फंग मंग–लूंग : (१५७५–१६४६). चिनी देशभक्त आणि लोकसाहित्याचा संकलक, संपादक व लेखक. त्याच्या जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही तथापि त्याचा जन्म सू-जन् ह्या शहरात झाला जांग्‌शू प्रांतातील वू जिल्ह्याचा तो रहिवासी होता मिंग राजवंशातील अखेरचा सम्राट (त्सुंग चेंग) ह्याच्या कारकीर्दीत शाव्‌ मिंग ह्या जिल्ह्याचा न्यायाधीश म्हणून तो काम करीत होता आणि मिंग राजवंशाची सत्ता कोसळून पडली तेव्हा नवीन मांचू राजवटीबरोबर सहकार्य करण्याचे नाकारून त्याने आत्महत्या केली, एवढे तपशील मिळतात.

नाटके, कादंबऱ्या, कथा, लोकगीते असे बोलभाषेतले बरेचसे साहित्य त्याने संकलित केले व काहींचे पुनर्लेखनही केले. त्याच्या काळी चिनी भाषेतील जवळजवळ सर्व लिखाण वाङ्‌मयीन भाषेत होत असे. रोजच्या व्यावहारिक बोलभाषेत लेखन करणे हे अप्रतिष्ठित समजले जात असे. तथापि शेकडो वर्षे तेच तेच शब्दप्रयोग होत राहिल्यामुळे वाङ्‌मयीन चिनी भाषा नीरस व निःसत्त्व झालेली होती, तर बोलभाषा मात्र, तिच्या परिवर्तनशीलतेमुळे, चैतन्यशील झालेली होती. त्यामुळे काही साहित्यिकांनी, कोणत्याही विरोधाला न जुमानता, बोलभाषेत लेखन करण्याचे व बोलभाषेतील साहित्याचे संकलन करण्याचे व्रत अंगिकारले. फंग हा अशा साहित्यिकांत अग्रगण्य होता.

फंगने संकलित-संपादित-पुनर्लिखित केलेल्या साहित्यात यू शृ मींग येन (इं. शी. क्लीअर वर्ड्‌स टू ॲड्व्हाइस द वर्ल्ड), स्यींग शृ हंग येन (इं. शी. इटर्नल वर्ड्‌स टू अवकेन द वर्ल्ड) आणि जिंग शृ थुंग येन (इं. शी. ट्रू वर्ड्‌स टू वॉर्न द वर्ल्ड) हे तीन कथासंग्रह आणि श्रेष्ठ चिनी कादंबरीकार ल्वो ग्वान-जुंग ह्याची फींग याव ज्वान (इं. शी. द स्टोरी ऑफ पॅसिफाइंग द डेव्हिल-लँड) ही कादंबरी विशेष प्रसिद्ध आहे. फंगने संकलित केलेल्या कथा शेकडो वर्षे चीनमध्ये प्रचलित होत्या आणि व्यावसायिक कथाकार त्या रंगवून सांगत असत. ह्या कथांचा सारांश तेवढा स्मरणार्थ लिहून ठेवला जाई. अशा सारांशांना ‘ह्‌वा बन’ अशी संज्ञा आहे. अशा सारांशांच्या आधारे फंगने आपल्या कथा लिहिल्या. व्यावसायिक कथाकार कथा रंगवून सांगत फंगने त्या रंगवून लिहिल्या. मूळच्या कथाबीजाचा विस्तार आपल्या कल्पनाशक्तीने केला. त्यामुळे फंग हा निव्वळ संकलन-संपादकच नव्हे, तर त्या कथांचा निर्माताही ठरतो, असे अभ्यासकांना वाटते.

जीवनाची संकुलता, त्यातील आदर्श आणि त्यातून मिळणारे इशारे ह्यांचे व्यापक दर्शन फंगने आपल्या ह्या साहित्यातून घडविले आहे. बौद्ध धर्मातील तत्त्वेही त्याने आपल्या कथांतून मांडलेली आहेत. आपल्याकडील एकादशीमहात्म्य, सत्यनारायणकथा किंवा अशाच प्रकारच्या धार्मिक बोधकथा ह्यांच्याशी फंगच्या कथांचे बरेच साम्य आढळते. मात्र त्यांत ईश्वरभक्ती किंवा व्रतवैकल्ये यांवर भर नसून शुद्ध आचरणावर तो देण्यात आलेला आहे. 

देशिंगकर, गि. द.; ह्‌वांग, ई. शु. (इं); कुलकर्णी, अ. र. (म.)