भौतिकी चिकित्सा : शरीराच्या इजा झालेल्या किंवा आजारी भागांस ते पूर्ववत होऊन कार्यक्षम होण्यासाठी ज्या चिकित्सेमध्ये उष्णता, विद्युत्, जल इ. भौतिकीय साधानांचा उपयोग केला जातो तिला ‘भौतिकी चिकित्सा’ म्हणतात.

इतिहास : भौतिकी चिकित्सेकरिता नैसर्गिक साधनांचा उपयोग मानव अनादिकाळापासून करीत असावा. विविध व्याधींनी ग्रस्त झालेल्या रुग्णासाठी निरनिराळ्या प्रकारची स्नाने, नैसर्गिक खनिज जलाचे प्राशन व शारीरिक व्यायाम यांचा उपयोग करण्यात येते असे. प्राचीन ग्रीसमध्ये अशा प्रकारचे उपचार केले जात. इंग्लंडमध्ये रोमन कालाखंडात उत्तम प्रकारे पाणी तापविण्याची व्यवस्था असलेली स्नानगृहे श्रीमंतांच्या प्रसादांतून मुद्दाम बांधलेली असत. तत्कालीन रोमन लोक ज्ञात असलेल्या तेथील नैसर्गिक झऱ्यांचा उपयोग करीत [⟶ खनिज जल]. ज्वर कमी करण्याकरिता हिपॉक्राटीझ (इ. स. पू. ४६०-३७०) हे ग्रीक वैद्य थंड पाण्याचा उपयोग करीत असत. शीत स्नानानंतर मनुष्याला वाटणारा उत्साह ग्रीक लोकांना एवढा महत्त्वाचा वाटला की, त्यांनी लढवय्या स्पार्टन लोकांकरिता शीत स्नान आवश्यक आहे असा कायदाच करून टाकला. बहुतेक सर्व पुरातन संस्कृतींत चिकित्सेमध्ये पाण्याला महत्त्वाचे स्थान देण्यात आले होते.

सूर्यप्रकाश किरणांचा चिकित्सेकरिता उपयोग अनेक शतकांपासून ज्ञात असावा. या चिकित्सेला ‘सूर्यकिरणचिकित्सा’ म्हणतात. एस्क्यलेपीअस नावाचा देव ग्रीकांच्या वैद्यकाचे दैवत होते, तसेच ते सूर्याचे दैवतही होते. हिपॉक्राटीझ यांच्या काळात या देवाचे मोठे मंदिर उभारण्यात आले होते आणि या ठिकाणी ते प्रकाश व पाणी यांचा वापर रोग बरा करण्याकरिता करीत. क्षीण  बनलेल्या स्नायूंच्या उपचारार्थ ते सूर्यस्नानाचा उपचार लठ्ठपणा (मेदोवृद्धी) घालविण्याकरिता आणि चिरकारी (दीर्घकालीन) प्रकारच्या व्रणांवर करीत. १७९५ मध्ये सी. डब्ल्यू. हूफेलांट यांनी ⇨गंडमाळांवर (मानेतील लसीका ग्रंथींच्या क्षयरोगावर) सूर्यप्रकाशाचा चिकित्सात्मक उपचार सांगितला होता. १८७७ मध्ये डाऊन्स व ब्लंट यांनी प्रकाश किरणांच्या (विशेपेकरून कमी तरंगलांबीच्या किरणांच्या) सूक्ष्मजंतुनाशक गुणधर्माकडे लक्ष वेधले. एन्. आर्. फिन्सन या डॅनिश वैद्यांनी १८९६ मद्ये रासायनिक बदल घडवून आणणाऱ्या  किरणांची चिकित्सात्मक उपयुक्तता सिद्ध केली.

हजारो वर्षांपूर्वी जीन, जपान, ईजिप्त, ग्रीस, तुर्कस्तान व इटली या देशांतून चिकित्सेकरिता मर्दनाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जाई [⟶ मर्दन चिकित्सा]. सु. दोनशे वर्षांपूर्वी स्कँडिनेव्हियन देशांत (विशेषेकरून स्वीडनमध्ये) मर्दन चिकित्सेचा उपयोगक करीत. तेथे काही मर्दन प्रकार व शारीरिक व्यायाम पद्धती शिकिविल्या जात. अमेरिकेमध्ये एस्. डब्ल्यू. मिचेल या तंत्रिका तंत्रविशारदांनी (मज्जासंस्थेच्या विकरासंबंधीच्या तज्ञांनी) मनोदौर्बल्य आणि उन्माद (हिस्टेरिया) या रोगांवर मर्दन चिकित्सेचा प्रथम उपयोग केला.

भौतिकी चिकित्सेला वैद्यकीय उपचारातील विशिष्ट स्थान आधुनिक काळात पहिल्या महायुद्धानंतर प्राप्त झाले. बालपक्षाधाताच्या (पोलिओच्या) साथीतून बचावलेले अनेक अपंग व दुसऱ्या महायुद्धानंतर बचावलेले अपंग सैनिक यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न भेडसावू लागताच भौतिकी चिकित्सेला महत्त्व आले. अस्थिभंग, भाजणे व पोळणे,  अकस्मात उद्भवणारा पक्षाघात, क्षयरोग, तंत्रिका विकृती यांसारख्या विविध आजारांतही भौतिकी चिकित्सेचा वापर सुरू झाला. ही चिकित्सा जरी ⇨विकलांग चिकित्सेशी अधिक निगडित असली, तरी अलीकडे वैद्यकाच्या सर्वच शाखामध्ये तिचा वाढता उपयोग होत आहे. आधुनिक काळात ‘पुनर्वसन वैद्यक’ अशी वैद्यकाची नवी शाखाच उदयास आली असून भौतिकी चिकित्सा हा तिचा एक महत्त्वाचा घटक आहे. अलीकडील नव्या शोधांमुळे श्राव्यातीत ध्वनी [मानवी श्रवणक्षमतेच्या जरा वरच्या कंप्रतेचा म्हणजे दर सेकंदाला होणाऱ्या कंपनांची संख्या २०,००० पेक्षा  जास्त असलेला ध्वनी ⟶ श्राव्यातील ध्वनिकी] व ⇨लेसर किरण यांसारख्या साधनांचा, तसेच किरणोत्सर्गी समस्थानिकांचा [⟶ किरणोत्सर्ग] उपयोग या चिकित्सेत केला जात आहे.

साधने : भौतिकी चिकित्सेकरिता पुढील साधने वापरतात : (१) जल, (२) माती, (३) प्रकाश, (४) ध्वनी, (५) विद्युत्, (६) उष्णाता, (७) मर्दन व व्यायाम, (८) चुंबक, (९) लेसर किरण आणि (१०) किरणोत्सर्ग.

जल : भौतिकी चिकित्सेत जेव्हा पाण्याचा उपयोग करतात तेव्हा त्या चिकित्सेला ‘जल चिकित्सा’  म्हणतात. ‘निसर्गोपचार’ व ‘खनिज जल’ या नोंदींतून याविषयी माहिती दिलेली आहे. पाणी हा नैसर्गिक पदार्थ असा आहे की, तो उष्णतेचे शोषण व प्रदान अतिशय जलद करू शकतो. तसेच त्याचा घन, द्रव व बाष्प यांपैकी कोणत्याही अवस्थेत उपयोग करता येतो. या गुणधर्मामुले जल हे चिकित्सेचे एक उत्तम साधन बनले आहे.

माती : मातीचे शरीरावर परिणाम तीन प्रकारचे असतात : (अ) यांत्रिक, (आ) रासायनिक आणि (इ) शीतोष्ण. उत्तम भिजविलेल्या मातीचा सर्वांगास लेप देता येतो किंवा मातीत भिजविलेल्या कापडाच्या पट्ट्या विशिष्ट शरीर भागावर लावता येतात. विंचू दंशावर मातीचा लेप गुणकारी ठरला आहे. ‘निसर्गोपचार’ या नोंदीत याविषयी अधिक माहिती दिली आहे.

आ. १. रुग्णालयातील प्रकाश चिकित्सा : मुलांवर जंबुपार किरणांचा उपचार

प्रकाश : चिकित्सेकरिता प्रकाशाचा उपयोग केल्यास तिला ‘प्रकाश चिकित्सा’ म्हणतात. पूर्वी या चिकित्सेकरिता प्रामुख्याने सूर्यप्रकाशाचा उपयोग करीत असत. सूर्यप्रकाशाचे लोलकातून अपस्करण केल्यानंतर त्यातील घटक किरण ज्ञात झाले. सु. ४,००० Å ते ४० Å (Å = अँगस्ट्रॉम एकक = १०-८ सेंमी.) या दरम्यानन तरंगलांबी असणाऱ्या अदृश्य किरणांना जंबुपार किरण म्हणतात. अनेक रोगांमध्ये या

आ. २. हाताच्या कोपरावरील जखम : (अ) जंबुपार किरणोपचारापूर्वी (आ) चंबुपार किरणोपचारानंतर.

किरणांचा चिकित्सात्मक उपयोग प्रभावी ठरला आहे.  लहान मुलांतील ⇨ मुडदूस या विकृतीत जंबुपार किरण त्वचेतन अवशोषित होऊन ७-डी हायड्रोकोलेस्टेरॉल या पदार्थाचे ड जीवनसत्त्वामध्ये रूपांतर करतात. नैसर्गिक रीत्या सूर्याप्रकाशामुळे ही क्रिया घडते. ज्या देशांत सूर्यप्रकाश अल्पकाळ टिकतो (उदा., ब्रिटन) त्या देशांत अनेक रूग्णालयांत प्रकाश चिकित्सेकरिता खास विभाग सुरू करण्यात आले.      जंबुपार किरण उद्भासन (शरीरावर पाडण्याची क्रिया) मुलांच्या शक्तिक्षीणता या विकृतीवरही उपयुक्त ठरले आहे. सूक्ष्मजंतू संक्रमणामुळे बऱ्या होण्यास विलंब लागणाऱ्या जखमा जंबुपार किरणांनी लवकर बऱ्या  होतात. अस्थींचा आणि सांध्यांचा क्षयरोग, काही त्वचारोग इत्यादींवर हा उपचार उपयुक्त ठरला आहे. 


जेथे सूर्यप्रकाश उपलब्ध नसेल तेथे आणि नियमित उपचाराकरिता निरनिराळ्या प्रकारच्या उपकरणांचा उपयोग करून कृत्रिम प्रकाशाचा उपयोग करतात. अलीकडे जीवनसत्त्वांची उपलब्धता, संश्लेषित (कृत्रिम रीतीने बनविलेल्या) औषधांची निर्मिती व प्रतिजैव (अँटिबायॉटिक) औषधांचा शोध यांमुळे जंबुपार किरणांचे चिकित्सात्मक महत्त्व कमी झाले आहे. मात्र यूरोपातील काही देशांतून त्वचा-क्षय व क्षयरोगाच्या इतर काही प्रकारांत इतर उपचारांबरोबर जंबुपार किरणांचा साहाय्यक उपचार म्हणून अद्यापही उपयोग करण्यात येते आहे. [⟶ निसर्गोपचार जंबुपार प्रारण].

ध्वनी : अलीकडे ध्वनी कंपनांचा चिकित्सेकरिता व निदानाकरिता उपयोग करण्यात येत आहे. मानवी कानाला जास्ती त जास्त २०,००० हर्टझ कंप्रता असलेला ध्वनी आवाज म्हणून ओळखता येतो. यापेक्षा अधिक कंप्रता असलेला ध्वनी ‘श्राव्यातीत ध्वनी’ किंवा  कानांना तो ऐकू येत नसल्याने ‘आवाजरहित आवाज’ म्हणून ओळखला जातो. उपचराकरिता १० लक्ष हर्ट्झपेक्षा जास्त कंप्रतेचा ध्वनी वापरतात. उपचार करावयाच्या शरीरभागातील ऊतकावर (समान रचना व कार्य असलेल्या कशिकांच्या – पेशींच्या – समूहावर) परिणाम करण्याकरिता क्वॉर्ट्झ स्फटिकापासून निघणारे श्राव्यातीत ध्वनितरंग प्रत्यक्ष स्पर्शाने पोहोचविले जातात. या शरीरभागावरील त्वचेवर व्हॅसलीन किंवा खनिज तेल स्पर्श-पदार्थ म्हणून लावतात. या ध्वनितरंगांमुळे रोगट उतकात उष्णता उत्पन्न होते. या उष्णतेपासून निरोगी ऊतकांना इजा होऊ नये म्हणून स्फटिक मागे-पुढे, आजूबाजूला हालविता येईल अशी योजना केलेली असते.

या ध्वनितरंगांमुळे रोगट भागात रक्तधिक्य होऊन पुनःस्थितिस्थापनास (ऊतक पूर्ववत होण्यास) मदत होते. ध्वनितरंग लहान अवकाशात केंद्रित करता येतात आणि या गुणधर्माचा उपयोग तंत्रिका तंत्रावरील शस्त्राक्रियेकरिता करता येतो. श्राव्यातीत ध्वनि तरंगांच्या उष्णता-उत्पादक गुणधर्माचा उपयोग पीटर कोरी यांनी ह्यूस्टन (अमेरिका) येथील अँडरसन रुग्णालयात  काही अर्बुदांवरील (नवीन कोशिकांच्या अत्यधिक वाढीमुळे निर्माण होणाऱ्या (व शरीरक्रियेस निरूपयोगी असणाऱ्या गाठींवरील) इलाचाकरिता केला. अर्बुदाची उष्णात ५०° से. पर्यंत वाढविल्यानंतर २०० रूग्णांतील अर्बुदांचे आकारमान ५०% पेक्षा कमी झाल्याचे त्यांना आढळून आले. या सर्व कर्क-अर्बुदांवर प्रथम किरणीयन उपचार [आयनीकारक प्रारणांचे उपचार ⟶ प्रारण चिकित्सा] केलेले होते. उष्णात कर्क-कोशिकांना मारक असते, या तत्त्वावर हा उपचार आधारलेला होता.

विद्युत् चिकित्सा : निरनिराळ्या प्रकारचे विद्युत् प्रवाह वापरून शरीरातील ऊतकांवर भौतिकीय, रासायनिक व इतर परिणाम घडवून आणता येतात. विशिष्ट प्रकारचा विद्युत् प्रवाह मिळण्याकरिता विशिष्ट उपकरण वापरतात. शस्त्रक्रियेत विद्युत् प्रवाहाचा उपयोग करता येतो. विद्युत् ऊतकदहन या उपचारामध्ये गॅल्वहानिक प्रवाह ऊतकाशी प्रत्यक्ष संपर्कित करून ऊतकनाश करतात. गुदाशयाचा कर्करोग, गर्भाशय ग्रीवेवरील (मानेसारख्या भागवरील) व्रण यांवर ऊतकदहन उपचार उपयुक्त ठरले आहेत. काही उपचारांमध्ये विद्युत् प्रवाह वापरून शरीरातील खोल भागातील ऊतकांची उष्णता वाढविता येते. [⟶ निसर्गोपचार ऊतकतापन चिकित्सा].

उष्णता : उष्णतोपचार सर्वसाधारणपणे रोगट शरीरभागातील रक्ताचे प्रमाण वाढविण्याकरिता व वेदना शमविण्याकरिता करतात. ही उष्णता मिळण्याकरिता गरम पाण्याच्या रबरी पिशव्या, ऊन तव्यावर ठेवून गरम केलेली कापडाची घडी, गरम वाळूची पुरचुंडी, गरम केलेला विटकरीचा टोला, बाष्प अथवा वाफ, ऊन पाण्याचे स्नान, तापविलेल्या मेणाचा उपयोग, विद्युत् प्रवाहाच्या साहाय्याने तापविलेल्या घड्या, उष्णताजनक दिवे, अवरक्त किरणोत्पादक दिवे (दृश्य वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य किरण उत्सर्जित करणारे दिवे), जंबुपार किरणोत्सर्जक दिवे, उच्च कंप्रतायुक्त विद्युत् प्रवाह, श्राव्यातीत ध्वनी इत्यादींचा उपयोग करतात. रोगोपचाराकरिता उष्णतेचा उपयोग मानव अनादिकाळापासून करीत असावा. संपूर्ण शरीरावरील उष्णतोपचार घाम वाढविण्यास, रुधिराभिसरणाची गती वाढविण्यास, रक्तदाब कमी करण्यास आणि मूत्रपिंडांच्या मूत्रोत्पादनात वाढ करण्यास कारणीभूत होतात. परिणामी विकृत स्थानातील चयापचयजन्य (शरीरात सतत होणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडींमुळे उत्पन्न होणारे) पदार्थ व टाकाऊ विषारी पदार्थ दूर नेले जाऊन त्यांच्या उत्सर्जनास मदत होते. [⟶ ऊतकतापन चिकित्सा].

मर्दन व व्यायाम : हाताने किंवा यांत्रिक उपकरणाने अंग रगडणे, चेपणे, चोळणे, थोपटणे इत्यादींचा समावेश असलेल्या चिकित्सेला ⇨ मर्दन चिकित्सा  म्हणतात. रुधिराभिसरणास चेतना देण्याकरिता, वेदना शमविण्याकरता आणि आकुंचित स्नायू शिथिल पडण्याकरिता मर्दन उपयुक्त असते. हलक्या हाताने लयबद्ध थोपटणे, रगडणे, दाबणे, सांध्यावर किंवा अस्थीवर गोलाकार दाब देणे इ. प्रकार मर्दनात वापरतात. विशिष्ट रोगावर विशिष्ट प्रकारचे मर्दन उपयुक्त असते. रोहिणीकाठिण्य, संधिशोथ (सांघ्यांची दाहयुक्त सूज), बालपक्षाघात यांसारख्या विकृतींकरिता मर्दन करणी व्यक्ती प्रशिक्षित असणे व तिने वैद्यकीय सल्ल्यानुसार चिकित्सा करणे आवश्यक असते.

व्यायामामुळे शारीरिक क्रिया व अंगास्थिती नियंत्रित व नियमित राहतात. भौतिकी चिकित्सेत सर्वाधिक उपयोगात असणारे साधन व्यायाम हेच आहे. सांध्यांची हालचाल वाढविणे, स्नायूंची ताकद वाढविणे आणि एखाद्या विशिष्ट स्नायूची इतर स्नायूंशी सुसंबद्धित अशी हालचाल करणे या गोष्टी व्यायामाने साधतात.

व्यायाम सोपा किंवा जटिल (गुंतागुंतीचा), तसेच स्वकृत किंवा परकृत असू शकतो. परकृत व्यायामात रोग्याच्या विकृत भागाच्या योग्य त्या हालचाली भौतिकी चिकित्सक करतो. ताठरलेले सांधे, पक्षाघात झालेले स्नायू यांसारख्या विकृतींवर परकृत व्यायाम उपयुक्त असतो. स्नायूची ताकद वाढविण्याकरिता मात्र स्वकृत व्यायामच उपयुक्त असतो. व्यायामाकरिता निरनिराळी उपकरणे उपलब्ध आहेत. पुष्कळ वेळा व्यायाम करते वेळी शरीर पाण्यात बुडालेल्या अवस्थेत ठेवतात. व्यायाम स्थानीय किंवा सार्वदेहिक स्वरूपाचा असतो. पक्षाघात, बालपक्षाघात, संधिशोथ, पाठदुखी, काही फुप्फुस विकार इत्यादींमध्ये व्यायाम उपयुक्त आहे. फुप्फुस विकारांत श्वसनव्यायामांचे मोठे महत्त्व आहे. भौतिकी चिकित्सेत बलोपासना महत्त्वाची नसून शरीरभागांचे पुनःस्थितिस्थापन हाच प्रमुख हेतू असतो. [⟶ व्यायाम].

चुंबक चिकित्सा : उपचाराकरिता ज्या चिकित्सेत निरनिराळ्या आकारांच्या व शक्तींच्या चुंबकांचा किंवा चुंबकीय जलाचा उपयोग करतात तिला ‘चुंबक चिकित्सा’ म्हणतात. चुंबकीय चिकित्सक या चिकित्सेला वैदिक आधार असल्याचे सांगतात. अथर्ववेदात काही मंत्रांतून उल्लेखिलेल्या ‘सिकतावती’ आणि ‘अश्मा’ या उपचारार्थ वापरलेल्या वस्तू चुंबक होत्या, असा त्यांचा दावा आहे. भारताशिवाय अमेरिका, रशिया, जर्मनी आणि जपान या देशांतून अलीकडे या चिकित्सेला चालना मिळाली असून काही ठिकाणी तीवर संशोधनही चालू आहे.


पृथ्वी हीच एक मोठा चुंबक आहे. तीतून ऊर्जा सतत बाहेर पडत असते व ती आपल्याभोवती चारही बांजूंना चुंबकीय क्षेत्र निर्माण करते. ही शक्ती किंवा क्षेत्र मानवी शरीरावर, तसेच जीवजंतू, प्राणी व वनस्पती यांवर परिणाम करते. याशिवाय मानवी शरीर हेही मुळात एक विद्युत् संस्था आहे. तंत्रिका (मज्जा), मेंदू, स्नायू व सर्व इंद्रिये तसेच ऊतक-कोशिका विद्युत्‌मय असून त्यांचे कार्य विद्युत् चेतनेवरच चालते. पृथ्वीच्या चुंबक शक्तीशिवाय मानवनिर्मित निरनिराळ्या उपकरणांत, तसेच वीज निर्माण करणाऱ्या जनित्रात, विद्युत् वाहक तारांभोवती मोठ्या प्रमाणात चुंबकीय क्षेत्रे निर्माण होत असतात. या चुंबकीय क्षेत्रांच्या परिसरातच आजचा मानव वास्तव्य करतो व म्हणून या क्षेत्रांचा परिसरातच आजचा मानव वास्तव्य करतो व म्हणून या क्षेत्रांचा त्याच्या शरीरावर परिणाम होत असणारच. बाह्य व आंतरिक चुंबकीय क्षेत्रांमध्ये क्रिया-प्रतिक्रिया घडत असाव्यात. चुंबकीय प्रेरणांनीच शरीरातील विविध इंद्रियांच्या कार्याचा मेळ व संतुलन आधारलेले असावे. यात बिघाड उत्पन्न होणे म्हणजेच शारीरिक आजार या तत्त्वावर आधारित असलेल्या या चिकित्सेच्या पुरस्कर्त्याच्या माताप्रमाणे शरीराच्या विविध आजारांत बाहेरून कमी अधिक प्रमाणात चुंबकीय शक्ती पुरवून (म्हणजेच शरीराभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण करून) आजार विनासायास कुठलाही दुष्परिणाम न होता बरे करता येतात. याशिवाय हा उपचार नेहमी अल्पखर्ची असतो.

चुंबक चिकित्सातज्ञांच्या मताप्रमाणे चुंबकाचा शरीरावर प्रभाव देन प्रकारांनी होतो : (१) चुंबकीय तरंग ज्ञानतंतूंच्या माध्यामाने सर्व शरीरात प्रसारित होतात. यामुळे शरीरात आरोग्यदायी ऊर्जेची निर्मिती होते. (२) रक्तातील लाल कोशिकांतील रक्तारुणावर (हीमोग्लोबिन या ऑक्सिजनवाहक रंगद्रव्यावर) या तरंगांचा प्रभाव पडून रक्तपरिवाहनाला गती मिळाल्यामुळे चुंबकीय प्रभाव सर्व शरीरात पसरतो.

चुंबक चिकित्सकांच्या मताप्रमाणे अनेक रोगांवर (उदा., मधुमेह, दमा, पक्षाघात, पाढरे कोड, इसब) हा उपचार उपयुक्त ठरला आहे. या चिकित्सेवर अलिकडे बरेच संशोधन चालू आहे. काही विद्युत् चुंबकीय प्रवाह स्थानीय संवेदनाहारकांची जागा घेऊ शकतात, असे पाश्चिमात्य शास्त्रज्ञांनी दाखविले आहे परंतु यामागे अजूनही काही धोके आहेत. औषधे व चुंबक उपचारार्थ एकत्र वापरण्याचे प्रयोग करण्यात आले आहेत. विशिष्ट औषध विशिष्ट शरीरभागात नेण्याकरिता ते चुंबकीय संवेदनशील कुप्यांतून प्रथम भरतात. ज्या ठिकाणी ते पोहोचवावयाचे त्या भागावर चुंबक लावून कुप्या आकर्षित केल्या जातात. यामुळे प्रभावी औषध अत्यल्प प्रमाणात नियमितपणे योग्य जागी सांद्रित करता येते. ‘जैव-चुंबकशास्त्र’ असे नवे शास्त्राच उदयास येऊ पहात आहे. तथापि या संशोधनातून भरीव व निश्चित असे अद्याप काहीही सिद्ध झालेले नाही.

लेसर किरण : वैद्यकातील लेसराचे चिकित्सात्मक उपयोग पुढीलप्रमाणे आहेत : (अ) शस्त्रक्रिया, (आ) नेत्रवैद्यक, (इ) त्वचारोग, (इ) दंतरोग.

शस्त्रकिया : सतत-तरंग लेसराच्या [ ज्यात प्रकाशाची निर्मिती अखंडितपणे होते अशा लेसराच्या ⟶लेसर] किरणाचा ‘प्रकाश-चाकू’ सारखा म्हणजे शरीराच्या विशिष्ट भागी कापण्याकरिता शस्त्रासारखा उपयोग करता येतो. या चाकूने कापणे व रक्तक्लथन (रक्त साखळण्याची क्रिया) या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साधता येतात त्यामुळे रक्तस्रावहीन शस्त्रक्रिया होते. लेसराची ऊर्जा जेव्हा ऊतकाच्या पृष्ठभागावर अत्यल्प क्षेत्रात केंद्रित होते तेव्हा तेवढा ऊतक-भाग ‘कापला’ जातो म्हणजे निकामी बनतो. त्याच वेळी तेथील केशवाहिन्यांतील (सूक्ष्मतम रक्तवाहिन्यांतील) रक्ताचे क्लथन झाल्यामुळे रक्तस्राव होत नाही. यामुळे ज्या ठिकाणी मुबलक रक्तवाहिन्या असतात व रक्तस्रावाचा धोका असतो, अशा ठिकाणी लेसर शस्त्रक्रिया उपयुक्त असते. उदा., यकृतावरील शस्त्रक्रिया. गिलायु-उच्छेदन (गिलायू म्हणजे टॉन्सिल काढून टाकण्याच्या) शस्त्रक्रियेत लेसर वापरल्याने शस्त्रक्रियेच्या जागी कमी सूज आल्याचे, कमी रक्तस्राव झाल्याचे आणि ती जवळजवळ वेदनारहित असल्याचे आढळले आहे. आंत्रमार्गाच्या (आतड्यातील मार्गाच्या) आतील श्लेष्मकलास्तरातील (बुळबुळीत पातळ पटलातील) रक्तस्राव लेसर वापरून बंद करण्याचे तंत्र विकसित करण्यात आले आहे. अलीकडेच प्रगत झालेल्या ‘सूक्ष्मशस्त्रक्रिया’ तंत्रामध्ये (तुटलेले अतिसूक्ष्म शरीरभाग, रोहिण्या, तंत्रिका वगैरे सूक्ष्मदर्शकाखाली प्रत्यक्ष बघून एकमेकांना जोडण्याच्या तंत्रामध्ये) लेसराचा उपयोग करण्यात येत आहे.

कर्करोगावरील उपचाराकरिता लेसर व हेमॅटोफॉर्फिरीन डेरिव्हेटिव्ह (एचपीडी) या औषधाचा संयुक्तपणे उपयोग करण्यात आला आहे. हे औषध नीलेद्वारे अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) शरीरात घातल्यास २४ ते ४८ तासांत ते कर्क-कोशिकांत गोळा होते व निरोगी शरीर-कोसिका त्याचे जलद उत्सर्जन करतात. कर्क-अर्बुदाची व्याप्ती ठरविण्याकरिता प्रथम निळे लेसर किरण प्रकाशीय तंतूंच्या [ वितळविलेल्या सिलिकेपासून किंवा अन्य पारदर्शक द्रव्यापासून बनविलेल्या व प्रकाशाच्या  प्रेषणासाठी वापरण्यात येणाऱ्या लांब बारिक तंतूंच्या ⟶ प्रकाशीय संदेशवहन] जुडग्याच्या मदतीने त्या भागावर टाकतात. त्यामुळे एचपीडी असलेल्या कोशिका चमकून दिसतात व रोगव्याप्ती निश्चित करता येते. त्यानंतर त्याच जुडग्यातून लाल लेसर किरण कर्क-कोशिकांवर टाकून (निरोगी कोशिकांना हानी न होऊ देता) त्यांचा नाश करतात. या उपचाराने ५० ते १०० टक्के अर्बुदांमध्ये अपकर्ष (ऱ्हास) झाल्याचे, तर काही संपूर्ण नाश पावल्याचे आढळले आहे.

आ. ३. जिभेच्या कर्करोगावरील लेसर उपचार : (१) प्रकाशीय तंतूंचा जुडगा, (२) लाल लेसर किरण-शलाका, (३) जिमेवनरील कर्क-अर्बुद.नेत्रवैद्यक : मधुमेही रुग्णामध्ये जालपटल वियुक्ती नावाची विकृती प्रामुख्याने आढळते. प्राकृतावस्थेत (सर्वसाधारण अवस्थेत) डोळ्यातील जालपटल व मध्यपटल [⟶ डोळा] हे भाग नेहमी एकमेकांशी संलग्न असतात, ते या विकृतीत एकमेकांपासून अलग होतात. प्रथम त्या डोळ्यात अंशतः दृष्टिदोष उत्पन्न होऊन हळूहळू संपूर्ण दृष्टिनाश  संभवतो. वेळीच इलाज केल्यास गंभीर घोता टळून दृष्टी सुधारते. पीतबिंदुमध्ये (जालपटलाच्या मागील भागाच्या मध्यबिंदूपासून जवळच असलेल्या लंबवर्तुळाकार पिवळसर भागामध्ये) विकृती उत्पन्न होण्यापूर्वी शस्त्रक्रिया करून जालपटल वियुक्ती थांबविल्यास दृष्टी पूर्णपणे

सुधारते. या शस्त्रक्रियेकरिता दोन प्रकारचे प्रकाश किरण वापरता येतात : (१) झेनॉन प्रकाशकिरण (झेनॉन प्रकाशकिरण (झेनॉन हा वायू भरलेल्या दिव्यापासून मिळणारे प्रकाशकिरण) आणि (२) आर्‌गॉन लेसर किरण (आयनीभूत-विद्युत् भारित अणूंमध्ये रूपांतरित झालेल्या आर्‌गॉन वायूचा ज्यात उपयोग केलेला आहे अशा लेसरापासून मिळणारे किरण). झेनॉन प्रकाश पांढरा असून त्याच्याद्वारे जादा ऊर्जा अधिक मात्रेत विकृत जागी पोहचविता येते. जेव्हा विकृतीचे क्षेत्र मोठे असेल तेव्हा हे प्रकाशकिरण वापरतात. आर्‌गॉन आ. ४. जालपटल वियुक्तीवरील शीत शस्त्रक्रिया : (अ) जालपटल वियुक्ती : (१) मध्यपटल, (२) जालपटल, (३) छिद्र, (४) संचथित द्रव (आ) मध्यपटल दाबून जालपटलाजवळ आणल्यानंतर त्या जागी अतिशय थंड एषणी लावतात.लेसराचा प्रकाशकिरण हिरवा-निळा असतो व त्याची ऊर्जा लाहन क्षेत्रावर केंद्रित करता येते त्यामुळे ०.५ मिमी. पेक्षा ही कमी व्यासाच्या ऊतक-क्षेत्राचा अती उष्णतेमुळे नाश करता येतो. या क्षेत्रातील फुटलेल्या रक्तवाहिन्या आणि सूक्ष्म रोहिणी-विस्फार, तसेच ऑक्सिजन-न्यूनतेमुळे अकार्यक्षम बनलेले ऊतक यांचा नाश होतो. या क्रियेला ‘प्रकाश-क्लथन’ म्हणतात. अशा प्रकारची प्रत्येकी ५०० मायक्रॉनपेक्षा (१ मायक्रॉन = १०-६ मी.) कमी व्यास असलेली २,००० पर्यंत क्षेत्रे जरूर पडल्यास लेसराच्या मदतीने जालपटलावर तयार करता येतात.

अलीकडे अमेरिकेतील नॅशनल आय इन्स्टिट्यूटने डोळ्यातील वर्धक्यजन्य पीतबिंदु-अपकर्षामुळे उत्पन्न होणाऱ्या अंधत्वावर लेसर किरणांचा उपचार वेळीच केल्यास उपयुक्त ठरल्याचे म्हटले आहे. वरील रोगांशिवाय मोतीबिंदू व काचबिंदू (डोळ्यातील पुढच्या पोकळीतील द्रव पदार्थाचा दाब वाढल्याने बाहुलीचा रंग पांढरट हिरवट होणे) यांमध्ये लेसर वापरतात.

या ठिकाणी जिचा भौतिकी चिकित्सेत उल्लेख करता येईल अशा डोळ्यावरील एका प्रकारच्या शस्त्रक्रियेचा उल्लेख वावगा ठरणार नाही. या शस्त्रक्रियेला ‘शीत शस्त्रक्रिया अथवा संशीतक शस्त्रक्रिया’ म्हणतात. तीमध्ये अतिशय थंड केलेल्या एषणीचे म्हणजे बारीक सळईचे टोक जालपटलातील विकृत जागी लावतात आणि त्यामुळे जालपटल व मध्यपटल एकमेकांपासून अलग होण्याचे थांबते.

त्वचारोग : त्वचेत शिरलेली बाह्य रंजकद्रव्ये (उदा., गोंदताना शिरणारे रंजकद्रव्य), त्वचेतील वाहिन्यांच्या काही विकृती व इतर काही रंजकद्रव्ययुक्त त्वचा-विकृतींवरील उपचारात लेसर किरण वापरतात. लेसर किरणांचा परिणाम फक्त रंजकद्रव्यावरच होतो आणि आजूबाजूच्या निरोगी त्वचेची हानी होत नाही.

दंतरोग : लेसराच्या प्रकाश-क्लथन गुणधर्माचा उपयोग दातांच्या कही रोगात होतो. स्थानीय संवेदनाहारक म्हणून लेसर वापरतात. किडलेल्या दातातील खळगे विशेष रंगमिश्रित द्रव्य वापरून बुजविल्यानंतर त्यावर लेसर किरण टाकून टिकाऊ व कठीण बनवितात.


किरणोत्सर्ग : कर्करोगावर किरणोत्सर्गी कोबाल्ट (६०) या समस्थानिकाचा उपयोग बऱ्याच मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. रक्तकोशिकाधिक्यरक्तता (रक्तातील तांबड्या कोशिकांची बेसुमार वाढ होणे) व श्वेतकोशिकार्बुद (रक्तातील पांढर्याध कोशिकांची अती वाढ होणे) या रोगांत फॉस्फरस (३२) चा व अवटु-आधिक्यामध्ये [अवटू ग्रंथीच्या स्रावात प्रमाणाबाहेर वाढ होणे ⟶ अवटु ग्रंथि] आयोडिन (१३१) चा विशेष उपयोग करण्यात येतो. [⟶ अणुऊर्जेचे शांततामय उपयोग किरणोसत्सर्ग प्रारण चिकित्सा].

उपयुक्तता, व्यवसाय व शिक्षण : आधुनिक वैद्यकात भौतिकी चिकित्सेला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. काही हृद्‌रोग, फुप्फुसांचे रोग, निरनिराळ्या प्रकारचे पक्षाघात, स्नायूंचा कमकुवतपणा इ. रोगांवर ही चिकित्सा उपयुक्त ठरली आहे. अवयवच्छेदन, अस्थिभंग यांसारख्या विकलांग विकृतींमध्ये तिचे महत्त्व निर्विवाद सिद्ध झाले आहे. अपंग व्यक्तीला उपयुक्त व उत्पादक जीवन जगता येण्याकरिता ही चिकित्सा अनमोल ठरली आहे. व्यक्तीचे स्वतःचे व सामाजिक पुनर्वसन हे दोन्ही या चिकित्सेमुळे साध्य होतात.

या चिकित्सेचे विशेष ज्ञान असणाऱ्या वैद्यांना ‘भौतिकी चिकित्सातज्ञ’ म्हणतात. वैद्यकीय शिक्षण नसलेल्या परंतु या विषयाचे खास शिक्षण घेतलेल्या व वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार करणाऱ्या मदतनिसांना ‘भौतिकी चिकित्सक’ म्हणतात. अमेरिकेत या विषयाचे स्वतंत्र शिक्षण विभाग आहेत व तेथे पदविका किंवा पदवीपर्यंतचे शिक्षण देतात. अमेरिकेतील सर्वच्या सर्व म्हणजे पन्नास राज्यांतील भौतिकी चिकित्सकांना परवान्याशिवाय व्यवसाय करता येत नाही. बहुतेक रुग्णालयांतून या चिकित्सेकरिता स्वतंत्र विभाग आहेत.

भारतात या विषयाचे खास शिक्षण देणारी पहिली संस्था १९५३ मध्ये मुंबईस स्थापन झाली. १९८३ मध्ये एकूण सात संस्था पुढील ठिकाणी होत्या : (१) नागपूर, (२) बडोदे, (३) वेल्लोर, (४) मद्रास, (५) नवी दिल्ली, (६) जयपूर आणि (७) कलकत्ता. इंडियन ॲसोशिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट या राष्ट्रीय मंडळाकडून या सर्व संस्थांना मान्यता प्राप्त झालेली आहे. या संस्थांचे अनेक पदवीधर विद्यार्थी अमेरिका, ब्रिटन, यूरोप, पश्चिम आशिया इ. भागांतून काम करीत आहेत.

मुंबईच्या संस्थेत १९५३-६७ या काळात पदविका अभ्यासक्रम शिकवण्यात येत होता. १९६७ पासून संस्था मुंबई विद्यापीठास जोडण्यात आली असून तिच्याद्वारे वी. एस्‌सी. (फिजिकल थेरपी) व एम्.एस्‌सी. (फिजिकल थेरपी) या पदव्या मिळतात. ही संस्था शेट जी. एस्. मेडिकल कॉलेजच्या आवारात आणि त्याच कॉलेजच्या अधिष्ठात्यांच्या देखरेखीखाली मुंबई महानगरपालिका चालविते. जीवविज्ञान विषय घेऊन बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना प्रवेश मिळतो. साडेतीन वर्षांच्या अभ्यासक्रमानंतर पदवी व त्यानंतर आणली दोन वर्षानंतर पदव्युत्तर पदवी मिळते. या पदव्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झालेली आहे.

पहा : ऊतकतापन चिकित्सा घनिज जल निसर्गोपचार प्रारण चिकित्सा.

संदर्भ : 1. Bcckett, R. H. Modern Actinotheropy, London, 1955.

           2. Bristow, R. Self-Help Physiotherapy, London, 1974.

           3. Jussawala, J. M. Healing From Within, Bombay, 1966.

           4. Santawani, M.T. The Art of Magnetic Healing, New Delhi, 1981.

           5. Wolbarsht, M. L., Ed., Laser Applications in Medicine and Biology, Vol. 2, New York, 1974.

           ६. जायास्वाल, जयनारायण, चुंबक चिकित्सा : शास्त्र व प्रयोग, पुणे, १९८२.

कुलकर्णी, श्यामकांत भालेराव, य. त्र्यं.