नर्मद

नर्मद: (२४ ऑगस्ट १८३३–२५ फेब्रुवारी १८८६). गुजरातीतील प्रसिद्ध अष्टपैलू लेखक आणि समाजसुधारक. त्यांचे संपूर्ण नाव नर्मदाशंकर लालशंकर दवे असले, तरी ते ‘नर्मद’ या नावानेच विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म सुरत येथे एका नागर ब्राह्मण कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण सुरत येथे व माध्यमिक शिक्षण मुंबई येथे एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये झाले. लहानपणी ते लाजाळू, गंभीर व ईश्वरभक्त होते. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांना कौटुंबिक कारणानिमित्त मुंबईहून सुरतला जावे लागले. १८५३ मध्ये पत्नीचे निधन झाल्यावर ते पुन्हा मुंबईस आले आणि इतिहास व इंग्रजी साहित्याचा अभ्यास करू लागले. शिक्षण घेत असतानाच ते समाजसुधारणेचेही काम करू लागले. त्यांनी काही सहकाऱ्यांच्या मदतीने ‘बुद्धिवर्धक सभा’ ह्या संस्थेची स्थापना केली. ते महत्त्वाकांक्षी होते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच ते कविताही रचू लागले. नंतर शिक्षण सोडून देऊन ते एका शाळेत अध्यापक झाले पण त्यात त्यांचे मन रमले नाही. त्यांनी नोकरी सोडून दिली व साहित्यसेवा करण्याचा निश्चय केला. साहित्यसेवा करून जगताना त्यांना बऱ्याच हालअपेष्टांना तोंड द्यावे लागले. शेवटी नाइलाज होऊन आपला निश्चय मोडून तीन वर्षे (१८८२–८५) नोकरी करणे त्यांना भाग पडले. नंतर त्यांनी ही नोकरी सोडून दिली पण एका वर्षातच त्यांचे निधन झाले.

ज्ञानवैराग्य अथवा पुराणकथा सांगणाऱ्या धर्मप्रधान, पद्यनिबद्ध गुजराती वाङ्‌मयात विषय, भाषा, स्वरूप, शैली आदी सर्व दृष्टींनी क्रांती घडवून आणणारे साहित्यिक म्हणून प्रसिद्ध आहेत. क्रांती हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा व अनिष्ट रूढी यांना झुगारून देण्यासाठी त्यांनी दांडिया  मासिक काढले आणि त्यात प्रक्षोभक लेख लिहिले. तसेच स्वतःच्या विधवाविवाहादी आचरणाने समाजसुधारणा करण्याचा प्रयत्न केला. सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रात समाजसुधारणेचे एक प्रणेते म्हणून गुजरातमध्ये त्यांना मानाचे स्थान आहे. त्यांनी स्वतःस साहित्यसेवेस वाहून घेतले. साहित्यसेवेचे व्रत आमरण स्वीकारले तथापि दैनंदिन जीवनव्यवहार चालविण्यासाठी त्यांना बऱ्याच हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. आपल्या आवेशपूर्ण लेखणीने त्यांनी लोकजागृती करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हे लिखाण नर्मगद्यमध्ये संकलित झाले आहे. अर्थात, आवेशाच्या भरात ‘प्राचीनोच्छेद म्हणजेच सुधारणा’ हे स्वतःच्या मनाशी घट्ट केलेले समीकरण चुकीचे असल्याचे त्यांना उत्तरायुष्यात उमगले. हिंदू धर्म व संस्कृतीचे सम्यक् चिंतन करून आपल्या प्राचीन परंपरेचा अर्थ लावला पाहिजे व त्याच्या अनुरोधानेच सुधारणा घडविली पाहिजे, हे त्यांनी ओळखले. त्यांचे एतद्विषयक लिखाण धर्मविचारमध्ये संगृहीत झाले आहे. सत्य, शौर्य, उत्साह व आवेग हे नर्मद यांच्या स्वभावाचे तेजस्वी अंश आहेत. गुजराती भाषा आणि साहित्याचा सर्व प्रकारचा विकास करण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. आधुनिक गुजराती गद्याचे तसेच गुजराती साहित्यातील आधुनिक युगाचे जनक म्हणूनही त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. पाश्चात्त्य साहित्याप्रमाणे गुजराती साहित्यात निबंध, चरित्र, नाटक, आत्मचरित्र, इतिहास, संशोधन-संपादन आदी विविध प्रकारचे वाङ्‌मय निर्माण करण्यास त्यांनी सुरुवात केली. नर्मगद्य  आणि धर्मविचार यांमध्ये त्यांनी सर्वप्रथम साहित्यतत्त्व असलेले सुश्लिष्ट निबंध लिहिले. मारो हकीकत हे त्यांचे आत्मचरित्र गुजराती साहित्यातील आद्य आत्मचरित्र होय. दयारामकृत काव्यसंग्रह (भाग १–२), प्रेमानंदकृत दशमस्कंध व नळाख्यान  हे ग्रंथ त्यांनी संपादून प्रसिद्ध केले आहेत. राज्यरंगमध्ये त्यांनी जागतिक इतिहासाचे दिग्दर्शन घडविले आहे. सीताहरण, द्रौपदीदर्शन यांसारखी नाटकेही त्यांनी लिहिली. परंतु सर्वांत मोठे व मेहनतीचे कार्य म्हणजे त्यांनी सर्वप्रथम तयार केलेला गुजराती भाषेचा शब्दकोश-नर्मकोश-हे होय. काव्याच्या क्षेत्रातदेखील त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. पिंगलाचा (छंदःशास्त्राचा) अभ्यास करून त्यांनी विपुल काव्यनिर्मिती केली आहे. त्यांच्या अगोदरच्या कवींचे काव्य शब्दचमत्कृती, अनुप्रासादी बाह्यांगातच अडकून पडले होते. परंतु अंतःकरणातील ऊर्मींचा सहजोद्‌गार म्हणजेच काव्य, ह्या पाश्चात्त्य काव्यतत्त्वानुरूप त्यांनी गुजराती साहित्यात सर्वप्रथम आत्मलक्षी ऊर्मिकाव्य (भावकाव्य) लिहिण्यास सुरुवात केली. नर्मकवितांमध्ये स्वतःच्या जीवनातील अनेक प्रबल भावनांनी भरलेली सुंदर भावकाव्ये त्यांनी लिहिली आहेत. गुजराती साहित्यात शुद्ध निसर्गकाव्ये लिहिणारे नर्मद हे पहिले कवी आहेत. त्यांची कविता नर्मकविता (१८८५) नावाने दोन खंडांत संगृहीत आहे. एखाद्या योद्ध्याच्या आवेशाने सुधारणा, स्वातंत्र्य व देशाभिमानाचा संदेश त्यांनी आपल्या काव्यामधून दिला. ‘जय जय गरबी गुजरात’, ‘सहु चलो जीतवा जंग’, ‘रण तो धीरानुं’ इ. त्यांची उत्कृष्ट काव्ये आहेत. हिंदुओनी पडती हे समाजसुधारणेचा आदेश देणारे १५०० पंक्तींचे प्रदीर्घ काव्य त्यांच्या कवित्वशक्तीचे दर्शन घडविते. वीरसिंह आणि रूदनरसिक मध्ये त्यांनी महाकाव्य रचण्याचाही प्रयत्न केला आहे. अर्थात नर्मद यांचे काव्य सर्वच श्रेष्ठ प्रतीचे आहे, असे म्हणता येणार नाही. त्यांच्या प्रणयकवितांनी तर अनेक ठिकाणी श्लीलतेच्या मर्यादा ओलांडल्या आहेत.

पेंडसे, सु. न.