सुंदरम्, त्रिभुवनदास पुरुषोत्तमदास लुहार : (२२ मार्च १९०८– १३ जानेवारी १९९१). प्रख्यात गांधीवादी गुजराती कवी. ते प्रामुख्याने कवी म्हणून प्रसिद्घ असले, तरी त्यांनी नाटक, लघुकथा, समीक्षा ह्या वाङ्‌मयप्रकारांत गुजराती साहित्याला दिलेले योगदानही महत्त्वाचे आहे. जन्म मातर (जि. भडोच, गुजरात) सुंदरम्,येथे. भडोच येथील राष्ट्रीय पाठशाळेत त्यांनी प्रारंभिक शिक्षण घेतले. पुढे गुजरात विद्यापीठातून त्यांनी भाषाविशारद ही पदवी घेतली. म. गांधींच्या नेतृत्वाखालील बार्डोली सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला व स्वातंत्र्यलढ्यात ते सहभागी झाले, त्याबद्दल कारावासही भोगला. त्यांनी १९२६ मध्ये ‘एकांश दे’ ही आपली पहिली कविता ‘मारिच’ या टोपणनावाने प्रसिद्घ केली. त्यानंतर अनेक कविता ‘विश्वकर्मा’ या टोपणनावाने प्रसिद्घ केल्या. १९२८ मध्ये त्यांनी ‘बार्डोलीने’ ही कविता लिहून साबरमती नियतकालिकात ‘ सुंदरम्’ या टोपणनावाने प्रसिद्घ केली व तेव्हापासून ते गुजराती साहित्यिक वर्तुळात सुंदरम् या नावाने ओळखले जाऊ लागले. या सुरुवातीच्या काळात त्यांनी साबरमती, पंचतंत्र या नियतकालिकांचे संपादनही केले. उमाशंकर जोशी, विश्वनाथ एम्. भट्ट, रामनारायण पाठक, रसिकलाल सी. पारिख यांच्यासारख्या समकालीन साहित्यिक, विद्वज्जनांच्या संगतीत त्यांची वाङ्‌मयीन जडणघडण झाली. कोया भगतनी कडवी वाणी हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह १९३३ मध्ये प्रकाशित झाला. त्यात त्यांनी सामाजिक विषमता, धार्मिक दंभ व अंधश्रद्घा, शेतकरी व श्रमजीवी वर्गाच्या कष्टाचे महत्त्व अशा तत्कालीन समाजवास्तवाचे प्रभावी चित्रण केले आहे. त्यात लोकगीतांच्या शैलीचा व रुपककाव्याचा लक्षणीय प्रयोग केला आहे. काव्यमंगला (१९३३) हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह त्या काळातील नव्या काव्यप्रवाहाचा प्रातिनिधिक संग्रह म्हणता येईल. त्याला १९३४ मध्ये रणजितराम सुवर्णपदक मिळाले. वसुधा (१९३९) हा त्यांचा तिसरा काव्यसंग्रह त्यांनी लिहिलेल्या प्रणयपर कवितांचे संकलन आहे. त्यात प्रणयभावना उत्कटतेने व सौंदर्याच्या सर्व अंगोपांगांसह व्यक्त झाली आहे. रंग रंग वडलियन हा त्यांचा बालगीतसंग्रहही ह्याच काळात प्रसिद्घ झाला. ह्या काळात अनेक साहित्यसंस्थांशी त्यांचा संबंध आला. १९४५ मध्ये योगी अरविंदांच्या तत्त्वज्ञानाचा त्यांच्यावर गहिरा प्रभाव पडला व ते पाँडिचेरी येथे राहू लागले. या प्रभावातून त्यांच्या कवितेनेही नवे वळण घेतले. त्यांची आधीची कविता स्वच्छंदतावादी वृत्तिविशेषांनी युक्त होती. नंतरच्या काळात तिने आध्यात्मिक स्वरूप धारण केले. त्यांचा यात्रा (१९५१) हा चौथा काव्यसंग्रह अरविंदांच्या तत्त्वज्ञानाचा सुस्पष्ट प्रभाव दर्शवतो. स्वातंत्र्यसैनिक म्हणून तुरुंगाची बंधने सहन करीत असता षड्‌रिपूंच्या बंधनांत जखडलेल्या मनाला मुक्त केले पाहिजे, ही कवीची भावना या कवितांतून प्रभावीपणे व्यक्त झाली आहे. त्यांतील भावना, कल्पना व चिंतन यांचे एकजीव मिश्रण काव्यानुभूतीचा सर्वोच्च आविष्कार घडवून आणते. कवी जगत्‌सृष्टीचे व विश्वकल्याणाचे मंगलस्तोत्र ह्या कवितांतून गातो. यात्रा ह्या काव्यसंग्रहात कवी सुंदरम् यांच्या काव्यप्रतिभेचा व अनुभूतींचा सर्वोत्कृष्ट आविष्कार पाहावयास मिळतो. १९४८– ५२ या काळातला सर्वश्रेष्ठ गुजराती काव्यसंग्रह म्हणून यात्रा ला नर्मद सुवर्णपदक मिळाले.

सुंदरम् यांनी ‘त्रिशूल’ या टोपणनावाने काही लघुकथा लिहिल्या. हिरकवी अने बीजि वाता (१९३८), पियासी (१९४०), उन्नयन (१९४५ खोलकी अने नागरिका , १९३९, या आधीच्या कथासंग्रहात पाच नव्या कथांची भर घालून काढलेली नवी आवृत्ती ), तारिणी अने पंक्कणा पांथे (१९७८) हे त्यांचे उल्लेखनीय कथासंग्रह होत. वासंती पूर्णिमा (१९७७) हा त्यांच्या एकांकिकांचा संग्रह, तर दक्षिणायन (१९४२) हे दक्षिण भारताचे रसाळ प्रवासवर्णन आहे. चिदंबर (१९६८) हा त्यांच्या आठवणींचा संग्रह, तर समाचारणी हा त्यांच्या जीवनविषयक दृष्टिकोणावर प्रकाश टाकणाऱ्या वैचारिक लेखांचा संग्रह आहे. यांखेरीज सा विद्या (१९७८) आणि श्री अरविंद महायोगी (१९५०) हे चरित्र त्यांचे उल्लेखनीय साहित्य आहे.

सुंदरम् यांचे समीक्षा क्षेत्रातले योगदानही महत्त्वाचे आहे. त्यांच्या अर्वाचीन कविता (१९४६ दुसरी आवृ., १९५३) ह्या समीक्षाग्रंथात १८४५–१९३० या कालखंडातील गुजराती काव्याचा चिकित्सक, टीकात्मक मागोवा घेतला आहे. गुजराती साहित्यसमीक्षेच्या प्रांतातला हा अभिजात ग्रंथ मानला जातो. त्याला १९४६ मध्ये माहिदा पारितोषिक मिळाले.अवलोकना हा त्यांचा दुसरा समीक्षाग्रंथही विद्वन्मान्य टीकाग्रंथ म्हणून प्रशंसनीय ठरला. त्याला १९६८ मध्ये साहित्य अकादेमीचा राष्ट्रीय पुरस्कार लाभला. साहित्यसमीक्षेच्या काही मूलतत्त्वांची सैद्घांतिक चर्चाचिकित्सा करणारा साहित्यचिंतन हा त्यांचा समीक्षाग्रंथ १९७८ मध्ये प्रकाशित झाला. १९६७ मध्ये त्यांनी ‘ठक्कर वासनजी माधवजी’ व्याख्याने दिली. तसेच ‘नानालाल स्मृती व्याख्यानमाला’ही त्यांनी गुंफली.

सुंदरम् यांनी संस्कृत, हिंदी व इंग्रजी भाषांतील काही श्रेष्ठ, अभिजात साहित्यकृतींची गुजरातीमध्ये भाषांतरे केली. उदा., भगवज्जुकियम् (१९४०), मृच्छकटिक (१९४४), कायापालट (१९६१ एर्न्स्ट टोलरच्या ट्रान्सफिगरेशन या मूळ जर्मन नाटकाचे गुजराती भाषांतर ), जनता अने जन (१९६५), ऐसी है जिन्दगी इत्यादी. तसेच योगी अरविंदांचे तत्त्वज्ञानात्मक ग्रंथही त्यांनी गुजरातीत अनुवादित केले.

गांधीवादी युगाचे अग्रगण्य थोर साहित्यिक म्हणून गुजराती साहित्यात सुंदरम् यांना मानाचे स्थान आहे. गुजराती काव्य, लघुकथा व समीक्षा या प्रकारांत मोलाची भर घालून त्यांनी गुजराती साहित्य समृद्घ केले. त्यांच्या साहित्यातील भावोत्कटता, कल्पनाशक्तीचा आवेग, भाषाप्रभुत्व, लयीचे भान, प्रयोगशीलता हे गुण लक्षणीय आहेत. गुजराती साहित्यात त्यांनी काही सुंदर प्रणयकाव्ये, सुनिते, बालगीते यांची भर घातली. त्यांच्या काव्याचा पल्ला फार मोठा असून मुक्तके, खंडकाव्य आदी प्रकारांत त्यांनी गुजराती काव्याला मोलाचे योगदान दिले. काव्याप्रमाणेच त्यांचे गद्यलेखनही फार प्रभावी व सामर्थ्यशाली असून त्यात भावनांची तीव्रता व कल्पकतेची चमक जाणवते. त्यांच्या साहित्यकृती जशा आध्यात्मिकतेने भारलेल्या आहेत, तशाच सामाजिक जाणिवांनी संपन्न आहेत. पुरोगामीत्व, साम्यवाद, गांधीवाद अशा विचारसरणींचा प्रवास त्यांच्या साहित्यकृतींतून होत गेलेला दिसतो व अंतिम टप्प्यावर योगी अरविंदांच्या प्रभावातून आध्यात्मिकतेची व आत्मसाक्षात्काराची वाट त्यांनी आपल्या साहित्यातून चोखाळलेली दिसते. अरविंदांच्या शिकवणुकीचा प्रसार, त्यांच्या साहित्याची गुजराती भाषांतरे, दक्षिणाबालदक्षिणा या मासिकांचे व्यवस्थापन अशा अनेकविध कार्यांमध्ये मग्न असतानाच त्यांनी स्वतःची सर्जनशील वाङ्‌मयनिर्मितीही अखंड चालू ठेवली. त्यांना चिदंबर ह्या स्मृतिलेखांच्या संग्रहासाठी गुजरात शासनाचे पारितोषिक (१९७०), सरदार पटेल विद्यापीठाची डी. लिट् (१९७५) व पद्मभूषण (१९८५) हे मानसन्मान उत्तरायुष्यात लाभले.

इनामदार, श्री. दे.