धनु : (सॅजिटॅरियस). राशिचक्रातील नववी व सर्वांत दक्षिणेकडील रास. भारतीय पद्धतीप्रमाणे मूळ, पूर्वाषाढा व उत्तराषाढाचा पहिला चरण (चतुर्थांश) ही सव्वादोन नक्षत्रे या राशीत येतात, परंतु पाश्चात्त्य क्षेत्रात्मक पद्धतीत मूळ हे वृश्चिकेमध्ये समाविष्ट आहे. वरचा भाग धनुर्धारी मानवाचा व खालील भाग (धड) घोड्याचा असा अश्वमानव प्राणी या राशीची आकृती असून गुरू हा तिचा स्वामी मानतात. ही रास पूर्वेची स्वामिनी असून ती अग्निराशी व क्षत्रियवर्णी समजतात. ही राशी वृश्चिक व मकर राशींच्या दरम्यान विस्तृत [होरा १७ ता. ४० मि. ते २० ता. २० मि. आणि क्रांती –१२° ते –४५° → ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] पसरलेली आहे. ही रास जुलै व ऑगष्टमध्ये रात्री दक्षिणेकडे चांगली दिसते . हिच्यात सहाव्या प्रतीपर्यंतचे [→  प्रत] ४७ तारे असून त्यांपैकी डेल्टा (प्रत २·८, पूर्वाषाढातील तारा), एप्सायलॉन (प्रत १·९), लॅम्डा (प्रत २·९), झीटा (प्रत ३, उत्तराषाढातील तारा), आल्फा व बीटा (प्रत ३)व म्यू (रुप विकारी म्हणजे ज्याच्या दीप्तीत लक्षात येण्याइतका पुनरावृत फेरबदल होत असतो असा तारा) हे महत्त्वाचे तारे आहेत. आकाशगंगेचा सर्वांत तेजस्वी भाग या राशीत असून आकाशगंगेची एक शाखा या राशीतून गेलेली दिसते. आकाशगंगेचा मध्य या राशीच्या पलीकडे (सूर्यापासून सु. ३०,००० प्रकाशवर्षे अंतरावर होरा १७ ता. व क्रांती –३०° या बिंदूच्या दिशेत) आहे. हिच्या वायव्य भागात ताऱ्यांची अतिशय दाटी झालेली आहे. त्यांमध्ये अनेक तारकागुच्छ (एम– २२,एम–२८, एम–७५ हे गोलाकार, तसेच एम–२१, एम–२४, एम–२५ हे विरल) अभ्रिका [कोलसॅक कृष्णाभ्रिका, ट्रिफीड (एम–२०), लॅगून (एम–८), हार्स शू (एम–१७), एम–८ अभ्रिका व काही बिंबाभ्रिका →अभ्रिका] तीन नवतारे (ज्यांची तेजस्विता अचानकपणे हजारो वा लक्षावधी पट वाढते  असे तार १८१८,१९१० व १९३६ सालचे सॅजिटॅरी नवतारे) दोन सेफीड रूपविकारी तारे [→तारा] सॅजिटॅरियस –ए हा रेडिओ उद्‌गम इ.महत्त्वाचे स्वस्थ पदार्थ आहेत. दक्षिण संस्तंभ (दक्षिणायनान्त बिंदू) या राशीत असून २२ डिसेंबर रोजी सूर्य येथे येऊन उत्तरायणास सुरुवात होते. सूर्य २२ नोव्हेंबरला या राशीत प्रवेश करतो. कार्ल जान्स्की यांनी या राशीच्या दिशेकडून रेडीओ प्रारण (तरंगरूपी ऊर्जा) येत असल्याचे १९३१-३२ साली शोधून काढले.

ग्रीक पुराणकथेनुसार चिरॉन हा सॅटर्नचा (शनीचा) मुलगा कुशल धनुर्धर होता. हर्क्युलसच्या विषारी बाणाने त्याला मृत्यू आल्यावर ज्युपिटरने (गुरूने) त्याला आकाशात तारापद दिले. तो आकाशात वृश्चिकावर बाण रोखून आहे. चिरॉन म्हणजे बैल मारणारा असेही समजतात, कारण धनू रास उगवते तेव्हा वृषभ (बैल) राशीतील तारे मावळतात.

पहा : राशिचक्र.

ठाकूर, अ. ना.