चुनीलालमडिया, चुनीलाल कालिदास : (१२ ऑगस्ट १९२२ – २१ डिसेंबर १९६८). प्रसिद्ध गुजराती एकांकिकाकार, नाटककार, कथाकार व कादंबरीकार. त्यांचा जन्म धोराजी (जि. सौराष्ट्र) येथे झाला. मुंबई विद्यापीठातून बी. कॉम्. झाल्यावर त्यांनी अनेक वर्षे पत्रकार म्हणून काम केले. आयुष्याच्या अखेरीअखेरीस त्यांनी स्वतःचे रुचि हे मासिकपत्र सुरू करून चालविले. पी. ई. एन्. ह्या संस्थेचेही ते काही काळ सदस्य होते. अहमदाबाद ते मुंबई ह्या रेल्वेप्रवासात त्यांचे अहमदाबादजवळ आकस्मिक निधन झाले.

ते बहुप्रसव लेखक होते. १९४५ पासून ते आयुष्याच्या अखेरीपर्यंत त्यांनी विविध प्रकारांत विपुल लेखन केले. रंगदा (१९५१), विषविमोचन (१९५५), रक्ततिलक (१९५६) हे त्यांचे उल्लेखनीय एकांकिकासंग्रह होत. नाट्यात्मक प्रसंग, चमकदार संवाद, उत्कृष्ट संघर्ष इ. नाट्यगुणांनी युक्त अशा त्यांच्या एकांकिका रंगभूमीच्या दृष्टीने प्रयोगशीलतेचा विशेष गुण दर्शवितात. हूँ ने मारी वहू (१९४९), शून्यशेष (१९५७), रमलो रॉबिनहूड (१९६२) इ. त्यांची दर्जेदार नाटके होत.

पावकज्वाला (१९४५), व्याजनो पारस (१९४६), इंधण ओछां पड्यांल (१९५१), लिलुडी धरती (१९५७) ह्या त्यांच्या कादंबऱ्या त्यांतील ओजस्वी भाषा, नाट्यात्मक वर्णनशैली व यथार्थ भावनिरूपण यांमुळे दर्जेदार झाल्या आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांतून सौराष्ट्राच्या जनजीवनाचे व संस्कृतीचे उत्कृष्ट दर्शन घडते. लिलुडी धरतीत त्यांनी समाजालाच कादंबरीचे नायकत्व बहाल केले आहे. सधरा जेसंगनो साळो (१९६२) आणि ग्रहाष्टक वत्ता एक (१९६५) ह्या त्यांच्या हास्यरसप्रधान कादंबऱ्या होत. घूघवतां पूर (१९४५), रूप – अरूप (१९५३), अंतस्त्रोता (१९५६) इ. त्यांच्या कथासंग्रहांतील कथांतून आशय व अभिव्यक्ती यांवरील त्यांचे प्रभुत्व आणि कौशल्य प्रत्ययास येते. सौराष्ट्रातील लोकजीवनाचे चित्रण हे त्यांच्या कथा – कादंबरीविश्वाचे एक बलस्थान म्हणावे लागेल.

कविता, साहित्यसमीक्षा, चरित्र, प्रवासवर्णन, अनुवाद, वृत्तपत्रीय स्तंभलेखन इ. प्रकारांतही त्यांनी लेखन केले आहे.

सौराष्ट्रातील जनजीवनाचे प्रभावी चित्रण आणि त्यांच्या बोल भाषेचा उत्कृष्ट वापर मडियांनी आपल्या लेखनात केलेला आहे. ⇨ झवेरचंद मेघाणी यांनी मुख्यत्वे सौराष्ट्रातील मध्यम वर्गियांचे जीवन चित्रित केले आहे, तर मडियांनी मुख्यत्वे सौराष्ट्रातील शेतकरीवर्गाचे तसेच मध्यम वर्गाच्या खालील स्तराचे जीवन चित्रित केले आहे. मडियांची नाटके , कादंबऱ्या व कथा यांतून स्थल, काल व पात्रे यांची खूपच विविधता आढळून येते. त्यांचे भाषेवरील असामान्य प्रभुत्वही नजरेत भरते. आपल्या पात्रांची सांस्कृतिक पातळी ते भाषेच्या प्रभावी वापराने चटकन चित्रित करतात तथापि कधीकधी ते शब्दबंबाळ होतात व पुनरूक्ती करतात. श्रेष्ठ कलावंताच्या संयमाचा अभाव त्यांच्या लेखनात जाणवतो.

पेंडसे, सु. न.