वृषभ: राशिचक्रातील दुसरी  रास. कृत्तिका[→ कृत्तिकापुंज] नक्षत्राचे शेवटचे तीन चरण, रोहिणी [→ रोहिणी-१] नक्षत्र व मृग नक्षत्राचे [→ मृगशीर्ष] पहिले दोन चरण या सव्वादोन नक्षत्रांची मिळून ही रास होते. या तारकासमूहाची स्थूल प्रतिमा बैलाच्या आकृतीसारखी असल्याने याला त्या अर्थाचे वृषभ हे नाव पडले. पाश्चात्य कल्पनेप्रमाणे याला तारकासमूहाचे विषुवांश ४ ता. २० मि. व क्रांती + १६0[→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] आसपास असून त्याची व्याप्ती ३ ते ६ ता. एवढी आहे. क्रांतिवृत्त या तारकासमूहातून गेले आहे व आकाशगंगा याच्या पूर्वेकडून गेलेली आहे. यामध्ये पुढील काही महत्त्वाचे खस्थ पदार्थ आहेत. कृत्तिका व रोहिणी तारकागुच्छ यात आहेत. आल्डेबरन हा रोहिणीचा योगतारा नारिंगी रंगाचा व पहिल्या प्रतीचा [→ प्रत] असून त्याचा व्यास सूर्याच्या व्यासाच्या ३८ पट व तेजस्विता ४०० पट आहे. तो पृथ्वीपासून सु. ६५ प्रकाशवर्षे अंतरावर आहे. सारथी (ऑरिगा) व वृषभ या तारकासमूहांच्या सीमेवरच अग्नी (अलनाथ किंवा बीटा टौरी), लँब्डा टौरी हे पिधानकारी तारकायुग्म, झीटा टौरी हा तारकायुग्म व त्याच्या शेजारची क्रॅब अभ्रिका (M1) हा १०५४ साली दिसलेला नवताऱ्याचा [ज्याची दीप्ती अचानकपणे लक्षावधी पट वाढते असा तारा → नवतारा व अतिदीप्त नवतारा] अवशिष्टरुप व रेडिओ उद्‌गम असलेला तेजोमेघ हे या तारकासमूहातील उल्लेखनीय खस्थ पदार्थ आहेत. क्रॅब (खेकड्याच्या आकाराचा) अभ्रिकेचा व्यास ३ प्रकाशवर्षे असून ती पृथ्वीपासून सु. ३,५०० प्रकाशवर्षे दूर आहे [→ अभ्रिका]. वृषभ तारकासमूह नोव्हेंबरच्या शेवटी मध्यरात्री मध्यमंडलावर येतो. निरयन वृषभ राशीत [→ निरयन-सायन] सूर्य १४ मे ते १४ जूनपर्यंत असतो. इ. स. पू. ४५५० ते १८५० दरम्यान वसंत संपात वृषभ राशीत होतो.

कृत्तिका आणि रोहिणी या नक्षत्रांच्या दरम्यानच्या एका बिंदूतून २६ ऑक्टोबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत दीर्घकाळ टिकणारी उल्कावृष्टी होते तिला टॉरीड उल्कावृष्टी म्हणतात. [→ उल्का व अशनि].    

फलज्योतिषानुसार शुक्र हा वृषभ राशीचा स्वामी असून हिच्यात चंद्र उच्चीचा व केतू नीचेचा असतो. ही रास असलेली व्यक्ती एकनिष्ठ, कुशाग्र बुद्धीची, शिस्तप्रिय, प्रेमळ व शांत, परंतु हट्टी व दीर्घसूत्री स्वभावाची असते. ही रास बहुप्रसव, स्त्रीत्वदर्शक, पृथ्वी तत्त्वाची व लिंबवर्णी मानतात व हिचा अंमल कंठावर असतो. पहा : राशिचक्र.                                       

ठाकूर, अ. ना.