तागालोग (तागाल) भाषा : तागालोग ही मलायो–पॉलिनीशियन भाषाकुटुंबातील एक भाषा असून, हे कुटुंब पॅसिफिकमधील बेटांपासून मादागास्करपर्यंत पसरलेले आहे. या कुटुंबातील इंडोनेशियन भाषासमूहाची विभागणी दोन शाखांमध्ये केली जाते : (१) पूर्वेकडील गट आणि (२) पश्चिमेकडील गट. पश्चिमेकडील गटात मालागासी आणि उत्तरेकडील व दक्षिणेकडील बोलींचा समावेश होतो. तागालोग ही भाषा उत्तरेकडील गटातील आहे.

तागालोग ही फिलिपीन्सची राष्ट्रभाषा आहे. १९४० मध्ये फिलिपीन्स सरकारने कायदेशीर शिक्कामोर्तब करून तागालोगला राष्ट्रभाषेचे स्थान दिले. अलीकडे तागालोग भाषा प्रत्येक शाळेतून शिकविलीच पाहिजे, असे सरकारी आदेश देण्यात आले आहेत. पूर्वी या भागात स्पॅनिश भाषेचा वापर होता व बहुतेकांना स्पॅनिश येत असे परंतु हल्ली अमेरिकेचा प्रभाव वाढल्याने इंग्रजीचा वापर विशेषत्वाने केला जातो. तागालोगबरोबरच इलोकानो, बिकोल, पम्पांगो आणि पन्गासिनान या पोटभाषाही फिलिपीन्समध्ये बोलल्या जातात.

फिलिपीन्समध्ये बराच मोठा समाज तागालोग जमातीचा आहे. तागालोग जमात मध्य व दक्षिण लुझॉनमध्ये राहते. तागालोग भाषिकांची संख्या सु. ५०,००,००० आहे. शिवाय ती फिलिपीन्सची राष्ट्रभाषा असल्याने, दुय्यम भाषा म्हणून सु. ३,७०,००,००० लोक तिचा वापर करतात.

तागालोग जमातीचा मानिला शहराशी सदोदित संबंध येत गेल्याने, तिच्यावर पाश्चिमात्य संस्कृतीचा परिणाम विशेषत्वाने झालेला दिसून येतो. मानिला शहरावर जवळजवळ ३०० वर्षे स्पॅनिशांचे आधिपत्य होते. तसेच अलीकडील ५० वर्षांत फिलिपीन्स अमेरिकेच्या विशेष प्रभावाखाली आल्याने इंग्रजीचा प्रसारही खूपच झाला आहे. त्याचप्रमाणे अमेरिकन भाषेचा व संस्कृतीचा तागालोग जमातीवर खोलवर परिणाम झाला आहे. त्यामुळेच तागालोग जमातीमध्ये साक्षरतेचे प्रमाण सु. ७० टक्के आहे. इंग्रजी भाषेचा वापर लोकव्यवहारात मोठ्या प्रमाणावर होत असला तरी हळूहळू तागालोग भाषेलाही महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे.

तागालोग भाषा विकासाच्या मार्गावर आहे. या भाषेमध्ये वाढत्या प्रमाणात साहित्यनिर्मिती होऊ लागली आहे. तिचा वापर वृत्तपत्रे, रेडिओ यांसारख्या लोकमाध्यमांसाठी होऊ लागला आहे. अलीकडे शासकीय तसेच शैक्षणिक पातळीवरही तागालोगला स्थान देण्यात येते. या भाषेत लवचिकपणा भरपूर आढळतो, तसेच तिचे शब्दभांडारही विपुल आहे. लवचिकपणामुळे तिच्यात अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे. पारिभाषिक व अद्ययावत् शास्त्रीय विचारांना व्यक्त करण्याची ताकदही या भाषेत हळूहळू निर्माण होत आहे.

पहा : इंडोनेशियन भाषासमूह मलायो–पॉलिनीशियन भाषाकुटुंब.

पांडे, वि. गो.