अधिकमास: (अधिमास, मलमास, पुरुषोत्तममास, धोंडा महिना). भारतीय पंचांगात चांद्रमान व सौरमान यांत सांगड घालण्यासाठी योजण्यात येणारा महिना. सूर्याचा राशिप्रवेश म्हणजे सौरसंक्रांत होय. चैत्रादी प्रत्येक चांद्रमासात एकेक सौरसंक्रांत असते. चैत्रात मेषसंक्रांत, वैशाखात वृषभसंक्रांत वगैरे. परंतु चंद्राच्या कमीअधिक गतीमुळे एखादा चांद्र महिना असा येतो की त्यात संक्रांत नसते. म्हणजे संपूर्ण चांद्रमास लागोपाठ येणाऱ्या दोन संक्रांतींच्या दरम्यान येतो. याला ‘अधिकमास’ म्हणतात. उदा., चैत्रात मेषसंक्रांत अमावास्येला झाली व पुढच्या अमावास्येनंतर प्रतिपदेला वृषमसंक्रांत आली, तर हा पुढे येणारा महिना निजवैशाख (खरा वैशाख) व संक्रांत नसलेला मधला अधिक वैशाख होय. अधिक महिन्याला पुढे येणाऱ्या महिन्याचे नाव असते. असा अधिक महिना सु. तीन वर्षांनी येतो. कमीत कमी २७ तर जास्तीत जास्त ३५ महिन्यांनी हा येतो.

पृथ्वीची सूर्यप्रदक्षिणा ३६५·२५ दिवसांत होते, तर चंद्राच्या पृथ्वीभोवती १२ प्रदक्षिणा ३५४ दिवसांत होतात· म्हणजे सौर महिना ३० दि. २६ घ. १८प. (३०·४३०८ दिवसांचा) तर चांद्र महिना २९ दि. ३१ घ. ५० प. (२९·५३०५९ दिवसांचा) असतो. या दोन्ही गणना मध्यममानाने आहेत. वरील सव्वा अकरा दिवसांचा पडणारा वार्षिक फरक काढून टाकून, चांद्रमान व सौरमान यांची सांगड घालण्यासाठी अधिकमासाची योजना असते. चैत्र ते कार्तिक या आठ महिन्यांपैकीच कोणता तरी एक महिना अधिक असतो. मार्गशीर्ष, पौष व माघ हे कधीच अधिक नसतात, क्वचित फाल्गुन अधिक असतो. चैत्र, ज्येष्ठ व श्रावण हे १२ वर्षांनी, तर आषाढ १८, भाद्रपद २४, आश्विन १४१ व कार्तिक ७०० वर्षांनी अधिक येतात. ⇨ क्षयमासाच्या आगेमागे अधिक महिना असतो. ‘अंहस्पती’ व ‘मलिम्लुच’ अशीही अधिक महिन्याला नावे आहेत.

फडके, ना. ह.