ठाकोर, बळवंतराय कल्याणराय : (१८६९—१९५२). आधुनिक काळातील युगप्रवर्तक गुजराती कवी, निबंधकार व समीक्षक. ‘सेहेनी’ ह्या टोपणनावाने त्यांनी आपले काव्यलेखन केले. जन्म भडोच येथे. शिक्षण मुंबई व पुणे येथे. ते इतिहासाचे आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते तथापि गुजराती साहित्यांकडे त्यांचा सुरुवातीपासूनच विशेष ओढा होता. प्रख्यात कवी ⇨कांत  हे त्यांचे परममित्र. कान्तांच्या स्मरणार्थ त्यांनी कान्तमाला (१९२४) हा ग्रंथ संपादित केला आहे. त्यांनी गुजराती कवितेत क्रांतीकारक बदल करून नवकाव्याचे प्रवर्तन केले. वैविध्यपूर्ण विशाल जीवनानुभूतीच्या यथार्थ अभिव्यक्तीसाठी पारंपारिक छंदाची कृत्रिमता आणि बंधने त्यांना प्रथम जाणवली. म्हणूनच काव्यरचनेत श्लोकत्वाचा, यतिबंधनाचा व चरणान्त रचनेचा त्याग करून त्यांनी अर्थसंवादी, मुक्त अथवा प्रवाही वृत्तांचा आपल्या काव्यात प्रयोग केला. ह्यासाठी त्यांना पृथ्वीवृत्त अतीशय उपकारक वाटले व त्या वृत्ताचा त्यांनी मुक्तपणे वापर करून त्याचा आग्रहही धरला. प्रा. ठाकोर हे आपल्या रचनेत सतत नवनवे प्रयोग प्रयोगशील कवी होते. गुजराती साहित्यात त्यांनीच सर्वप्रथम इंग्रजीतील सुनीतांच्या धर्तीवर काव्यरचना केली. गुजरातीत नवकाव्याची महान परंपरा निर्माण करणारे कवी म्हणून त्यांना मानाचे स्थान आहे. भणकार (१९१७), म्हारां सॉनेट (१९३५) हे त्याचे काव्यसंग्रह आहेत. निसर्ग, प्रणय व चिंतन हे त्यांच्या काव्याचे प्रमुख विषय होत. ‘प्रेमनी उषा’, ‘प्रेमनो मध्यान्ह’, ‘अदृष्टिदर्शन’, ‘मोगरो ’, ‘जुनूं पियेरघर’, ‘वर्षानी एक सुंदर सांझ’ इ. त्यांची उत्कृष्ट काव्ये होत. प्रणयकाव्यांप्रमाणेच विशुद्ध मित्रप्रेमावरही त्यांनी भावस्पर्शी कविता लिहिली आहे. त्यांच्या चिंतनपर काव्यांत ‘आरोहण’ हे काव्य सर्वोत्कृष्ट असून गुजराती काव्याचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून ते गौरविले जाते. ‘गोपिहृदय ’ हा त्यांनी द हार्ट ऑफ गोपीचा केलेला पद्यानुवाद आहे. अतिरेकी भावनांमुळे व शाब्दिकतेमुळे काव्यात येणाऱ्या अवास्तव मृदुतेला प्रा. ठाकोरांनी विरोध करून विचारघन व अर्थघन कवितेचा पुरस्कार केला. शब्दलालित्य, माधुर्य अथवा आलंकारीकतेने काव्याला बाह्यतः नटविण्यापेक्षा त्याच्या आंतरिक सौंदर्याचे ते उपासक असल्यामुळे त्यांची काव्यशैली बाह्यतः अतिशय खडबडीत परंतु अंतरंगात अतिशय लयबद्ध व सौंदर्यपूर्ण आहे. काव्य गेयच असले पाहिजे, ह्या कल्पनेला भ्रामक ठरवून गेयताविरहित, यतीबंधादींनी मुक्त अशा लयबद्ध अभिव्यक्तीला वाव देणाऱ्या पद्यरचनेस त्यांनी काव्याचे वाहन केले. निर्यमक कवितेचाही (ब्लॅक व्हर्स) त्यांनी प्रयोग केला. इतर गुजराती कवींवरही त्यांचा खूपच प्रभाव पडला व त्यांनी प्रा. ठाकोरांपासून प्रेरणा घेऊन आपली नवी कविता लिहिली.

बळवंतराय ठाकोर  

काव्याव्यतिरिक्त प्रा. ठाकोरांनी नाटक, कथा, समीक्षा, निबंध, अनुवाद ह्या क्षेत्रांतही महत्त्वपूर्ण लेखन केले. उगती जुवानी (१९२३) व लग्नमां ब्रह्मचार्य (१९२८) हि त्यांची स्वतंत्र नाटके असून सोविएट नवजुवानी (१९३५) हे त्यांचे एका रशियन नाटकाचे भाषांतर आहे. अभिज्ञान शाकुंतल (१९०५) आणि मालविकाग्निमित्र (१९३३) हि त्यांची संस्कृत नाटकाची भाषांतर होत. दर्शनियुं (१९२४) हा त्यांच्या स्वतंत्र आणि अनुवादित कथांचा संग्रह होय. आपणी कविता-समृद्धि (१९३१), हा त्यांनी संपादित केलेल्या कवितांचा उत्कृष्ट संग्रह होय. कविताशिक्षण (१९२४), पंचोतेरमे  (१९२६), लिरिक (१९२८), नवीन कविता विषे व्याख्यानो (१९४३), विविध व्याख्यानो ( ३ भाग–१९४५–४८) हे त्यांचे दर्जेदार समीक्षाग्रंथ आहेत. पहिल्या चार ग्रंथांत त्यांनी नवकाव्याबाबत सविस्तर विवेचन केलेले असून विविध व्याख्यानोमध्ये प्रेमानंद, नर्मद, नवलराम, मणिलाल, गोवर्धनराम, इ. लेखकांच्या साहित्याचे मूल्यमापन आहे. सखोल अभ्यास आणि चिंतन यांमुळे त्यांचे समीक्षालेखन विशेष मोलाचे ठरले आहे. वैचारिकतेमुळे त्यांचे समीक्षालेखन दुर्बोध आणि क्लिष्ट वाटले, तरी त्या विचारांचे आकलन झाल्यावर, त्यांतील ओज व मौलिकता हे त्यांच्या लेखनाचे गुणविशेष प्रकर्षाने नजरेत भरतात. ते इतिहास-अर्थशास्त्राचे प्राध्यापक असल्यामुळे त्यांच्या अध्ययन-अध्यापनाचे सार त्यांच्या इतिहास दिग्दर्शन (१९२८) व युनायटेड स्टेट्स (१९२८) ह्या महत्त्वपूर्ण ग्रंथांत आढळले.

पेंडसे, सु. न.