राव, चिंतामणी नागेश रामचंद्र : (३० जून १९३४ – ). भारतीय रसायनशास्त्रज्ञ. ⇨घन अवस्था रसायनशास्त्र, ⇨पृष्टविज्ञान, ⇨वर्णपटविज्ञान व ⇨रेणवीय संरचना या विषयांत त्यांनी विशेष संशोधन केलेले आहे.

राव यांचा जन्म बंगलोर येथे झाला. तेथील सेंट्रल कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन त्यांनी १९५१ मध्ये बी. एस्‌सी. पदवी मिळविली व त्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठाची एम्. एस्‌सी. (१९५३) व अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठाची पीएच्.डी. (१९५७-५८) या पदव्या संपादन केल्या. प्रारंभी ते बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या रसायनशास्त्र विभागात अधिव्याख्याते होते (१९५९ –६३). त्यानंतर ते कानपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक व विभाग प्रमुख झाले (१९६३ –७६). तेथे त्यांनी संस्थेच्या संशोधनात आणि विकास कार्याचे अधिष्ठाते म्हणूनही काम केले (१९६९ – ७२). इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये १९७६ साली ते परत आले आणि तेथे त्यांनी घन अवस्था व संरचना रसायनशास्त्र या विषयांकरिता एक नवीन शाखा तसेच सामग्री संशोधन प्रयोगशाळा प्रस्थापित केली. या शाखेचे व प्रयोगशाळेचे ते अध्यक्ष आहेत. पर्ड्यू (१९६७-६८ आणि १९८२), ऑक्सफर्ड (१९७४-७५), केंब्रिज (१९८३-८४) व लाट्रोब (मेलबर्न, ऑस्ट्रेलिया) या विद्यापीठांत त्यांनी अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही काम केलेले आहे.

राव यांनी रासायनिक वर्णपटविज्ञान, रेणवीय संरचना, घन अवस्था रसायनशास्त्र व पृष्ठविज्ञान या आपल्या संशोधन विषयांत नवनवीन तंत्रे वापरली आहेत. मुक्त रेणूंच्या इलेक्ट्रॉन अवस्थांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी जंबुपार फोटोइलेक्ट्रॉन वर्णपटविज्ञानाचा [⟶ वर्णपटविज्ञान] उपयोग केला. घन अवस्था रसायनशास्त्रात त्यांनी प्रावस्था रूपांतरण [⟶ प्रावस्था नियम], दोषयुक्त घन पदार्थ, जटिल धातवीय ऑक्साइडांचे इलेक्ट्रॉनीय व चुंबकीय गुणधर्म आणि घन पदार्थांचे वर्णपटविज्ञान या शाखांत महत्त्वपूर्ण कार्य केलेले आहे. जटिल घन पदार्थांच्या गुणधर्मांचे रासायनिक बंधांच्या तत्त्वावर आधारलेले एकीकृत स्पष्टीकरण मांडण्यासाठी राव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळेत विविध ऑक्साइडे व नावीन्यपूर्ण संरचनेची इतर द्रव्ये कृत्रिम रीत्या तयार करण्यात आली आहेत. क्ष-किरण व जंबुपार फोटोइलेक्ट्रॉन वर्णपटविज्ञान, ऑगर वर्णपटविज्ञान वगैरे आधुनिक तंत्रे उपयोगात आणणारी भारतातील पहिली पृष्ठविज्ञानीय प्रयोगशाळा त्यांनी विकसित केली. विविध आधुनिक प्रयोग पद्धती व सैद्धांतिक आगणन यांवर आधारलेला अनेकदिशीय दृष्टिकोन अंगिकारणे हे राव यांच्या संशोधनाचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे.

राव यांना यांच्या कार्याबद्दल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळालेले आहेत. त्यांत पुढील सन्मानांचा समावेश आहे : फॅराडे सोसायटीचे मार्लो पदक (१९६७), शांतिस्वरूप भटनागर पारितोषिक (१९६८), इंडियन केमिकल सोसायटीचे येडेनापल्ली पदक व पारितोषिक (१९७३), जवाहरलाल नेहरू अधिछात्रवृत्ती (१९७३), सर सी. व्ही. रामन पुरस्कार (१९७५), अमेरिकन केमिकल सोसायटीची शतसांवत्सरिक परदेशीय अधिछात्रवृत्ती (१९७६), एस्. एन्. बोस पदक (१९८०), फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री पारितोषिक (१९७७), लंडनच्या रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचे पदक व पुरस्कार (१९८१), भारत सरकारचा पद्मश्री हा किताब (१९७४). यांखेरीज त्यांना पर्ड्यू, बोर्डो व श्री वेंकटेश्वर (तिरुपती) या विद्यापीठांनी सन्माननीय डी. एस्‌सी. पदव्या प्रदान केल्या आहेत. लंडनची रॉयल सोसायटी (१९८२), यूगोस्लाव्हियाची ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस व इंडियन नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थांच्या सदस्यत्वाचा बहुमान त्यांना मिळालेला आहे. ते आफ्रेलेशियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे संस्थापक सदस्य आहेत.

भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विज्ञान सल्लागार समितीचे सदस्य, भारत सरकारच्या पहिल्या विज्ञान व तंत्रविद्याविषयक राष्ट्रीय समितीचे सदस्य, इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे उपाध्यक्ष व सचिव, इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमीचे उपाध्यक्ष, विद्यापीठ अनुदान मंडळाचे सदस्य, सोसायटी ऑफ द कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचे सदस्य, भारत सरकारच्या विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन परिषदेचे सदस्य, भारत सरकारच्या विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन परिषदेचे सदस्य, सोसायटी ऑफ द कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चचे सदस्य, करंट सायन्स ॲसोसिएशनचे अध्यक्ष, ब्युरो ऑफ द इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड केमिस्ट्रीचे (आययूपीएसी) सदस्य, इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ सायंटिफिक युनियन्सच्या विज्ञान व तंत्रविद्या प्रदत्त समितीच्या कार्यकारी समितीचे सदस्य, आययूपीएसीच्या वर्णपटविज्ञान आणि रेणवीय संरचना आयोगाचे अध्यक्ष, आययूपीएसीच्या रसायनशास्त्र अध्यापन समितीचे अध्यक्ष, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड केमिस्ट्रीचे निर्वाचित अध्यक्ष, भारतीय विज्ञान परिषदेच्या रसायनशास्त्र विभागाचे अध्यक्ष भारताच्या अणुऊर्जा खात्याच्या रसायनशास्त्र व धातुविज्ञान संशोधन समितीचे अध्यक्ष वगैरे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केलेले आहे. जानेवारी १९८८ मध्ये पुणे येथे भरलेल्या भारतीय विज्ञान परिषदेच्या पंचाहत्तराव्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते.

राव यांनी आपल्या संशोधन विषयांसंबंधी १२ ग्रंथ व ३५० हून अधिक संशोधनात्मक निबंध लिहिलेले आहेत. रासायनिक भौतिकी, वर्णपटविज्ञान आणि घन अवस्था रसायनशास्त्र या विषयांवरील १२ आंतरराष्ट्रीय नियतकालिकांच्या संपादकीय मंडळांचे ते सदस्य आहेत.

भदे, व. ग.