पोलक्स : (पॉलक्स बीटा जेमिनोरम प्लव). पाश्चात्त्य पद्धतीतील जेमिनी (मिथुन) तारकासमूहातील हा सर्वांत तेजस्वी तारा आहे. विषुवांश ७ ता. ४२ मि. क्रांती +२८° ९´ अंतर ३५ प्रकाशवर्षे प्रत १·२ वर्णपटीय प्रकार Ga III रंग नारिंगी-पिवळा [→ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति तारा प्रत]. ग्रीक पुराणातील ⇨ कॅस्टर व पोलक्स ही जुळ्या भावांची नावे आल्फा व बीटा जेमिनोरम यांना दिलेली आहेत. तेजस्वितेच्या दृष्टीने पोलक्स या ताऱ्याचे नाव आल्फा असावयास पाहिजे परंतु आल्फा व बीटा ही नावे निश्चित झाल्यानंतर याची दीप्ती अचानक कॅस्टरपेक्षाही वाढली. मात्र बीटा हे नाव तसेच राहिले. भासमान दीप्तीच्या दृष्टीने पोलक्स आकाशातील १७ व्या क्रमांकाचा तारा असून हा सूर्यापासून सर्वांत जवळचा महातारा आहे. याची अंगभूत दीप्ती सूर्याच्या ३२ पट आहे. हा युग्मतारा असून याचा सहचर १४ व्या प्रतीचा आहे. याचे भारतीय नाव ‘प्लव’ असून भारतीय नक्षत्रातील पुर्नवसू नक्षत्राच्या चार ताऱ्यांपैकी हा ईशान्येचा तारा आहे. या एकट्या ताऱ्यालासुद्धा ‘पुनर्वसू’ म्हणतात. [→ पुनर्वसु ].

फडके, ना. ह.