भेक:  हा उभयचर (जमिनीवर वा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या) वर्गाच्या सलाएन्शिया गणातील प्राणी होय. याचे बेडकाशी साम्य आहे परंतु शास्त्रीय दृष्ट्या त्यांच्यामध्ये फरक आहेत. भेकाचा समावेश ब्यूफोनिडी कुलात केला जातो. ब्यूफो मेलॅनोस्टिक्टस हा भारतात सर्वत्र आढळणारा भेक होय. भेक अनेक प्रकारचे असतात. त्यांची प्रमुख लक्षणे म्हणजे त्यांना दात नसतात बीडर अंग असते (बीडर अंग म्हणजे संभवनीय अंडाशय होय परंतु याचे कार्य अजून समजलेले नाही).

अमेरिकन भेकबेडकांप्रमाणेच भेक ग्रीष्मसुप्तीत (उन्हाळ्यातील गुंगीमध्ये) व शीतसुप्तीत (हिवाळ्यातील गुंगीत) जातात. परिस्थिती अनुकूल झाल्यावर ते तिच्यातून बाहेर येतात.

भेकांचे पाय आखूड असतात. पुढच्या पायांपेक्षा मागचे पाय मोठे व लांब असतात. काही भेकांच्या पश्चपादांच्या अंगुली (मागच्या पायांची बोटे) पातळ त्वचेने जोडलेल्या असतात. पृष्ठीय (पाठीवरील) त्वचेवर वारीक पुटकुळ्या असतात व ती खडबडीत असते. तिचा रंग तपकिरी असतो. अधर (खालची, पोटावरील) त्वचा फिकट असते. पृष्ठीय भागाच्या त्वचेत विष ग्रंथी असतात. डोळ्याच्या पाठीमागच्या बाजूला या ग्रंथी जास्त असतात. याला डिवचले असता या अनुकर्ण ग्रंथीमधून (बाह्य कर्णाच्या पुढील व खालील भागातील लाला ग्रंथीमधून) विष स्रवते. या विषामुळे श्लेष्मकला (शरीरातील पोकळ्यांचे बुळबुळीत अस्तर) चुरचुरतात. या विषाचा कुत्र्यावर परिणाम होऊन कुत्रा मरतो परंतु भेक खाणाऱ्या इतर प्राण्यांवर या विषाचा परिणाम होत नाही. काही सापांचे तर भेक हे एकमेव खाद्य आहे, तरीसुद्धा भेकाच्या विषाचा त्या सापांवर परिणाम होत नाही. या विषाचे पृथक्करण करून त्यातून व्यूफोनीन नावाचा पदार्थ वेगळा काढला आहे. त्याचे गुणधर्म डिजिटॅलीस किंवा सिरोटोनीनसारखे आहेत, असे आढळून आले आहे. त्याच्या योगाने रक्तवाहिन्या संकुचित होतात. या विषात ॲड्रेनॅलीन व नॉरॲड्रेनॅलीन ही हॉर्मोनेही [वाहिनीविहीन ग्रंथीतून स्रवणारे व सरळ रक्तात मिसळणारे स्रावही ⟶ हॉर्मोने] बऱ्याच प्रमाणात आढळली आहेत. चीन  व जपानमध्ये ते नाकाच्या विकारांवर वापरीत असत. चिनी लोक वाळवलेल्या भेकांचा उपयोग औषधासाठी करीत असत.

भेक हे निशाचर प्राणी आहेत. विणीच्या हंगामात हे फार मोठ्याने ओरडतात. त्या वेळी ते फार भांडखोर होतात आणि कित्येकदा एकमेकांना ठार मारतात.

भेकांचे मुख्य अन्न म्हणजे कीटक होय. पिकांचा नाश करणाऱ्या व शेतीला उपद्रव देणाऱ्या कीटकांचा नाश करण्याकरिता भेकांचा उपयोग केला जातो. शेतकऱ्यांचा तो मित्र आहे.

भेक आपली अंडी संथ किंवा अगदी हळूहळू वाहणाऱ्या पाण्यात घालतात. संथ वाहणाऱ्या पाण्याबरोबर अंडी अनेक मैल दूर जातात व त्यांचे स्थलांतर होते. एका वेळी अनेक अंडी घातली जातात. टॅडपोलचे (भैकेर) कायांतरण (डिंभावस्थेपासून म्हणजे भ्रूणानंतरच्या स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या पण प्रौढाशी साम्य नसणाऱ्या सामान्यतः क्रियाशील पूर्व अवस्थेपासून प्रौढ अवस्था तयार होत असताना प्राण्याचे रूप व संरचना यांत बदल) होऊन त्याचे भेकात रूपांतर होते. हा बदल होण्यास एक ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो.

ब्यूफो  वंशात जवळजवळ २५० जाती आहेत आणि ऑस्ट्रेलिया व मॅलॅगॅसी सोडून तो सर्व जगभर आढळतो. भेकांची अनेक कुले आहेत. बरेच  भेक वैचित्र्यपूर्ण आहेत. नेक्टोफ्रायनॉइडीस हा आफ्रिकन भेक जरायुज (पिलांना जन्म देणारा) आहे. बाँबीनेटर इग्नोयसचा अधर भाग चकचकीत लाल रंगाचा असतो. सुरिनाम भेकाचा नर पिले पाठीवरच्या खोबणीत वागवितो. आफ्रिकेतील काही भेकांच्या पदांगुलींना (पायांच्या बोटांना) नखर (नख्या) असतात.

पहा : बेडूक वृक्षमंडूक सूरिनाम भेक.

जोशी, मीनाक्षी