गयाळ : स्तनिवर्गाच्या समखुरी (ज्यांच्या बोटांची किंवा खुरांची संख्या सम असते अशा प्राण्यांच्या) गणातील गो-कुलातला प्राणी. याचे शास्त्रीय नाव बॉस फ्राँटॅलिस असे आहे. हा भारतात (आसाममध्ये) आणि आग्‍नेय आशियात राहणारा आहे. पुष्कळ प्राणिशास्त्रज्ञांच्या मताने गयाळ हा माणसाळलेला गविया (गवा) होय. पण या दोन प्राण्यांत काही शाश्वत व स्पष्ट फरक आढळतात. आणखी एक मत असे आहे की, गयाळ हा रानटी गविया आणि माणसाळलेली गाय यांच्या संकरापासून उत्पन्न झालेला आहे.

याचे शरीर मजबूत आणि वजनदार असते पुढचा भाग भरदार असतो व मागचा निमुळता होत जातो. नराचे डोके आणि धड मिळून लांबी सु. २·८ मी. शेपटाची लांबी ८० सेंमी. खांद्यापाशी उंची १·५-१·६ मादी नरापेक्षा थोडी लहान असते. रंग काळसर तपकिरी गुडघ्यांच्या खाली पायांचा रंग पांढरा किंवा पिवळा असतो. शिंगे आखूड, फाकलेली आणि भरभक्कम असतात. गळ्याखाली मोठी पोळी असते. वशिंड नसते. घ्राणेंद्रिय अतिशय तीक्ष्ण असते. यांच्या अंगाला एक प्रकारचा उग्र दर्प येतो.

गयाळ

गयाळ कळप करून राहतात. हे शाकाहारी आणि रवंथ करणारे आहेत. दिवसा गवत, झाडपाला, रानटी फळे वगैरे खात ते जंगलात भटकत असतात पण संध्याकाळ होताच न चुकता आपल्या मालकाच्या घरी परत येतात. आसाम आणि उत्तर ब्रह्मदेशात गयाळ त्यांच्या मांसाकरिताच पाळतात.

एक नर अनेक माद्यांवर हुकमत गाजवितो. माद्यांचा ताबा मिळविण्यासाठी नरांमध्ये निकराच्या झुंजी लागतात.

मादीला २७०–२८० दिवसांच्या गर्भावधीनंतर दर खेपेस एकच पिल्‍लू होते. वाघ आणि माणूस यांखेरीज गयाळाला दुसरे शत्रू नाहीत.

दातार, म. चिं.