व्हिएटनामी भाषा-साहित्य : दक्षिण-पूर्व आशियातील व्हिएटनाम देशाची व्हिएटनाम (व्हिएतनामी) ही राजभाषा असून देशातील सु. ८५% लोक ती भाषा बोलतात. देशाच्या उत्तरेकडील टाँकीन, मधील अनाम (आन्नाम) व दक्षिणेकडील कोचीन चायना या तीन प्रांतांपैकी अनामवरून तिला अनामी (आन्नामी) असेही म्हणत असत. फ्रान्सने हा देश जिंकण्यापूर्वी सर्व देशाला अनाम म्हणत. व्हिएटनामी भाषा आणि म्वांग ही अल्पसंख्य भाषा एकाच भाषाकुळातील्या पण ते कुळ कोणते याबद्दल संभ्रम आहे. ते चिनी-तिबेटी कुळ नसून थाई-कादाई किंवा मोन-ख्मेर यांपैकी एक असावे. भारतात मोर-ख्मेर कुळातील खासी भाषा मेघालयमध्ये बोलतात.

अनाम प्रांतातील ग्रामीण भाग सोडता या भाषेत ठळक स्थानिक भेद नाहीत उच्चाराच्या लकबी आणि विशिष्ट शब्द एवढ्यापुरतेच ते मुख्यत: आहेत. राजधानी हानोईमधील सुशिक्षितांची बोली प्रतिष्ठेची आहे. प्राचीन काळातील चीनच्या आधिपत्यामुळे नंतर मध्ययुगातही ती चिनी लिपीवर बेतलेल्या चुन्नोम (अर्थ– दाक्षिणात्य लिपिचिन्हे) या लोकलिपीत लिहिली जाई. सर्वांत जुना शिलालेख १३४८ मधील आहे. सतराव्या शतकाच्या प्रारंभी रोमन कॅथलिक धर्मोपदेशक आले. त्यांनी रोमन लिपी वापरली. मात्र आलेक्सांद्र द रोद ह्या फ्रेंच धर्मोपदेशकाने विविध भेदक चिन्हांचा उपयोग करून ती उच्चारानुसारी बनवली. परक्यांना ती क्लिष्ट वाटली, तरी व्हिएटनामी लोकांना ती तशी वाटत नाही. एकोणिसाव्या शतकात हा भूभाग फ्रान्सने जिंकून तो फ्रेंच इंडोचायनामध्ये समाविष्ट केला आणि रोमन लिपीत लिहिलेल्या व्हिएटनामी भाषेला या तीन प्रांतांपुरती राष्ट्रभाषा (क्‌वोक्‌-ङु) म्हणून मान्यता विसाव्या शतकाच्या सुरुवातीला दिली. तिच्यावर चिनी भाषेचा प्रभाव टिकून आहे. (५०% शब्दसंग्रह, साहित्यिक भाषेत याहूनदेखील अधिक, चिनी भाषेतून आलेला आहे.)

या भाषेची काही वैशिष्ट्ये सांगायची तर ती अशी : (१) बरेच शब्द एकाक्षरी (मोनोसिलॅबिक) असतात. त्यांचे स्वरव्यंजनवर्ण सारखे असले, तरी ते सुरभेदामुळे वेगळे ठरू शकतात. उदा., ‘चा’ शब्द उदात्त आरोही स्वरात ‘मासा’ या अर्थी, तर अनुदात्त अवरोही स्वरात ‘काही प्रकारच्या भाज्या’ या अर्थी वापरतात. पंजाबी भाषेतही असाच काही प्रकार आहे. (२) अनेकाक्षरी शब्द मुख्यत: आद्य आणि अंत्य प्रास (उदा., चु-चेव ‘ओरडणे’ खोक-लोक ‘कुरकुरणे’) आणि समास या पद्धतीने बनतात. इतर काही परिचित भाषांतून जे कार्य पूर्वप्रत्यय आणि परप्रत्यय यांच्या मदतीने होते (उदा., नामाचे संख्यावचन, विधेयपदाचे कालवचन) तेही या भाषेत जोडशब्दांच्या मदतीने आणि वक्त्याच्या मर्जीनुसार होते (म्हणजे उदा., कालवचनविरहित विधेयपद असू शकते). (३) विधेयपदे ही क्रियावाचक असतात तशी गुणवाचक असू शकतात (उदा., तो म्हणजे ‘मोठा असणे’). (४) परिणामी वाक्यातील शब्दाचा क्रम अर्थांकनासाठी विशेष महत्त्वाचा ठरतो. (५) तू किंवा तो, ती सर्वनामांच्या ऐवजी किंवा संबोधनासाठी वास्तविक किंवा मानीव नात्याचे शब्द वापरण्याकडे या भाषेत कल असतो (उदा., ‘तुम्हाला/त्यांना काय पाहिजे?’ ऐवजी ‘काकांना काय पाहिजे?’ असे म्हणणे). (६) नामांना लिंग-वचन नसते, पण कधीकधी त्यांना जोडून वर्ग वाचके येतात (मराठीत असे विकल्पाने आणि क्वचित घडते. उदा., ‘दोन गायिका’ ऐवजी ‘दोघीजणी गायिका’, ‘चार जेवणे’ ऐवजी ‘चारठाव जेवण’. व्हिएटनामीत मात्र असे सरसकट घडते) (७) व्यक्तीचे पूर्ण नाव, आडनाव, गटनाव, व्यक्तिनाम असे असते पण संक्षेपाने उल्लेख करताना मात्र फक्त व्यक्तिनाम आणि त्यापूर्वी ओंग/को/बा (श्रीयुत/कुमारी/श्रीमती) असे उपपद असा करतात (‘श्रीयुत गोमाजी कापशे’ ऐवजी ‘श्रीयुत गोमाजी’).

यातल्या काही वैशिष्ट्यांचा आणि भाषागत लोकसंस्कृतीचा आढळ पुढील लोकवचनात होतो. (पूर्वीच्या आणि याही उदाहरणात उच्चाराचे सर्व बारकावे दाखवलेले नाहीत याची नोंद घ्यावी.)

दाय कोन तु थुओ थो, दाय व्हो तु थुओ बो-व्हो मोय व्हे.

शब्दशः अर्थ : वळण-लाव मूल पासून काळ अजून लहान, वळण-लाव बायको पासून काळ नवखी नुकती घरी.

भावार्थ : लहान असल्यापासून मुलाला वळण लावावे, नववधू असल्यापासून बायकोला वळण लावावे.

साहित्य : व्हिएटनामी साहित्याला अनामी (आन्नामी) साहित्य असे पूर्वी म्हणत. मध्ययुगाच्या पूर्वीच्या काळात राजदरबारी सुशिक्षित लोकांमध्ये काव्याची मोठी प्रतिष्ठा होती या काव्याला जुन्या मौखिक परंपरेचा आधार होता. चौदाव्या शतकात व्हिएटनामी भाषा लेखनिविष्ट झाल्यावर मात्र चिनी परंपरेची छाया काव्यावर पडली आणि एक कथनपर काव्यप्रकार सिद्ध झाला. (त्रुयेन-नोय ‘दाक्षिणात्य लिपिचिन्हांतील आख्यान’.) सतराव्या-अठराव्या शतकांत तो पूर्णत्वास पोहोचला. एन्गायेन दू (१७६५-१८२०) कवीचे किम व्हान किएउ (‘किएउचे आख्यान’) हे काव्य विशेष नावाजले गेले. पुढे फ्रेंचांच्या धार्मिक, राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमणानंतर चिनी परंपरेचा प्रभाव कमी झाला आणि रोमन लिपीचा वापर आला. मात्र मूळ व्हिएटनामी काव्यपरंपरेचे सत्त्व टिकून राहिले.

संदर्भ: 1. Emeneau, M.B. Studies in Vietnamese (Annamese) Grammar, Cambridge, 1951.

           2. Hoa, Nguyen-Dinh, Hoa’s Vietnamese-English Dictionary, 1959 Reprinted, Tokyo, 1966.

           3. Thompson, L.C. A Vietnamese Grammar, London 1965.

केळकर, अशोक रा.