लांब शेपटीचा मार्मोटमार्मोट : स्तनी वर्गाच्या कृंतक (भक्ष्य कुरतडून खाणाऱ्या प्राण्यांच्या) गणातील मार्मोटा प्रजातीतील केसाळ प्राणी. अलास्का पर्वत, कॅनडा, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा उत्तर भाग, पश्चिम यूरोप आणि जवळजवळ सर्व आशिया या प्रदेशांत हा आढळतो. भारतात याच्या दोन जाती आढळतात. एक हिमालयीन मार्मोट (मार्मोटा बोबॅक) व दुसरी लांब शेपटीचा मार्मोट (मा. कॉडेटा) या त्या जाती होत. भारतातल्या दोन्हीही जाती सिक्कीम, गढवाल, काश्मीर, लडाख आणि नेपाळ या डोंगराळ प्रदेशांत आढळतात.

मार्मोटाची डोक्यासकट शरीराची लांबी ३०–६० सेंमी., शेपटी १० ते २५ सेंमी. लांब व वजन ३ ते ७·५ किग्रॅ. असते. पुढच्या पायाचे मधले बोट लांब असते. कान आखूड असतात. हा कलिंदरासारखा दिसतो. हा मागच्या पायांवर उकिडता बसू शकतो. सर्व शरीरावर केस असतात. केसांची लांबी, जाडी व रंग प्रत्येक जातीत वेगवेगळे असतात. शरीराची वरची बाजू तपकिरी पिवळी, गडद नारिंगी किंवा लालसर तपकिरी रंगाची असते तर खालची बाजू फिकट किंवा गडद तरकिरी, पिवळट राखाडी किंवा लालसर नारिंगी रंगाची असते. केस लांब, मऊ व दाट असतात. काहींचे केस खरखरीत असतात. केसांची जाडी ही हवामानातील फरकावर अवलंबून असते. वसंत ऋतूच्या पूर्वार्धात मार्मोट कात टाकतो. ऑलिंपिक मार्मोट (मा. ऑलिंपस) ऋतूबदलाबरोबर केसांचा रंग बदलतो.

मार्मोट बिळे करून राहतात. दिवसभर अन्न शोधण्यासाठी भटकल्यावर रात्री हा बिळात विश्रांती घेतो. हा पूर्णपणे शाकाहारी असून याचा निर्वाह कंद, मुळे, गवत व बियांवर होतो. याच्या बिळाला अनेक दारे असतात. बिळाच्या एका दालनात एका वेळी दहा ते चौदा मार्मोट दाटीवाटीने झोपतात. काही जाती समूह करून राहतात पण सर्वसामान्यतः हा एकटाच वावरतो. जमिनीवर वावरणारा असला, तरी क्वचीत हा झाडावर देखील चढतो. सप्टेंबर ते मार्च अखेरीपर्यंत हा शीतसुप्तीत (हिवाळ्यातील गुंगीमध्ये) जातो.

 विणीचा काळ एप्रिलच्या सुरुवातीस (शीतसुप्तीतून उठल्यानंतर लगेचच) असतो. गर्भावधी ३५ ते ४२ दिवसांचा असतो. एका वेळी दोन ते चार पिल्ले होतात. एका महिन्यानंतर पिल्लांचे डोळे उघडतात. त्यानंतर पिल्ले स्वतःचे अन्न स्वतंत्रपणे मिळवू शकतात. दोन वर्षांत पिल्लांची पूर्ण वाढ होते व ती वयात येतात. मार्मोट सरासरी १३–१५ वर्षे जगतो.

मार्मोट कुरणे व शेतांमध्ये बिळे करतो. याची बिळे खूप मोठी असतात. काही वेळा यामुळे पिकाचे नुकसान होते. याशिवाय हे कोवळी पिके पण कुरतडतात. यांचे मांस रूचकर असते व मांसासाठी याची शिकार होते. याची गळून पडलेली कातडी जाड असते. याचे चामडे चाबकाची वादी व बुटाच्या नाड्या करण्यासाठी वापरतात. उत्तर अमेरिकेतील व आशियातील काही जातींची फरसाठी शिकार करतात. लहान असताना त्यांना माणसाळवता येते.

हिमालयीन मार्मोट हा ४,००० मी. ते ५,५०० मी. उंचीवर राहू शकतो. लांब शेपटीचा मार्मोट या मानाने कमी उंचीवर म्हणजे २,४०० ते ४,३०० मी. वर आढळतो.

जोशी, लीना