महेंद्र (महिंद) : (इ. स. पू. तिसरे-दुसरे शतक). बौद्धांच्या स्थविरवादी परंपरेप्रमाणे हा सम्राट अशोकाचा पुत्र तर अन्य काही परंपरा तसेच काही पाश्चात्त्य अभ्यासकांच्या मते अशोकाचा भाऊ. तिसऱ्या धर्मसंगीतीतील (इ. स. पू. २६४) निर्णयानुसार त्याला अशोकाने सिंहलद्वीपास (श्रीलंकेस) धर्मप्रसारार्थ पाठविले. त्याचप्रमाणे महेंद्राची बहीण ⇨ संघमित्रा हीही त्याच कार्याकरिता पुढे सिंहलद्वीपास गेली. सिंहलद्वीपात बौद्ध धर्माची स्थापना ह्या दोघांनी केली, अशीच तेथील लोकांची दृढ समजूत आहे. त्यांच्याबाबतची माहिती महावंश, दीपवंश, दिव्यावदान आणि ह्यूएनत्संगच्या प्रवासवर्णनात मिळते. त्यांनी सर्व सिंहलद्वीप बौद्ध धर्माखाली आणले. तेथील राजा देवानंपियतिस्स (इ. स. पू. २४७–२०७) यास तसेच त्यांच्या अनुचरांना त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली. नंतर लाखो स्त्रीपुरुषांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि अनेक लोक संघात प्रविष्ट होऊन भिक्षु-भिक्षुणी बनले. राजाने महेंद्रासाठी जो विहार बांधून दिला, तो ‘महाविहार’ नावाने प्रख्यात आहे. नंतर राजकन्या अनुला हिनेही पाचशे स्त्रियांसमवेत संघमित्रेकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. महेंद्राची आई ही विदिशा (मध्य प्रदेशात भोपाळजवळील भिलसा) प्रांतातील असल्याकारणाने महेंद्र सिंहलद्वीपास जाण्यापूर्वी तिकडे गेला होता. त्याच्याबरोबर त्याने मध्य प्रदेशात प्रचलित असलेल्या धार्मिक शिकवणीची भाषा व लोकांच्या स्मरणात असलेले बुद्धाचे धर्मोपदेशही नेले. पण सिंहलदेशात गेल्यावर तेथील जनतेला समजण्यास सुलभ जावे म्हणून त्या मूळ उपदेशांवरील भाष्यांची भाषांतरे त्याने तेथील स्थानिक भाषेत केली. हेच स्थानिक भापेतील ग्रंथ ⇨ बुद्धघोष  इ. स. पाचव्या शतकाच्या आरंभी सिंहलद्वीपास गेला असताना तेथे त्याने लिहिलेल्या ⇨ अट्ठनकथांचे (अर्थ-कथांचे) आधारभूत ग्रंथ होत. महेंद्राने आपले सर्व आयुष्य श्रीलंकेत धर्मप्रचारार्थ वेचले. नव्वद वर्षांचा होऊन चैत्य पर्वतावर (मिहीताले) तो निधन पावला. त्यावेळी श्रीलंकेत तिस्सपुत्र उत्तिय हा गादीवर होता.

बापट, पु. वि.