‘कलापी’- सूरसिंह तख्तसिंह गोहील : (२६ फेब्रुवारी १८७४- १० जून १९००). प्रसिद्ध गुजराती कवी. सौराष्ट्रातील लाठी संस्थानच्या तो ठाकोर होता. राजकोटच्या राजकुमार कॉलेजात त्याचे शिक्षण झाले. वर्ड्‌स्वर्थ, शेली, कीट्‌स ह्या इंग्रज कवींचा तसेच बालाशंकर, मणिलाल, ‘कान्त’ इ. गुजराती कवींचा त्याच्यावर प्रभाव पडला. त्याची पत्नी रमा हिच्या शोभना नावाच्या दासीशी वयाच्या चोविसाव्या वर्षी त्याने विवाह केला. तो अल्पवयातच म्हणजे सव्विसाव्या वर्षी मरण पावला.

‘तरुणांचा कवी’ म्हणून कलापी अत्यंत लोकप्रिय आहे. कलापीनो केकारव (१९०३) हा त्याचा एकमेव प्रसिद्ध काव्यसंग्रह. कलापीची कविता प्रामुख्याने भावगीतात्मक व प्रणयप्रधान असून तीत आत्यंतिक आत्मपरता, चिंतनात्मकता व सहजसुंदर भावनाविष्कार हे गुण आढळतात. त्याने गुजरातीत अनेक गझलही लिहिले असून त्यांतील लौकिक व अलौकिक प्रेमाचा आविष्कार हृद्य आहे. दर्जेदार निसर्गपर कविताही त्याने लिहीली. त्याच्या खंडकाव्यांत ‘हृद्य त्रिपुटी’, ‘बिल्वमंगल’ व ‘कन्या अने कौंच’ ही उल्लेखनीय होत.

हमीरजी गोहेल (१९१३) नावाचे त्याचे महाकाव्य अपूर्णच राहिले. त्याच्या गद्यलेखनात काश्मीरानो प्रवास (१९१२) हे प्रवासवर्णन व कलापीना पत्रो (१९३३) हा पत्रसग्रह यांचा अंत्रभाव होतो. माला अने मुद्रिका (१९१२) व नारीहृदय (१९३३, अपूर्ण) ह्या त्याने इंग्रजी कृतींवरुन भाषांतरित केलेल्या कादंबर्‍या. त्याचे गद्यलेखनही काव्यात्म आहे. तथापि कलापीनो केकारव मुळेच त्याला गुजराती साहित्यात विशेष स्थान आहे. रा. ग. गडकरी (गोंविदाग्रज) यांचा कलापी हा अत्यंत आवडता कवी होता.

पेंडसे, सु. न.