ध्रुव, केशवलाल हर्षदराय : (१७ ऑक्टोबर १८५९–१३ मार्च १९३८). गुजराती भाषेचे पंडित, प्राचीन साहित्याचे संशोधक आणि अनुवादक. पंडित युगातील साक्षररत्नापैंकी एक. ‘वनमाळी’ या टोपणनावानेही ते लिहीत. जन्म दहेगाम येथे. शिक्षण बी.ए.पर्यंत. त्यांनी केलेले संस्कृत ग्रंथांचे गुजराती अनुवाद उत्तम दर्जाचे आहेत. अहमदाबादच्या गुजरात महाविद्यालयातील एक नाणावलेले प्राध्यापक म्हणून त्यांची ख्याती होती. भास, कालिदास, हर्ष, विशाखदत्त, जयदेव आणि अमरू यांच्या कृतींची त्यांनी गुजरातीत उत्कृष्ट भाषांतरे केली. त्यांनी केलेला गीतगोविंदाचा अनुवाद त्यातील प्रासादिकतेमुळे विशेष सरस उतरला आहे.

केशवलाल हर्षदराय ध्रुव

संस्कृतशिवाय जुनी गुजराती, प्राकृत आणि अपभ्रंश या भाषांचेही विद्वान, छंदोरचनेचे तज्ज्ञ व संशोधक म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांचा पद्यरचनानी ऐतिहासिक आलोचना (१९३२) हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. त्यांच्यापूर्वी हे सर्व कार्य शास्त्रीय दृष्टीने क्वचितच झाले होते. ह्या ग्रंथात त्यांनी ऋग्वेदकालापासून अर्वाचीन कालापर्यंतच्या छंदोरचनेचा जो आलेख काढलेला आहे, तो प्राचीन कृतींंचा रचनाकाल निश्चित करण्याचा एक मानदंड समजला जातो.

त्यांच्या संस्कृत अनुवादांच्या प्रस्तावना प्रगाढ विद्वत्तेची साक्ष पटवितात. बाणाच्या कादंबरीच्या भालणकृत अनुवादाची त्यांची सटीक संशोधित आवृत्ती या दृष्टीने आदर्श मानली जाते.

त्यांची उल्लेखनीय ग्रंथरचना पुढीलप्रमाणे : भाषांतरित : मेळनी मुद्रिका अथवा मुद्राराक्षस (१८८९), अमरुशतक (१८९२), गीतगोविंद (१८९५), प्रधाननी प्रतिज्ञा (१९१५), साचुँ स्वप्न (१९१६), मध्यम नाटक (१९२१) इत्यादी. वैचारिक : पद्यरचनानी ऐतिहासिक आलोचना (१९३२), साहित्य अने विवेचन (२ खंड, १९४०-४१) संपादित : छाया घटकपर्र (१९०२), भालणणी कादंबरी (१९१६), अनुभवबिंदू (१९२३), पंदरमा शतकनां प्राचीन गुर्जर काव्यो (१९२७), रत्नदास (१९२७) कोश : गुजराती भाषानो कोश (अपूर्ण, फक्त ‘प’ वर्ण, १९४४).

ब्रोकर, गुलाबदास (गु.) कालेलकर, ना. गो. (म.)