ती वृक्ककांच्या (नळीसारख्या उत्सर्जन-इंद्रियांच्या) व युग्मकवाहिन्यांच्या (शुक्राणू व अंडाणू नेणाऱ्या नलिकांच्या) आतल्या पोकळीच्या स्वरूपात शिल्लक रहाते आणि जननागांची (जननेंद्रियांची) सर्वसाधारण रचना]. रचनेच्या दृष्टीने आर्थ्रोपोडांशी ज्यांचा निकट संबंध आहे त्या सखंड कृमींची (ॲनेलिडा संघाची) पुष्कळ लक्षणे यांच्यात आढळतात [उदा., डोळ्यांची रचना वृक्ककांचा खंडयुत विन्यास (रचना), पक्ष्माभिकामय (केसाळ वाढीने युक्त असलेल्या) युग्मकवाहिन्या साधा आहारनाल (मुख ते गुद असा अन्नमार्ग) इ.]. यावरून ऑनिकॉफोरा हा या दोन संघांमधील संक्रमणावस्थेचा शिल्लक राहिलेला समूह असावा असे दिसते.

     आर्थ्रोपोडांचे जीवाश्म (अवशेष) कँब्रियन कल्पाइतक्या (सु. ५० कोटी वर्षांपूर्वीइतक्या) प्राचीन भूवैज्ञानिक कालात आढळलेले आहेत, पण त्या वेळी देखील समुद्री आर्थ्रोपोडांचे निरनिराळे वर्ग पडलेले होते. लाखो वर्षांनंतर पृथ्वी प्राण्यांना रहाण्यायोग्य झाली. मध्य कँब्रियन कालातील संचयात आढळलेला आयशिआइया हा जीवाश्म शरीराचा आकार, त्वचेची रचना, अवयव इ. बाबतींत स्पष्टपणे आजच्या ऑनिकॉफोरांसारखा आहे, म्हणून ऑनिकॉफोरा हा अतिप्राचीन समूह असणे संभवनीय आहे. शिवाय तुलनात्मक शारीर (शरीररचनाशास्त्र), भ्रूणविज्ञान (भ्रूणाची उत्पत्ती आणि विकास यांची माहिती देणारे शास्त्र) आणि प्रायोगिक संशोधन यांवरून असे दिसते की, प्राचीन काळी, विशेष विस्तार आणि अनेक जाती असलेल्या एखाद्या भूचर प्राण्यांच्या समुदायाचा तो विशेषित अवशेष असावा आणि याच प्राचीन समुदायापासून मिलिपीड (सहस्रपाद), सेंटिपीड (गोम), कीटक इ. उत्पन्न झाले असावेत.

ऑनिकॉफोरांचा भौगोलिक विस्तार व्यापक पण तुटक असून स्थानिक आहे. या वर्गातील जाती वेस्ट इंडीज, पश्चिम मेक्सिको, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग आणि चिली, दक्षिण आफ्रिका, भारत, मलेशिया आणि ऑस्ट्रेलिया या भागांत आढळतात. एखाद्या प्रदेशाच्या विस्तृत भागात अनुकूल परिस्थिती असून देखील यांचे नमुने मधून मधूनच सापडतात. खंडित वितरण आणि यांच्या ठिकाणी असलेली प्रसाराची अगदीच थोडी कुवत लक्षात घेता हा वर्ग विनाशाच्या मार्गावर आहे असे म्हणावे लागते. ऑनिकॉफोरा वर्गात सात वंश आहेत परंतु ते इतके एकसारखे आहेत की, त्या सगळ्यांकरिता पेरिपॅटस  या एकाच नावाचा सामान्यतः उपयोग करण्याची रूढी पडली आहे. पायांच्या संख्येतील फरक जर विचारात घेतला नाही, तर सगळ्या जातींच्या बाह्य लक्षणांत विलक्षण साम्य आढळते.

पहा : आर्थ्रोपोडा पेरिपॅटस

कर्वेनी.