लिटोरिनाचे

पेरिविंकल : लिटोरिनिडी कुलातील समुद्रकिनाऱ्यावर राहाणाऱ्या गोगलगाईचे हे लौकिक नाव आहे. त्यांचा प्रसार सर्व जगभर आहे. त्या समुद्रकिनाऱ्यावरील खडकात, दगडात, भरती-ओहोटीच्या भागात आणि चिखलात आढळतात. उष्ण कटिबंधीय प्रकार कच्छ वनस्पतींच्या आधारमुळांवर राहतात. त्यांच्या सु. ८० जाती (काहींच्या मते शेकडो) असून त्या मुख्यत: शाकाहारी आहेत. त्यांपैकी १० पश्चिम अटलांटिक किनाऱ्यावर आढळतात. सामान्य पेरिविंकल (लिटोरिना लिटोरिया) उत्तर यूरोप ईशान्य उत्तर अमेरिकेत खडकाळ किनाऱ्यावर विपुल आढळतो. त्याचे कवच जड, थबकडे (बसकट), भोवऱ्यांसारखे असून त्याला सहा किंवा सात वेढे असतात. तसेच ते अणकुचिदार टोकाचे असते व त्याचे छिद्र गोल असते. त्याचा रंग तपकिरी ऑलिव्ह किंवा जवळजवळ काळा असतो व कवचाची उंची १.२५ सेमी. ते २.५ सेंमी. पेक्षा जास्त असते. तो शैवले व इतर सागरी वनस्पतींवर आणि मृदुकाय (मॉलस्क) व कवचधारी (क्रस्टेशइयन) यांसारख्या लहान अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांवर उपजीविका करतो.

पूर्वी पेरिविंकला अन्न म्हणून महत्त्व होते. विशेषत: ब्रिटिश बेटे, फ्रान्स व नेदर्लंड्स येथील गरीबांचे ते अन्न होते. १८५८ पासून त्यांचा मिष्टान्न म्हणून उपयोग होऊ लागला आणि अजूनही त्यांचा खप भरपूर होतो. यूरोपात समुद्रकिनाऱ्यावरील शहरांत फेरीवाले पोरिविंकल विकताना आढळतात. फ्रान्समध्ये ते सामान्यत: खूप मीठ घातलेल्या थोड्या पाण्यात उकडून घेतात. नंतर मांसाचे पेरिविंकल सूप बनवितात, लोण्याबरोबर खातात किंवा विविध प्रकारचे सॉस बनवितात. तसेच ते विस्तवावर भाजूनही खातात.

जमदाडे, ज. वि.