पात : ताऱ्यांच्या सापेक्ष सूर्याच्या स्थानाचा विचार केला, तर तो दररोज सु. १° पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत असतो. सु. ३६५ १/४ दिवसांत नक्षत्रसापेक्ष तो एक फेरी पुरी करतो. हे दृश्य भ्रमण पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या कक्षीय भ्रमणामुळे दिसते. या भ्रमणमार्गास क्रांतिवृत्त म्हणतात. चंद्र व बुधादि ग्रह यांच्या भ्रमणकक्षा क्रांतिवृत्ताच्या पातळीत नसून त्याच्याशी भिन्नभिन्न कोन करतात. त्यामुळे प्रत्येक ग्रहाची कक्षा क्रांतिवृत्ताच्या पातळीला दोन बिंदूंत छेदते, या बिंदूंना पात किंवा पातबिंदू असे म्हणतात. या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला पातरेषा म्हणतात. ही पातरेषा म्हणजे ग्रहकक्षेची पातळी व क्रांतिवृत्ताची पातळी यांची छेदनरेषाच होय. ही रेषा सूर्यामधून जाते. पातरेषेमुळे ग्रहकक्षेचे दोन भाग पडतात. एक क्रांतिवृत्ताच्या दक्षिणेस व दुसरा उत्तेरस असतो. क्रांतिवृत्त ओलांडताना ग्रह या बिंदूतून जातो. क्रांतिवृत्ताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना, ग्रहाला ज्या पातातून जावे लागते तो आरोही पात (अधिपात) व उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना जो पात लागतो तो अवपात होय. चंद्रकक्षेच्या अशा दोन पातांना अनुक्रमे राहू व केतू असे म्हणतात [→राहुकेतु]. ग्रहांचे एकमेकांवर गुरुत्वाकर्षण असते. ते एकमेकांना आपापल्या कक्षांतून बाहेर ओढण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यामुळे पातबिंदूंना किंचित पश्चिमेकडे किंवा पूर्वेकडे गती असते. याचा संकलित परिणाम एका शतकात एक अंशाहून जास्त नसतो. चंद्राच्या बाबतीत मात्र हा परिणाम सूर्याच्या प्रभावी गुरुत्वाकर्षणामुळे मोठा असतो. त्यामुळे राहू व केतू क्रांतिवृत्तावर उलट गतीने १८ वर्षे ११ दिवस एवढ्या अवधीत एक प्रदक्षिणा पूर्ण करतात. विषुववृत्तावरील पृथ्वीच्या फुगीर आकारामुळेही राहुकेतूचे चलन होते. कृत्रिम उपग्रहांच्या पातावर याचा असाच मोठा परिणाम होतो. पृथ्वीचा विषुववृत्तीय फुगीरपणा मोजण्यास या परिणामाचा उपयोग होतो.

आरोही पात : (१) कक्षा, (२) क्रांतिवृत्त, (३) आरोही पात

ग्रहांच्या पातबिंदूंवर सूर्य आणि ग्रह दोन्ही येतात तेव्हा अधिक्रमणे होतात [→ अधिक्रमण]. राहुकेतूपाशीच सूर्यग्रहणे व चंद्रग्रहणे होण्याची शक्यता असते.

नेने, य. रा.